सकारात्मकतेची रुजवण...

17 Jan 2023 15:03:17
Positive attitude



सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा, असा उपदेश व सल्ला आपण नेहमीच ऐकत असतो. पण, असे का बरे? याचा आपण कधी विचार केला आहे का? काय एवढे आहे या सकारात्मक विचारांत? त्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया...


सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला जीवनातील दैनंदिन घडामोडींचा सहजसुलभ सामना करण्यास साहाय्य करतो. सकारात्मकता तुमच्या जीवनात आशावाद आणते आणि चिंता आणि नकारात्मक विचार टाळायला मदत करते. जर तुम्ही जगण्याचा एक मार्ग म्हणून सकरात्मकता स्वीकारली, तर ती तुमच्या जीवनात रचनात्मक बदल घडवून आणेल आणि जीवनाला अधिक आनंदी आणि अधिक यशस्वी बनवेल. सकारात्मक वृत्तीने तुम्ही तुमच्या जीवनाची उज्ज्वल बाजू पाहायला शिकता, आशावादी बनता आणि आयुष्यात काहीतरी सर्वोत्तम घडण्याची इच्छा निर्माण होते. ही मनाची आशादायक अवस्था आयुष्याचा विकास करण्यास नक्कीच योग्य आहे.

मनाची सकारात्मक बैठक तुम्हाला अनेक प्रकारे मदत करू शकते, जसे की, अपयशाची भीती न बाळगता तुम्ही यशाची अपेक्षा करू लागता. तुम्हाला मनातून एकप्रकारची प्रेरणा जाणवते. तुमच्या मार्गात कितीही अडथळे आले, तरी हार न मानण्याचे बळ ही सकारात्मकता देते. जीवनात आलेल्या अपयशाकडे आणि समस्यांकडे एक संधी म्हणून पाहण्यास ही सकारात्मक वृत्तीच प्रवृत्त करते. स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास दाखवण्यासाठी प्रोत्साहित करते. तुमच्यातला स्वाभिमान आणि आत्मविश्वास सक्षम करते. केवळ समस्यांकडे लक्ष न ठेवता तुम्ही समस्येवरील उपाय आपसुकच शोधायला लागता. तुम्ही आयुष्यात येणार्‍या संधी नेमकेपणाने ओळखता. अशाप्रकारे सकारात्मक दृष्टिकोन माणसाला आनंद आणि यशाकडे नेतो आणि त्याचे संपूर्ण जीवनच त्यामुळे बदलू शकते.

जीवनाची उजळ बाजू पाहता आली, तर तुमचे संपूर्ण आयुष्य प्रकाशाने भरून जाते. हा प्रकाश केवळ तुमच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला प्रभावित करीत नाही, तर तुमच्या वातावरणावर आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. ‘आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’ अशी काहीशी मनाची दृष्टी बनून जाते. जर ही वृत्ती पुरेशी मजबूत असेल, तर ती खरेच संसर्गजन्य बनते. जणू काही तुम्ही तुमच्या भोवती आनंदाचा प्रसन्न प्रकाश पसरवत राहता.

सकारात्मक दृष्टिकोन माणसाला आनंद आणि यशाकडे नेतो आणि त्याचे संपूर्ण जीवन बदलू शकते. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात आणि यश मिळविण्यात मदत करतो. तो तुमच्या जीवनाला अधिक प्रसन्न बनवतो. त्यातून तुम्हाला अधिक ऊर्जा मिळायला लागते. सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर तुमचा विश्वास वाढवतो आणि तुम्हाला उज्ज्वल भविष्याची आशा वाटायला लागते. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला कमी अडथळे जाणवतात आणि खरेतर अडचणी कमी यायला लागतात. तुम्हाला लोकांकडून अधिक आदर आणि प्रेम मिळायला लागतो. आयुष्यदेवता तुमच्यावर प्रसन्न व्हायला लागते.

सकारात्मकता म्हणजे नेहमी फक्त हसणे आणि आनंदी दिसणे याबद्दल नाही, तर सकारात्मकता म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा एकंदर दृष्टिकोन प्रगल्भ कसा बनवायचा आणि जीवनात जे काही चांगले आहे, त्यावर लक्ष केंद्रित कसे करावयाचे, या प्रवृत्तीमध्ये आहे.एवढी महत्त्वाची, परिणामकारक, जीवन बदलणारी सकारात्मक मानसिकता असण्याबद्दल काय ‘फिलोसॉफी’ आहे? जर तुम्ही तात्त्विक साहित्याचा अभ्यास केला तर तुम्हाला आशावाद, लवचिकता आणि सजगतेशी जोडलेले अनेक फायदे दिसतील. तुम्हाला कळेल की, जागरूकता आणि सचोटीचा जीवनाच्या चांगल्या गुणवत्तेशी संबंध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जे काही तुमच्या मार्गात अडचणी आणत असेल, त्यामध्ये तुमच्या स्वतःच्या त्याबद्दलच्या वृत्तीवर तुमचे नियंत्रण वाढवणे आहे.

 तुम्ही तुमचा ’मूड’ नियंत्रित करू शकत नाही आणि तुमच्या डोक्यात येणारे विचार तुम्ही नेहमी नियंत्रित करू शकत नाही. परंतु, तुम्ही ते विचार कसे हाताळाल, ते तुम्ही निवडू शकता. जीवनाला जसे आहे तसे स्वीकार करावयाची पद्धत आणि कृतज्ञता तुम्हाला ‘ओके लाईफ’पासून चांगल्या आयुष्याकडे घेऊन जाऊ शकते. सकारात्मक विचार ही कुठली जादू नाही आणि त्यामुळे तुमच्या सर्व समस्या चुटकीसरशी दूर होणार नाहीत. पण, यामुळे समस्या अधिक हाताळायला सोप्या वाटतील, आटोपशीर वाटतील आणि अडचणींचा प्रतिकार अधिक सकारात्मक आणि विधायक मार्गाने करण्यास मदत होईल.
आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणारे लोक सकारात्मक असतात. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा मूलभूत दृष्टिकोन सकारात्मक आहे. ते हसतात आणि जास्त हसतात, ते इतरांना दोष कमी देतात आणि विकास करणार्‍या बदलांना सामोरे जाण्यात ते चांगले पारंगत असतात. आकर्षणाचा नियम (लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन) असे सुचवितो की, आपण जे संकेत बाहेर वातावरणात पाठवत आहात, ते आपल्या जीवनाकडे परत आकर्षित होत राहतील. सकारात्मक लोकांच्या बाबतीतही हेच होते!
(क्रमश:)
 




-डॉ. शुभांगी पारकर





 
Powered By Sangraha 9.0