असं सुरू राहिलं तर मुंबईचा ही जोशीमठ होईल : आदित्य ठाकरे

17 Jan 2023 10:49:59
 
 
असं सुरू राहिलं तर मुंबईचा ही जोशीमठ होईल : आदित्य ठाकरे

मुंबई : युवानेता आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत दहा प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी पावसाच्या पाण्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांना उतारा म्हणून शिंदे-फडणवीस सरकराने ४०० किमीच्या रस्त्यांच्या नुतनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी साडेसहा हजार कोटींचा निधी मंजूर कऱण्यात आला आहे. यावरुन टीकास्त्र सोडले.
 
 
ते म्हणाले, "मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक राज्य आहे. स्थायी समिती, लोकप्रतिनिधी नसल्याने सर्व निर्णय राज्य सरकारच्या सहकार्याने पालिका प्रशासनाकडून घेतले जातात. साडेसहा हजार कोटींचा प्रस्ताव कोणी मंजूर केला? एवढा मोठा प्रस्ताव मान्य करताना स्थायी समिती, लोकप्रतिनिधी नव्हते. तरीही प्रशासकाने हा मोठा निर्णय घेतला."
 
 
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण वाढत आहे. या ४०० किमीच्या रस्त्यांमुळे कॉन्क्रिकिटीकरण वाढणार आहे. मुंबईचा जोशीमठ झाला तर याला जबाबदार कोण असा सवाल करत कोणत्याही शहरात एवढं कॉन्क्रिकिटीकरण होत नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
 
 
आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहरात कामांचा धडाका लावला आहे. पण मुंबई महापालिकेतील निविदा प्रक्रियेवर माझ्या आरोपानंतर BMC ने प्रेसनोट काढली. निविदा रद्द करण्याऐवजी प्रेसनोट काढून उत्तरं देण्याचा आयुक्तांनी प्रयत्न केला. पण मूळ प्रश्न राहतो ४०० किमी रस्त्यांचा प्रस्ताव दिला कुणी? ६ हजार कोटींचं काम प्रशासकाने मंजूर करणं किती योग्य? हे लोकशाहीला धरुन आहे का? बजेटमध्ये कसे दाखवणार? कामं तर मंजूर झाली पण ६ हजार कोटींच्या रस्त्यांची डेडलाईन ठरलीये का? असे सवाल उपस्थित करत आयुक्तांचं हे काम म्हणजे प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाचा अपमान आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0