मोठा मासा गळाला लागणार! : ‘कोरोना’ काळातील घोटाळ्यांची चौकशी होणार

15 Jan 2023 16:38:05
bmc
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी ताजी असतानाच, मुंबई महापालिकेसंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना ‘ईडी’ने समन्स बजावल्याची माहिती समोर येत असून, ’ईडी’ने चहल यांना सोमवार, दि. १६ जानेवारी रोजी चौकशीसाठी ‘ईडी’ कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचेही समजते. मुंबई महानगरपालिकेतील ‘कोविड टेंडर’ घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने चहल यांना समन्स बजावले असून सोमवारी कागदपत्रांसह सकाळी ११ वाजता ‘ईडी’ कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या विविध कामांच्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी मागील वर्षी आझाद मैदान पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांचेदेखील नाव पुढे आले आहे. तसेच, या प्रकरणाचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून, आता याच प्रकरणाचा समांतर तपास ‘ईडी’कडून देखील केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी आता पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची देखील चौकशी ‘ईडी’कडून केली जाणार असल्याचे समोर आले आहे.




Powered By Sangraha 9.0