‘द स्पेयर’...

14 Jan 2023 12:33:51
 
The spare
 
 
 
‘द स्पेयर’ हे पुस्तक नुकतेच म्हणजे मंगळवार, दि. 10 जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आले. अवघ्या काही दिवसांतच या पुस्तकाच्या लाखो प्रति संपल्या आणि 15 भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवादही झाला. या पुस्तकांमधून युकेचे प्रिन्स हॅरी यांनी त्यांच्या आयुष्याचा पट उलगडला. त्यांचे बालपण आणि त्यांच्या राजघराण्याचे संबंध, शाही कुटुंबातील वातावरण, त्यांच्या आईचा अपघाती मृत्यू, पत्नी मेगन मर्केल आणि भावविश्व याचबरोबर ब्रिटनच्या सैन्यासाठी काम करतानाचे अनुभव हेसुद्धा या पुस्तकात युवराजांनी शब्दबद्ध केले. ‘द स्पेयर’ पुस्तकाने ब्रिटनचे राजघराणे तर ढवळून निघालेच, पण अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीनेही या पुस्तकाची दखल वेगळ्या अंगाने घेतली आहे.
 
 
याचे कारण प्रिन्स हॅरी यांनी या पुस्तकात लिहिले आहे की, “अ‍ॅपाचे हेलिकॉप्टरमध्ये पायलट म्हणून काम करताना मी 25 तालिबानी सैनिकांना ठार मारले. कारण, ते तालिबानचे हस्तक प्यादे होते. मला त्यांच्या मृत्यूबाबत दुःखही वाटत नाही आणि आनंदही वाटत नाही.” अर्थात एक नाही, दोन नाही, तब्बल 25 तालिबानींना ठार मारले, असे खुद्द ब्रिटनच्या प्रिन्सने पुस्तकाच्या माध्यमातून का होईना सांगणे, हेच मुळात जगासाठी खळबळजनक. मात्र, यावर तालिबानी प्रशासनाने निंदा करत म्हटले की, ”25 तालिबानी सैनिक काही पटावरचे प्यादे नव्हते, तर ती माणसं होती आणि त्यांना कुटुंब होते. ते कुटुंब त्यांची वाट पाहत होते. हे सैनिक मारले गेले. त्यामुळे प्रिन्स हॅरी यांनी याबाबत खुलासा करावा आणि तालिबान हॅरी यांचा निषेध करत आहे.”
 
 
आता अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीने कुटुंंब आणि त्यांच्या स्नेहाबाबत बोलून कुणाच्या मृत्यूचा निषेध करावा, हेच मुळात आश्चर्यकारक. कारण, तालिबानी राजवटीने अफगाणिस्तानमध्ये जी काही अमानवी सत्ता सध्या राबवली आहे, ते पाहता तालिबानी प्रशासनाने प्रिन्स हॅरीला 25 सैनिकांच्या मृत्यूबद्दल प्रश्न विचारणे किती असंयुक्तिक आहे, असे काही जागतिक अभ्यासकांचे म्हणणे. मात्र, काहींचे म्हणणे असे की, हॅरी यांनी त्यांच्या लष्करी सेवेतील आठवणी आणि कार्य असे उघड करायला नको होते. तालिबानी राजवट काय किंवा जागतिक अभ्यासक काय, ‘द स्पेयर’मुळे सगळ्यांनीच आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
 
 
दुसरीकडे प्रिन्सने राजघराण्यातील वर्णभेदावरही चांगलीच टिप्पणी केली. असे करण्याची हॅरीची ही काही पहिली वेळ नाहीच म्हणा. यापूर्वीही एका टिव्ही शोवर प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांनी राजघराण्याशी संबंधित काही खळबळजनक विधान केली आहेत. त्यातील अत्यंत भयंकर विधान म्हणजे प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन जेव्हा गर्भवती होती, त्यावेळी राजघराण्यातील एका व्यक्तीने मेगनकडे चिंता व्यक्त केली होती. ती चिंता होती की, मेगनच्या होणार्‍या बाळाचा रंग कसा असेल? अश्वेत असेल का? जास्त अश्वेत असेल का? याबाबत पुढे मेगन यांनी असेही म्हटले की, राजघराण्यातील वर्णभेदामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य असंतुलित झाले. इतके की, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार करण्याची गरज भासली. मात्र, राजघराण्याच्या सदस्याचे मानसोपचार सुरू आहेत, ही गोष्ट राजघराण्याला शोभादायक नाही, म्हणत त्यांना हे उपचारसुद्धा नाकारण्यात आले.
 
 
मेगन यांची आई आफ्रिकन अश्वेतवर्णीयआणि पिता अमेरिकन श्वेतवर्णीय. वडील जरी श्वेतवर्णीय असले तरीसुद्धा मेगन यांना मिश्र संस्कृतीच्या दाम्पत्याची कन्या म्हणूनच राजघराण्यात पाहिले गेले, असेही मेगन यांचे म्हणणे. या सगळ्या खुलाशांमुळे ब्रिटनचे राजघराणे आणि तेथील वातावरण पुन्हा वर्णभेदाच्या गर्तेत सापडले आहे. काही वर्षांपूर्वीच प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी राजघराण्यातून मुक्त होत स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचा दावा केला होता. त्याप्रमाणे दोघे ब्रिटिश शाही परिवार सोडून अमेरिकेमध्ये राहायलाही गेले होते. त्यानंतर प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांच्याबाबत राजघराण्यानेही काही दावे केले. त्यातला प्रमुख दावा हा की, मेगन यांच्यामुळे राजघराण्यातील वर्षोनुवर्षे पिढीजात असलेले सेवक राजघराण्याची नोकरी सोडून जात आहेत. मेगन यांच्या त्रासाला कंटाळून, घाबरून त्यांनी नोकरी सोडली आहे. ‘द स्पेयर’मुळे या वादाला पुन्हा नव्याने तोंड फुटले. प्रिन्स हॅरीने केलेली बंडखोरी ब्रिटन राजघराण्याची डोकेदुखी ठरली आहे, हे नक्की. याचवेळी अनेक विचारवंत आणि मानवी हक्क कार्यकर्ते मात्र हॅरी यांचे अभिनंदन करत आहेत. त्यामुळे पुढे काय होणार, हे येणारा काळच ठरवेल!
 
 
Powered By Sangraha 9.0