अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची तज्ज्ञांसमवेत चर्चा

समन्वयातून संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

    14-Jan-2023
Total Views |
Narendra Modi


नवी दिल्ली : आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सायंकाळी अर्थतज्ज्ञांसमवेत संवाद साधला. येत्या १ फेब्रुवारी रोजी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी निती आयोग येथे देशातील अर्थतज्ज्ञांशी संवाद साधला.
जागतिक प्रतिकूल परिस्थितीत भारताचा विकास आणि लवचिकता या संकल्पनेवर ही चर्चा केंद्रित होती. जोखीम असूनही सध्याच्या जागतिक वातावरणात डिजिटायझेशन, ऊर्जा, आरोग्य सेवा आणि कृषी यासारख्या क्षेत्रात नवीन आणि वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या संधींचा लाभ घेण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांनी समन्वयाद्वारे चाकोरीबाहेरचा विचार करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
 
पंतप्रधानांनी डिजिटल भारताचे यश आणि देशभरात फिनटेकचा जलद अवलंब तसेच सर्वसमावेशक वाढ आणि विकासाची प्रशंसा केली. नारीशक्ती ही भारताच्या विकासाचे महत्वाचे बळ असल्याचा त्यांनी उल्लेख केला आणि कार्यबळात महिलांचा सहभाग सक्षम करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवण्याचे आवाहन केले.
बैठकीला उपस्थित असलेल्या तज्ञांनी भारत आपल्या विकासाची गती विवेकबुद्धीने कायम राखू शकेल असे व्यावहारिक उपाय सुचवले. कृषीपासून उत्पादनापर्यंतच्या विविध विषयांवर पंतप्रधानांबरोबर कल्पना आणि सूचना सामायिक करण्यात आल्या. जागतिक स्तरावर सध्याची प्रतिकूल परिस्थिती काही काळ कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन, भारताची लवचिकता आणखी मजबूत करण्यासाठी धोरणात्मक शिफारसी देखील करण्यात आल्या. भारताच्या लवचिकतेमुळे, अस्थिर जागतिक मंचावर भारत एक उज्वल भविष्याची आशा म्हणून उदयाला आला आहे याबाबत बैठकीत एकमत झाले. सर्व क्षेत्रांतील सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून या भक्कम पायावर नव्याने विकासाला चालना देण्याचे आवश्यक आहे अशी सूचना करण्यात आली. पंतप्रधानांनी अर्थतज्ज्ञांच्या सूचना आणि मते याबद्दल आभार मानले आणि त्यांच्या परिवर्तनात्मक कल्पनांच्या आदानप्रदानाद्वारे आपल्या राष्ट्राच्या विकासात मदत करण्याचे आवाहन केले.
भरड धान्य कृषी क्षेत्रात परिवर्तन घडविणार
यंदा सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षात ग्रामीण आणि कृषी क्षेत्राचे परिवर्तन घडवून आणण्याची भरड धान्याची क्षमता लक्षात घेऊन, कार्बन न्यूट्रल, नैसर्गिक शेतीसाठी अनुकूल, आणि पोषणाचा किफायतशीर स्रोत अशा वैशिष्ट्यांनी युक्त भरड धान्याला प्रोत्साहन देण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.