जगभरातील सर्वोत्कृष्ट 60 व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे असलेला एक मोठा ग्रंथ 1995च्या दरम्यान प्रकाशित झाला होता. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथात केवळ दोनच भारतीय व्यंगचित्रकारांचा समावेश होता. त्यातील एक नाव म्हणजे ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रेष्ठ अर्कचित्रकार आणि बुजूर्ग रेखांकनकार प्रभाकर वाईरकर. कोकणचे सुपुत्र आणि स्वयंभू शैली निर्माण करणारे दृश्यकलाकार...
आजच्या अनेक नियतकालिकांमध्ये आचार किंवा लोणच्याची भूमिका बजावणारे काय असते, असा प्रश्न पडला तर त्याचं उत्तर असतं, व्यंगचित्र वा कार्टून. हातात नियतकालिक घेतल्यानंतर त्या दिवसातील महत्त्वाची घडामोड पटकन शोधायची असेल, तर त्या नियतकालिकातील व्यंगचित्र पाहणे योग्य ठरते. इतकं महत्त्व व्यंगचित्रांमध्ये असतं. काल घडलेली, मानवी आस्था पूरक किंवा मानवी आस्थांना बाधा आणणारी घटना, अत्यंत मोजक्या परंतु प्रभावी रेखांकनाद्वारे संकलित केलेली असते. ही चित्रचौकट किंवा ही चित्रपट्टी म्हणजे त्या नियतकालिकातील चवीने पाहिली जाणारी बाब असते. अर्थात, अशी व्यंगचित्रे ही अत्यंत प्रभावी असतात. अशा रेखांकन प्रकारांना कालावधीची अट नसते. ही व्यंगचित्रे भविष्यात कधीही पाहिली, तरी त्यांचं अस्तित्व जाणवतंच.
अर्कचित्र, व्यंगचित्र आणि रेखाचित्र या तीन प्रमुख रेखांकन प्रकारांवर हुकूमत असणारे दृश्यकलाकार फार क्वचितच पाहायला मिळतात. दृश्यकलाकार प्रभाकर वाईरकर हे या तीनही प्रकारांचे सिद्धहस्त साधक आहेत. स्वित्झर्लंड येथे झालेल्या 1987च्या ‘इंटरनॅशनल कॉमिक फेस्टिवल’मध्ये वाईरकरांची जी चित्रे झळकली, त्यानंतर ‘वाईरकर’ नावाची ‘स्टाईल’च सुरू झाली.
जगभरात त्यांना ओळख मिळाली, ती त्यांच्या चपखल आणि अचूक शैलीमुळे. 2002 साली दूरदर्शनने भारतातील नामवंत व्यंगचित्रकारांवर शृंखला चालवली होती. या मालिकेतील एक संपूर्ण भाग हा ‘वाईरकर’ ओळख सांगणारा होता. त्यांना खास वेळ घेऊन भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. कुठलाही अभिनिवेश नाही, कुठलाही अतिगंड नाही, मोठेपणाचा आव नाही. समक्ष भेटून बोलण्याची ती आमची पहिलीच वेळ होती. परंतु, ती भेटदेखील पहिली भासली नाही. समोरची व्यक्ती ज्या क्षेत्रातील असेल, त्या व्यक्तींचा आणि त्यांचा फार जुना परिचय असावा, असे तिसर्याच व्यक्तीला वाटू शकेल, इतका आरोग्यसंपन्न संवाद सुरू असतो. हे त्यांच्याशी बोलताना जाणवत होते. डोळ्यांमधील शोधकपणा, नजरेतील भेदकता आणि निरीक्षण क्षमतेचं भांडार वर्णन करता येईल.
कोकणातील मालवण तालुक्याच्या कट्टा या गावी 1951 साली वाईरकरांचा जन्म झाला. मुंबईच्या त्यावेळच्या सुप्रसिद्ध आणि विश्वविख्यात ‘सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट’ येथे 1977 साली त्यांनी ‘अप्लाईड आर्ट’ची पदविका पूर्ण केली. त्यांच्या सिद्धहस्त कामामुळे त्यांना अनेक ठिकाणी, अनेक क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली. ‘सौभाग्य’, ‘त्रिकायाग्रे’, ‘सिस्टास’, ‘रेडीफ्युजन’, ‘वाय अॅण्ड आर सून’ अशा नामवंत जाहिरात संस्थांमध्ये त्यांनी त्यांच्या ‘कल्पना’ रेखांकित केल्या.
‘रेडिफ्युजन’मध्ये तर एका जाहिरात मोहिमेत त्यांनी प्रथम अर्कचित्रे-व्यंगचित्रे रेखांकित केली आणि सार्या जाहिरात इंडस्ट्रिजला एका नवीन जाहिराती माध्यम घटकाचा जणू शोधच लागला. वाईरकर नावाचं कोकणी वादळ ‘वादळी’ विषयांवर खुसखुशीत आणि मार्मिक व्यंग शोधत जेव्हा समकालीन नियतकालिकांत व्यंगचित्रे देऊ लागलं, तेव्हा खूपदा त्या दिवसांची नियतकालिकांची विक्रीदेखील सकारात्मक आकडा पार करत असे.
इतकी जादुई करामत फार क्वचित व्यक्तींना साधते. असामान्य आणि पराकोटीचं काम करणारी व्यक्ती अगदीच सामान्यपणे राहू शकते, याचं उदाहरण म्हणजे प्रभाकरजी वाईरकर होय.
‘इंडियन एक्सप्रेस’, ‘द टाईम्स ऑफ इंडिया’, ‘द. संडे ऑब्जझरवर’, ‘द इंडिपेंडंट’, ‘द इंडियन पोस्ट’, ‘बिझनेस वर्ल्ड,’ ‘ब्लिटस्’, ‘द डेली स्पोर्टवर्ल्ड’, ‘डेबोनीयर’, ‘एकच षट्कार’, ‘मिड-डे’, ‘क्रिकेटवॉच’, ‘आपले महानगर’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’, ‘लोकप्रभा’, ‘मार्मिक’ अशा एकाहून एक प्रतिष्ठित नियतकालिकांनी स्वत:ला, ‘वाईरकर शैली’ने सजविलेले आहे.
अनेक ठिकाणी कार्यशाळा, व्याख्याने, कलाप्रदर्शने अशा कार्यक्रमांसह प्रात्यक्षिकांचे, योगदान त्यांच्या नावे आहे. शिवाय ‘जस्ट डुडलिंग’, ‘बॉडीलाईन’, ‘कॅरी-टून्स’, ‘लाईफ इलस्ट्रेटेड‘, ‘फन्कार-ए-कॅचरी’ अशा काही पब्लिकेशन्सची त्यांच्या नावे नोंद आहे.
अनेक विषयांवर अनेक अंगांनी-कोनांनी-दृष्टिकोनांनी गप्पा सुरू होत्या. काल-परवा घडल्याप्रमाणे वाईरकर सर सांगत होते. ‘हिंदुहृदयसम्राट’ ओळख मिळण्यापूर्वीपासूनचे बाळासाहेब ठाकरे यांच्या अगदी ‘लोकसत्ते’च्या विद्याधर गोखले या श्रेष्ठ संपादकांपर्यंत अनेक महान व्यक्तींचे सहवास त्यांना लाभले, ते केवळ त्यांच्या रेखाचित्रणे आणि व्यंगचित्रांमुळे. समोरच्या व्यक्तीचं अचूक निरीक्षण तितक्याच अचूकतेने कागदावर साकारणं, ही वाईरकरांची जहागिरीच! त्यासाठी त्यांचा हात कुणी पकडू शकणार नाही. एखाद्या खर्या ‘प्रीडिक्शन’ करणार्या ज्योतिषाला जशी अगदी नवमांश कुंडली पाहून समोरच्या व्यक्तीबद्दल सांगता येते, त्याचप्रकारे मात्र दृश्यकला प्रकारांद्वारे प्रभाकर वाईकरांच्या ‘नेत्रकटाक्षांनी’ समोरच्याचा वेध घेतला की, कागदावर समोरच्याचा ‘अर्क’च उतरतो. हे लिहायला सोप्पं वाटतं, मात्र प्रत्यक्ष त्या गतीपर्यंत पोहोचण्यासाठी वाईकरांसारख्यांचाच जन्म व्हावा लागतो.
षड्रिपूंना पकडणारा दृश्यकलाकार जेव्हा व्यंगचित्रकार असतो, तेव्हा ज्याचं ते व्यंगचित्र असतं, तो पूर्णपणे ‘सरेंडर’ झालेला असतो. कारण, त्याची प्रकृती, स्वभाव, ‘मूड’, चेहर्यावरील असलेले आणि आणलेले भाव सारं सारं ‘वाईरकरी’शैलीने जाम पकडलेले असतात. हजारो चित्रांकने, हजारो अर्कचित्रे, शेकडो नियतकालिकांद्वारे लाखो वाचकांपर्यंत पोहोचवून, समाजातील कटूप्रसंग समाजातील कठीण प्रसंग, समाजकारण आणि राजकारण या द्वंद्वातील प्रसंग आणि बरंच काही अत्यंत चपखलपणे मांडून, कठीण प्रसंगांना, तणावांना, अडचणींना हळूच सांगून, वातावरणातील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीला चित्रांकनांद्वारे सांगण्याचं भगीरथकार्य ज्येष्ठ दृश्यकलाकार वाईरकरांकडून सुरू आहे. खरंतर येणार्या दि. 26 जानेवारीला किंवा पुढील येणार्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जसे ‘पद्म’ पुरस्कार जाहीर होऊन मा. राष्ट्रपती यांच्या शुभहस्ते प्रदान केले जातात, अशा ‘पद्म पुरस्कारां’च्या नावाच्या यादीत ‘प्रभाकर वाईरकर’ यांचं नावं वाचायला मिळायला हवं, इतकं मोठं वादातीत सृजनात्मक, दृश्यकलाकार त्यांचं आहे. त्यांच्या शैलीच्या-तंत्रांच्या आणि रेखांकनासह प्रदीर्घ मोठा कलाप्रवास एका लेखात पूर्ण होणं केवळ अशक्यच...
काही व्यक्तीच अशा असतात की, त्यांना जर एखादा ‘पुरस्कार’ प्रदान केला गेला, तर तो ‘पुरस्कार’च मोठा होतो, इतक्या मोठ्या त्या व्यक्ती असतात. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर हे अशाच व्यक्तींपैकी एक! त्यांना सुदृढ आरोग्यदायी दीर्घायुष्य चिंतनाच त्यांच्या अर्क चित्रांकन करणार्या कुंचल्यालाही चिरंजीवी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा!
- प्रा. डॉ. गजानन शेपाळे