मकरसंक्रांती खगोलशास्त्र आणि संस्कृतीचा संगम

    14-Jan-2023
Total Views |
Makar Sankranti


१४ जानेवारीला धनु राशीतून मकर राशीत होणारे सूर्याचा प्रवेश आपण मकरसंक्रांत या सणाच्या रूपाने साजरा करतो. इतर भारतीय सण हे तिथीवर म्हणजे चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून आहे, तर संक्रांत हा सण सूर्याच्या राशी प्रवेशावर ठरतो. ही खगोलीय घटना दरवर्षी १४/१५ जानेवारीला होते आहे म्हणून हा एकमेव सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरा केला जातो.


भारतीय संस्कृतीतील सण-उत्सव एकाच वेळी अनेक पैलूंचे दर्शन घडवत असतात. या सणांच्या प्रथांमधून धार्मिकतेबरोबर निसर्गाशी समन्वय, ऋतुचर्येनुसार आहारविहार, नात्यांची बांधणी अशा अनेक गोष्टी आपसूकच घडत असतात. वर्षभरातील सगळ्या सणांत मकरसंक्रांती हा सण धार्मिकता, निसर्गपूरकता याचबरोबर खगोलशास्त्राशी थेट सांगड घालतो. म्हणूनच इतर सगळ्या सणांत इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणून मकरसंक्रांती वेगळी ठरते. भारतात प्रांतानुसार, संक्रांतीला विविध नावे आहेत. पंजाबमध्ये ‘लोहडी’, आसाममध्ये ‘भोगाली बिहु’, काश्मीर खोर्‍यात ‘शिशुर संक्रात’, उत्तर भारतात ‘खिचड़ी संक्रांत’, बंगालमध्ये ‘तिळुआ संक्रांती’, गुजरातमध्ये ‘उत्तरायण’ या नावांनी हा सण साजरा केला जातो.



 तामिळनाडूत यानिमित्त तीन दिवस चालणारा ‘पोंगल’ असतो. पहिल्या दिवशी इंद्राप्रीत्यर्थ ‘इंद्रपोंगल’, दुसर्‍या दिवशी सूर्याप्रीत्यर्थ ‘सूर्यपोंगल’ आणि तिसर्‍या दिवशी गायीसाठी ‘मट्टपोंगल’ साजरा केला जातो. येथील प्रसिद्ध जलिकट्टू खेळही यादरम्यानच खेळला जातो. महाराष्ट्रातदेखील हा सण ‘भोगी’, ‘संक्रांत’ आणि ‘किंक्रांत’ अशा तीन दिवसांत साजरा केला जातो.

‘संक्रांती’ हा शब्द ‘संक्रम’ या पहिल्या गणातील उभयपद धातूपासून तयार झाला आहे. प्रवेश करणे, एकत्र येणे, ओलांडून जाणे, आदानप्रदान करणे, पुढे नेणे अशा अनेक अर्थांनी हे क्रियापद वापरले जाते. धार्मिकदृष्ट्या सूर्याचे एका राशीतून दुसर्‍यात जाणे म्हणजे संक्रांती होय. रवे: संक्रमणं राशौ संक्रान्तिरिति कथ्यते। स्नानदानतप:श्राद्धहोमादिषु महाफला।-हेमाद्रि नागरखंड.

सूर्यसंक्रमणाचा काळ विशेष पुण्यदायक मानून शास्त्रकारांनी स्नान, दान, तो श्राद्ध, यज्ञ इत्यादी धार्मिक क्रियांसाठी प्रशस्त मानला. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असली तरी पृथ्वीवरून आपल्याला सूर्य पृथ्वीभोवती वर्तुळाकार मार्गावरून जात असल्याचे भासते. सूर्याचा हा भासमान मार्ग म्हणजे क्रांतिवृत्त होय. क्रांतिवृत्ताच्या पार्श्वभूमीवर असणार्‍या १२ तारकासमूहातून सूर्याचे हे भ्रमण दिसत असल्याने ते महत्त्वाचे ठरत त्यांना १२ राशी म्हटले गेले. सूर्य या राशीत असल्याचे आपल्याला दिसत असले तरी प्रत्यक्षात हे तारकासमूह सूर्यापासून अत्यंत दूर आहेत.१४ एप्रिलला सूर्य निरयन राशी चक्राच्या आरंभ स्थानी येत मेष राशीत प्रवेश करतो. ही ‘मेष संक्रांत’ होय. पुढील ३० दिवसांत ३० अंश अंतर पार करत १४ मे ला वृषभ संक्रांतीत सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या १२ राशी प्रवेशाच्या १२ संक्रांती वर्षभरात होतात.

भारतीय धर्मशास्त्रात संक्रांतीला इतके महत्त्व आहे की, ज्या चांद्र महिन्यात असे सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो मलमास म्हणून शुभकार्याला वर्ज्य मानला जातो. धर्मशास्त्रांप्रमाणे यातील वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ या चार संक्रांतीना ‘विष्णूपद’ असे नाव आहे, तर मिथुन, कन्या, धनु , मीन या चार संक्रांतींना ‘षडशीति’ म्हटले जाते. मेष व तूळ या दोन संक्रांतींना ‘विषुवसंक्रांती’ आणि कर्क, मकर या संक्रांतींना ‘अयनसंक्रांती’ अशी नावे आहेत. या चार प्रकारच्या संक्रांतीत विष्णूपद संक्रांतीहून षडशीति-संक्रांती, षडशीतिपेक्षा विषुव आणि विषुवसंक्रांतीपेक्षा अयन संक्रांत या अधिक पुण्यप्रद आहेत, असे शास्त्रांनी म्हटले आहे. त्यातही कर्क संक्रांतीपेक्षा मकर संक्रांती अधिक श्रेष्ठ आणि पुण्यप्रद मानली गेली आहे. हा १४ जानेवारीला धनु राशीतून मकर राशीत होणारे सूर्याचा प्रवेश आपण मकरसंक्रांत या सणाच्या रूपाने साजरा करतो. इतर भारतीय सण हे तिथीवर म्हणजे चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून आहे, तर संक्रांत हा सण सूर्याच्या राशी प्रवेशावर ठरतो. ही खगोलीय घटना दरवर्षी १४/१५ जानेवारीला होते आहे म्हणून हा एकमेव सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरा केला जातो.




Makar Sankranti



१२ संक्रांतींपैकी फक्त मकरसंक्रांतीला महत्त्व का, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सूर्याचे अयन समजून घेणे गरजेचे ठरते. पृथ्वीच्या २३.५ अंशांनी केलेल्या अक्षामुळे झुकावामुळे सूर्याची किरणे सगळीकडे सारखी पडत नाहीत. सहा महिने पृथ्वीचा उत्तर गोलार्ध आणि पुढील सहा महिने दक्षिण गोलार्ध सूर्याजवळ असतो. परिणामी वर्षभरात सूर्य काही काळ उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकताना दिसतो. २१ जून ते २२ डिसेंबर हा काळ म्हणजे ‘दक्षिणायन’ तर २२ डिसेंबर ते २१ जून हा काळ ‘उत्तरायण’ म्हणून ओळखला जातो. २२ डिसेंबर रोजी सूर्य त्याच्या दक्षिणतम बिंदूवर असून यावेळी सगळ्यात मोठी रात्र आणि सगळ्यात लहान दिवस असतो. यानंतर हळूहळू सूर्य उत्तरेकडे सरकायला लागत ‘उत्तरायण’ सुरू होते. दिवस हळूहळू मोठे व्हायला लागत थंडी कमी होऊ लागते.



उत्तर गोलार्धात यावेळी थंडी असल्याने २२ डिसेंबरनंतर दिनमान वाढणे, सूर्याची उष्णता वाढणे या गोष्टी शेती, पशुपालन आणि दैनंदिन जीवनात कार्यक्षमता वाढवायला अनुकूल ठरतात. म्हणून अगदी प्राचीन काळापासून उत्तर गोलार्धातील बहुतांश संस्कृतीत २२ डिसेंबर हा उत्सव म्हणून साजरा होत असे. नवाश्मयुगात हा अयन दिन मोजण्यासाठी विविध स्मारके बनवली गेली. प्राचीन रोमन संस्कृतीत ‘सॅर्टनालीया’, इराणमध्ये ‘शब-ए-यल्दा’, चीनमध्ये ‘डाँगझी’, जपानमध्ये ‘तोजी’ या नावाने ‘उत्तरायण’ साजरे केले जात असत.


भारतीय संस्कृतीत ‘उत्तरायण’ हा देवांचा दिवस, तर दक्षिणायन देवांची रात्र मानली जाते. म्हणून उत्तरायणाच्या आरंभाचे देवांच्या दिवसाची सुरुवात म्हणून वैदिक काळात मोठे महत्त्व होते. उत्तरायणाचा आरंभी प्राचीन भारतात विशिष्ट यज्ञयागादि कृत्ये केली जात असत. महाभारतात शरपंजरी पडलेल्या भीष्मांनी उत्तरायणाचे महत्त्व ओळखून उत्तरायण सुरू होईपर्यंत प्राण थोपवून धरले होते. इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या आसपास २२ डिसेंबर रोजी उत्तरायण होत असताना सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असे. यामुळे उत्तरायण आरंभाचा सूर्याच्या मकरसंक्रमणाशी संबंध जोडून हा उत्सव म्हणून साजरा होऊ लागला. थंडीपासून बचाव करण्यासाठी तीळगूळ यांसारखे उष्ण पदार्थ खाणे, काळे कपडे घालणे अशा प्रथा सुरू झाल्या. कृषी संस्कृतीच्या साहचार्‍यातून याकाळात शेतात पिकलेले धान्य, फळे देवाला अर्पण करून एकमेकांना वाण देणे सुरू झाले.


पुराणकथांनुसार, एकदा तिलासूर नावाचा राक्षस ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झाला. तेव्हा त्रस्त झालेले देव ब्रह्मदेवाने सूचवल्याप्रमाणे सूर्यलोकी गेले. तेव्हा सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत होते. सूर्याच्या तेजापासून एक भयानक देवता उत्पन्न झाली. लांब ओठ, दीर्घ नाक, मोठे शरीर, नऊ हात अशा रूपातील या संक्रांती देवीने विविध वाहनावर बसून हातात विविध आयुधे घेतली आणि तिलासूराचा वध केला. म्हणून संक्रातीला सूर्य आणि संक्रांतीदेवीचे पूजन केले जाते. तसेच, देवीने तिलासुराला दिलेल्या वरदानानुसार, या दिवशी विविध कार्यात तीळाचा उपयोग केला जातो. मकर संक्रांतीला पर्वकाळ मानून शास्त्रांनी या दिवशी स्नान, दान, श्राद्ध, यज्ञ इत्यादी कर्मे सांगितली आहेत. भगीरथाच्या पूर्वजांचा उद्धार करून गंगा याच दिवशी समुद्राला मिळाली होती, अशी मान्यता आहे. म्हणून या दिवशी गंगेत आणि विशेषतः गंगासागर इथे स्नान करण्याचे महत्त्व आहे. संक्रांतीला गंगेच्या काठावर हरिद्वार, प्रयाग, गंगासागर या ठिकाणी प्रचंड मेळे भरतात. सुनाग नामक ऋषींनी जाबाली ऋषींना संक्रांतीचे माहात्म्य सांगताना या दिवशी पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध आणि तर्पण करावे, असे सांगितले आहे. संक्रांतीला तीळाचे महत्त्व अधिक आहे.


तिलस्नायी तिलोद्वर्ती तिलहोमी तिलोदकी ।तिलभुक् तिलदाता चषट् तिलाः पापनाशकाः ॥



अंगाला तिळाचे उटणे लावणे, तिलोदकानें स्नान करणे, तीळांची यज्ञात आहुती देणे, तिलोदकानें पितरांना तर्पण करणे, कांस्यपात्रांत तीळ व तूप भरून ते दान देणे आणि तीळाचे पदार्थ करून ते खाणे अशा सहा प्रकारांनी तीळाचा उपयोग करावा.
या संक्रांतीदेवीला सूर्याच्या गतीचे प्रतीक म्हणून शक्ती देवता मानतात. तिला मंदा, मंदाकिनी, ध्वान्क्षी, घोरा, महोदरी, राक्षसी व मिश्चिता अशी सात नावे आहेत. दरवर्षी तिचे नाव वाहन, उपवाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण, लेपन येण्याची-जाण्याची दिशा वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना असणारा वार, नक्षत्र, करण यावरून या गोष्टी ठरतात. त्याप्रमाणे संक्रातीचे चित्र आणि फल दरवर्षी पंचांगात दिले असते. तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात, त्या नष्ट वा महाग होतात. तसेच, ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते, अशी समजूत आहे. संक्रांतीच्या अशा भयप्रद रूपामुळे आणि कदाचित १७६१ मध्ये संक्रांतीच्या सुमारास झालेल्या पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील भीषण हानीमुळे विशेषतः महाराष्ट्रात संक्रांत अशुभ मानली जाते.



’संक्रांत येणं’ या म्हणीचा अर्थ आपल्यावर एखादे संकट येणे, असा मानला जातो आणि यामुळे संक्रांतीविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा समाजात पसरतात. वास्तविकता शास्त्रानुसार संक्रांती अशुभ नाही. उलट ‘विशेष पुण्यकाळ’ म्हणत शास्त्रांनी संक्रातीचा गौरव केला आहे.पृथ्वीच्या परांचन गतीमुळे कोणेकाळी दि. २२ डिसेंबरला होणारे मकर संक्रमण सध्या १४/१५ जानेवारीला येते आहे. पृथ्वीचा कललेला अक्ष डोलत २५७७२ वर्षांत एक वर्तुळ पूर्ण करतो. या गतीमुळे वसंत संपात बिंदू आणि निरयन राशीचक्राचा आरंभ बिंदू यांच्यातील अंतर असेच वाढत जाऊन मकरसंक्रांतीदेखील हळूहळू पुढे सरकत आहे. ४०० वर्षांत मकरसंक्रांत सरासरी ५.५ दिवस पुढे जाते. २१०० पासून संक्रांती १६ तारखेला येईल. भविष्यात संक्रांती उन्हाळ्यात येऊ लागेल आणि या सणाच्या प्रथांचा ऋतूचक्राशी संबंध उरणार नाही. भारतीय सणवार हे निसर्गातील बदलांना विचारात घेऊन आखले गेले आहे. यामुळे संक्रांतीला सांगितलेल्या रूढी २२ डिसेंबरपासूनच करायला सुरुवात करणे हेच भारतीय संस्कृतीचे प्रवाहीपणा जपण्याच्या दृष्टीने योग्य ठरेल!




विनय जोशी