मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्यजीत तांबे या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सत्यजीत तांबे हे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांचे पुत्र आहेत. ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील युवा अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख आहे. सत्यजीत तांबे हे २००० सालापासून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी NSUI च्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेला. २००७ साली अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी सदस्य म्हणून जिल्हा परिषदेत त्यांची एंट्री झाली होती. २०१८ साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले होते. राहुल गांधींच्या जवळचे नेते अशीही तांबेंची ओळख आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेचे २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून सत्यजीत तांबे यांनी काम केलं आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील सत्यजीत तांबे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सत्यजीत तांबे यांच्याकडे युवक काँग्रेसचं अध्यक्षपद आल्यानंतर त्यांनी राज्यभर युवकांचं संघटन केलं होतं. युवक काँग्रेसमार्फत त्यांनी राबवलेलं चलो पंचायत अभियान चर्चेत आलं होतं.
त्यांच्या पत्नी डॉ. मैथिली आणि मुलं अहिल्या, सूर्या यांच्यासोबतचे अनेक आनंदी क्षण ते सोशल मीडियावर शेअर करतात. मामा बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या मुलींसोबतही ते प्रत्येक सणाला, सुखदु:खाच्या क्षणी सोबत दिसतात. सध्या सत्यजीत जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रीय आहे. डॉ. सुधीर तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघातून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांच्या आई दुर्गाताई तांबे या संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आहेत.
सत्यजीत तांबे हे जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नगररचना, नागरी व्यवस्थापन यासंदर्भातील त्यांचं सिटीझनविल हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. सेंटर फॉर इंडिया इंटरनॅशनल रिलेशन्स या संस्थेचे ते अध्यक्ष देखील आहेत.काही वेळा सत्यजीत तांबेंची बंडखोर भूमिका, त्यांचे आक्रमक विचार समोर आले होते. सत्यजीत तांबेंची ही वाटचाल भाजपातील त्यांच्या प्रवेशाची नांदी म्हणायची की काँग्रेसला दिलेला शह हे काही दिवसात स्पष्ट होईलच. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी ट्विस्ट आणला आहे त्याची चर्चा पुढचे अनेक दिवस सुरू राहील यात वाद नाही.