भाजपसोबत असलेल्या कुठल्याही पक्षासोबत युती नाही : प्रकाश आंबेडकर

12 Jan 2023 18:53:29



भाजपसोबत असलेल्या कुठल्याही पक्षासोबत युती नाही : प्रकाश आंबेडकर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात काल बुधवारी रात्री झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकर शिंदे गटासोबत युती करणार का? असा सवाल त्यांच्या भेटीनंतर उपस्थित झाला. पण, या चर्चांना प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पुर्णविराम दिला. यावेळी त्यांनी स्पष्टचं सांगितले की, "भाजपसोबत ज्या पक्षासोबत आहे. त्यांच्याशी आमची कधीच युती होणार नाही. त्यामुळे आमची युती एकनाथ शिंदे गटाशी होणार नाही. आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत होणार आहे. उद्धव ठाकरे आणि माझ्यात त्याबाबत कमिटमेंट झाली आहे. फक्त जाहीर होणं बाकी आहे."
 
 
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल भेट झाली. यावेळी बऱ्याच गोष्टी चर्चेत आल्या. पण पक्षाची आमची जी भूमिका आहे ती ठाम आहे. आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. शिवसेनेसोबतच निवडणुका लढवायच्या आहेत. त्यात बदल होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याबाबत सांगितलं आहे. पण आमचं भाजप आणि संघासोबत व्यवस्थेचं भांडण आहे. जी व्यवस्था आम्ही उद्ध्वस्त केली. तीच भाजप आणू पाहत आहे. त्यामुळे आम्ही भाजप सोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आमचं तात्त्विक भांडण आहे."
 
 
"शिंदेंसोबत सतत भेट होईल. पण राजकीयच भेट असेल असं नाही. ही भेट इंदू मिल संदर्भात होती. या स्मारकाची संकल्पना आणि तिथे जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र उभं राहावं, अशी भूमिका त्यांनी सातत्याने घेतली होती. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती." अशी माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
Powered By Sangraha 9.0