मुंबई : मुंबई महापालिकेकडून अनेक योजना या मुंबईकरांसाठी राबवण्यात येतात. त्यातीलच एक योजना म्हणजे 'आपली चिकित्सा' योजना. परंतु या योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीने मुंबई महापालिकेची आणि मुंबईकरांची लूट केल्याचे भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी म्हटले असून याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुंबई महापालिका प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांना लिहिले आहे.
सध्या सुरू असलेल्या करारामध्ये कंपन्या महापालिकेकडून एका व्यक्तीच्या चाचणीसाठी २०० रूपये घेतात. परंतु नवीन पात्र कंपनीने ८६ रूपये दर देऊ केला आहे. तसेच या अगोदर महापालिकाने चाचणी न करतासुद्धा किमान चाचणीची दर दिवशीची हमी रक्कम अदा केली आहे. त्यामुळे पुर्वीच्या कंपनीला महिन्याला लाखो रूपयांचा फायदा झाला आहे आणि त्यामुळे त्यांनी सदर योजनेची कोणतीही प्रभावीपणे जाहीरात केली नाही. यामुळे ‘आपली चिकीत्सा’ योजनेची व्याप्ती खुपच मर्यादीत होती व तिचा लाभ कंपनीला आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना झाला असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी आपल्या पत्राद्वारे म्हटले आहे.
तसेच यावरून हे सिद्ध होते की आधी पूर्वीच्या कंपन्या मनपा अधिकार्यांच्या संगनमताने प्रति व्यक्ती २०० रुपये आकारून बीएमसीची लूट करत होत्या ! म्हणजे ही योजना पुर्वी ‘आपली चिकित्सा’ योजना नसून ‘आपली टक्केवारी’ योजना उद्धवसेनेने करून ठेवली होती. या गोरगरीब रूग्णांनाच्या योजनेतही घोटाळे करणे खरतंर ही लाजीरवाणी बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान २०० रूपयांवरून ८६ रूपये ही मोठी कपात आहे. या कपातीचा प्रत्यक्ष फायदा मुंबईतील नागरिकांना झाला पाहिजे. आता मुदलातच दर कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना चाचणीला ५० रूपये न आकारता १० रूपयाची चाचणी फी आकारली पाहिजे. जेणेकरून सर्वसामान्य मुंबईकर, गोरगरीबांना याचा फायदा होईल असे म्हणत आपणास सुद्धा हे सिद्ध करण्यास संधी मिळेल की मुंबई महानगर पालिका ही कंत्राटदारांना, अधिकाऱ्यांना व उद्धवसेनेला ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’ नाहीतर सर्वसामान्यांचा विचार करणारी मुंबई महानगर ‘पालिका’ आहे असेही प्रभाकर शिंदे यांनी आपल्या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
यासोबतच इतर कंपन्यांच्या व टक्केवारीखोरांच्या दबावाला बळी पडू नका आणि ही निविदा पुन्हा काढू नका, सामान्य मुंबईकरांना याचा फायदा मिळू द्या अशी विनंतीही कुमार यांनी प्रशासक चहल यांना केली आहे.