तरुण पिढीचे देशासाठी योगदान - युवा दिन चिंतन

    11-Jan-2023
Total Views |
स्वामी विवेकानंद


दि. १२ जानेवारी रोजीच्या स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनातून दिलेला संदेश व त्या संदेशाच्या माध्यमातून देश घडवण्याच्या प्रक्रियेतील युवा पिढीचे योगदान, यावरील चिंतनात्मक लेख...


नमः श्रीयतिराजाय विवेकानंदसूरये
सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे


भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि उपासक स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिवस, ‘जागतिक युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. गुरुवार, दि. १२ जानेवारी, स्वामीजींची १५८ वी जयंती. केवळ ३९ वर्षे आयुष्य लाभलेल्या स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला खूप मोठं तत्वज्ञान दिलं आणि तरुणाईसाठी मोलाचं मार्गदर्शन प्रदान केलं. दि. ११ सप्टेंबर, १८९३ रोजी शिकागो येथील विश्व धर्म संमेलनात ‘विश्व बंधुत्वाचा’ संदेश देऊन संपूर्ण जगात हिंदू संस्कृतीची महती विशद करणार्‍या स्वामीजींचे विचार आजही शाश्वत आहेत.

कामासाठी वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे. विचारासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या, कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचण्यासाठी वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाया आहे आणि स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे दुसर्‍यासाठी वेळ द्या कारण ते नसतील, तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार.उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त होत नाही.” हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला.

वर्तमान पीढीसाठी स्वामीजी एक प्रेरणास्रोत आणि ‘युथ आयकॉन’ आहेत.त्यांनी ‘लक्ष्य आधारित जीवन’ या तत्त्वाचा पुरस्कार केला. स्वामीजींचा विचार समग्र व्यक्ती विकास हा होता. ज्यात ‘मनुष्य निर्माण’ म्हणजेच ‘राष्ट्र निर्माण’ ही संकल्पना होती. यात व्यक्तिचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक विकास अपेक्षित होता.आपल्या भारताबद्दल एक गोष्ट नेहमीच बोलली जाते ती म्हणजे भारत हा तरुणांचा देश आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या उद्बोधनात कायम याचा उल्लेख करतात. कारण, युवापिढी या देशाचे वर्तमान आणि भविष्य आहे. भारताच्या लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्ष वयाच्या खालची आहे. जी जगातील इतर देशांच्या तुलनेत मोठी आहे.म्हणजेच भारत एक तरुण देश आहे, असे म्हणायला हरकत नाही. तरुण पिढीकडून देशाला खूप अपेक्षा आहेत पण त्या पूर्ण करण्यासाठी तरुणाई सज्ज आहे की नाही?

तरुण पिढीने वेगवेगळ्या क्षेत्रात काय करणे अपेक्षित आहे, जेणेकरून या देशाला तरुणाईचा खर्‍या अर्थाने फायदा होईल. तरुणाईला योग्य दिशा मिळाल्यास निश्चितच त्यांचे योगदान वाढून योग्य दिशेने वाटचाल होईल.तरुण पिढी आपल्या देशाचा कणा आहे. तरुण पिढीच्या खांद्यावर या देशाची धुरा आहे जी नेहमीच बदल, प्रगती आणि कल्पकता याची कास धरून पुढे जाते. तरुणांचे योगदान देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना फार मोठे आहे. सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, भगतसिंग, चाफेकर बंधू, चंद्रशेखर आझाद ही तरुण क्रांतिकारकांची प्रातिनिधिक स्वरूपातील नावे आठवली तरी स्फुल्लिंग पेटतं. म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत विविध क्षेत्रात तरुणांचे योगदान लक्षणीय आहे यात शंका नाही. पण सध्याची परिस्थिती बघता, तरुण पिढीतील काही वर्गाची ऊर्जा चुकीच्या दिशेला किंवा मार्गाला जाऊन भरकटलेली दिसते आणि इथेच समाजातील सुज्ञ व्यक्तींवर दिशादर्शनाची मोठी जबाबदारी आहे.

युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून पुढे जाणारी.आजचा तरुणच उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे. पण आजच्या तरुणाईला गरज आहे ती आदर्श विचारांची आणि कार्यकुशल नेतृत्वाची, दिशाहीन झालेल्या तरुणांना मार्ग दाखवण्याची. आज विविध राजकीय पक्ष, संघटना अस्तित्वात आहेत पण त्यांचा समाज व देशाच्या उन्नतीत किती सहभाग आहे हे सर्वश्रुत आहे. आजची एकूण परिस्थिती बघता, तरुणांना मार्गदर्शन करण्याची व परिपूर्ण व्यक्ती निर्माण करण्याची जबाबदारी समाजातल्या सुज्ञ व्यक्तींची आहे. तरुणांचे योग्य प्रबोधन झाले नाही, तर खरोखरच उद्याचे चित्र आजच्यापेक्षा अधिक भयंकर असेल. देशाला विभाजित करू इच्छिणार्‍या अनेक शक्ती विदेशी पैशाच्या जोरावर तरुणांना भ्रमित करून चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी सक्रिय आहेत.

 कम्युनिस्ट विचारांच्या नावाखाली तरुणांचा ‘ब्रेनवॉश’ करायचा आणि त्यांना नक्षलवादाकडे न्यायचे अशी अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. विविध विषयाबद्दल तरुणांमध्ये असलेली चीड व आक्रोश याचा वापर देशविघातक शक्ती त्यांच्या फायद्यासाठी करून घेतात व देशाच्याच विरोधात त्यांना उभं करतात. तरुणांनी सतर्क राहून अशा शक्तींपासून दूर राहावे व त्यांचा विकृत चेहरा समाजासमोर आणावा. युवकांच्या क्षमतेचा सदुपयोग करून देशाच्या विकासात त्यांचा सहभाग वाढीस लावणे ही आजची प्राथमिकता आहे.

आजची तरुण पिढी शैक्षणिक काळात त्यांचा अमूल्य वेळ निरर्थक गोष्टींवर खर्च करताना दिसतेय. हा वेळ आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा आहे. पण आजचा तरुण वर्ग या वेळेचा गैरवापर करतोय. सध्या टीव्ही, मोबाईल, इंटरनेट ही मनोरंजनाची साधने मुबलक उपलब्ध आहेत. पण त्यांच्या आहारी जाणे योग्य नाही. या माध्यमांमधून कोणती गोष्ट घ्यायची आणि कोणती सोडायची हे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने ठरवायचे आहे किंबहुनामाहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमांचा योग्य वापर करून व्यक्तिगत, समाज व देशाचा विकास कसा साधता येईल हे आजच्या तरुणाला कळलं पाहिजे.

अर्थात तरुण पिढीत बराच मोठा वर्ग या माध्यमांचा वापर करून देशात सकारात्मक योगदान देत आहे यात दुमत नाही. पण असा बराच मोठा वर्ग आहे, ज्याला आपल्या देशात काय सुरू आहे हे माहितीच नाही आणि केवळ आपल्या व्यक्तिगत इच्छा, आकांक्षा यांची पूर्ती करण्यात तो मग्न आहे. या सगळ्यांना एक विचार करण्याची प्रकर्षाने आवश्यकता आहे की, ‘माझं माझ्या देशासाठी व्यक्तिगत योगदान काय?’ हा प्रश्न स्वतःलासतत विचारणे आणि यथाशक्ती विविध क्षेत्रात सक्रिय सहभाग व योगदान देणे हे अपेक्षित आहे.

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताच्या भविष्यातील विकासाची दिशा, त्यासाठी तरुणाईमध्ये सकारात्मकतेचा प्रसार व प्रत्यक्ष विधायक कृती करण्यास प्रेरणा देणारे चिंतन नेहमीच केले. ‘मिशन इंडिया’ या त्यांच्या पुस्तकाचा पुढे ‘विकसित भारत एक ध्येय’ हा अनुवाद प्रकाशित झाला, यात विकसित भारताचं ध्येय गाठायचं असल्यास आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

आजच्या तरुण पिढीसमोर आव्हानांचा आणि समस्यांचा ढीग आहे. जागतिकीकरणाची ३० वर्ष ओलांडल्यानंतर आजच्या तरुण पिढीसमोरील आव्हाने जशी वाढली आहेत तशीच त्यांच्यासाठीच्या संधींमध्येही वाढ झाली आहे. या उपलब्ध संधींचा उपयोग देशाच्या विकासासाठी कसा करता येईल याचा विचार तरुणाईने करायचा आहे.“आजचा तरुण हा बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि नैतिकदृष्ट्या समर्थ असावा, अशी तरुण पिढी घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे,” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तरुणांनी आयुष्यात आत्मविश्वास जागवला, तर ती यशाची शिखरं गाठू शकतील.

प्रातिनिधिक स्वरूपातील काही क्षेत्र आणि अपेक्षित योगदान



माहिती तंत्रज्ञान - या क्षेत्रात भारतीय तरुणांनी जागतिक स्तरावर मोठी आघाडी मागील काही वर्षांत घेतली आहे आणि विविध क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून ऑटोमेशन करणे, पेपरलेस प्रणाली तयार करणे, गतीने काम करणारी प्रणाली विकसित करणे अशा अनेक आघाड्यांवर काम सातत्याने सुरू आहे आणि त्याचा सकारात्मक प्रभाव देशाच्या अर्थकारणावर दिसतोय आणि भविष्यात अनेकानेक क्षेत्रात वाढीसाठी संभावना आहेत.

समाजातील कुप्रथा - तरुण पिढी ही समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथा यांच्याविरोधात मोठे कार्य करण्यास सक्षम आहे आणि त्यांची मानसिकतादेखील यादृष्टीने पूरक आहे.

कृषिक्षेत्र - भारताच्या परंपरागत शेती प्रक्रियेचे पुनरुज्जीवन करणे, शेतीत तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी आधारित प्रक्रिया उद्योग यात तरुण पिढी मोलाची भूमिका बजावू शकते.

औद्योगिक क्षेत्र - देशांतर्गत स्वस्त तंत्रज्ञान विकसित करणे, ‘लो कॉस्ट ऑटोमेशन’, ‘इंडस्ट्री ४.०’ वर काम करणे.

शिक्षण क्षेत्र - शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धती विकसित करण्यात योगदान देणे. वरीलप्रमाणे अनेक क्षेत्र आहेत ज्यात तरुणाई सकारात्मक बदल घडवू शकते.

तरुण पिढीला अपेक्षित आहे की भविष्यातील भारत असा असावा जिथे समाजात विषमता (शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक) नाही, उत्तम शिक्षणाची संधी, नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यास अनुकूल वातावरण, देशांतर्गत रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध, उद्योजकतेला प्रोत्साहन ज्यात कमीत कमी सरकारी हस्तक्षेप व उत्तम सहकार्य, सर्वच क्षेत्रात पायाभूत सुविधांची व्यापक उपलब्धता, भ्रष्टाचार मुक्त प्रणाली, सर्व क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, विचारांचे स्वातंत्र्य अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

तरुण पिढीने केवळ तक्रार न करता प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे. आपल्या महान देशाच्या प्राचीन परंपरा व संस्कार आत्मसात करून भविष्यातील भारत घडवण्यास सज्ज व्हावे.

कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू..


हे तरुण पिढीबद्दल म्हणण्याची पाळी येऊ नये असेच वाटते, याउलट ..

तरुणाई भविष्य देशाचे
वारे बदलाचे नव्या युगाचे
स्वातंत्र्याचे आणि संयमाचे
निर्माण करूया नव्या जगाचे


नदीच्या प्रवाहाला योग्य दिशा मिळाल्यावर ती सर्वच क्षेत्रात कल्याण करते. ती पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवते, शेतकर्‍याच्या जमिनीला ‘सुजलाम सुफलाम’ बनवते, भूजल पातळी वाढवते, धरणातून वीजनिर्मिती करते, घर बांधण्यासाठी वाळू देते, प्रवाहाच्या आसपासचा परिसर हिरव्याकंच वृक्षवल्लींनी समृद्ध करते, पर्यावरणाचा समतोल साधते. तरुणाईचंही असंच आहे, योग्य दिशा मिळाली, तर तरुणाई या देशाचं निश्चित कल्याण करेल.स्वामीजींच्या स्वप्नातील युवा, ऊर्जावान भारत तयार करण्यासाठी स्वामीजींचेच शब्द आठवूया...एक रस्ता निवडा. त्यावर विचार करा. त्या विचाराला आपलं जीवन बनवा. त्याचंच स्वप्न पाहा. यशाचा हाच मार्ग आहे.



-आल्हाद सदाचार