रामनाम सत्य होणारच!

01 Jan 2023 20:18:45

Mamata Banerjee


भूतपिशाच्च निकट नहीं आवे।
महावीर जब नाम सुनावे।



...तर महाबली हनुमानजींचे नाव घेतले की, भूत, पिशाच्च, जाखिण, डाकीण आणखी काय काय भूतयोनी, राक्षसयोनी दूर पळतात. हनुमानजींचे नावच पुरेसे आहे. मग हनुमानजी, ज्या प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत, त्या प्रभू श्रीरामांचे नाव घेतले तर? तर प्रश्नच नाही. भूत-पिशाच्च कोणतीही वाईट शक्ती थार्‍याला उभी राहणार नाही. कलियुगातही प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामाचा असा प्रभाव आहे. नुकतेच प. बंगालमध्ये सरकारी कार्यक्रमादरम्यान ‘जय श्रीराम’चे नारे लागले. उपस्थितांनी प्रभू श्रीरामांचे नाव घेतले म्हणून तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना खूप राग आला. पण ममता बॅनर्जी तर माणूस आहेत. मानवयोनीत जन्मून त्या सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीही आहेत. त्यांना रामनामाची इतकी ‘अ‍ॅलर्जी’ आणि भीती का वाटते? प्रभू श्रीरामांचे नाव ऐकले की ममता बॅनर्जी अस्वस्थ होतात. सैरभैर होतात. जिथे प्रभू श्रीरामांचे नाव घेतलेले असते, तेथून त्या पळत सुटतात आणि दूर जाऊन उभ्या राहतात.का बरं? हा प्रश्न ममता बॅनर्जी यांना मत देणार्‍या कुणातरी हिंदू मतदाराला पडत असेल का? पश्चिम बंगालमध्ये चार-आठ दिवस राहणार्‍यांना नक्कीच जाणवेल की, तिथे हिंदूंच्या भावनांना दुय्यमच स्थान दिले गेले आहे. दोन वर्षांपूर्वी मी कामानिमित्त प. बंगालला गेले होते. तिथे जाणवले की, बहुतेकांनी माझ्या प्रश्नांना नीट उत्तर दिले नाही किंवा मला टाळले. माझ्या सोबतच्या स्थानिक व्यक्तीला विचारले, “हे असे का?” तर त्यांचे म्हणणे, “दीदी आपने पोषाख गलत कलर का किया हैं। आपको आसमानी, सफेद या हरा, लाल कपडा पहनना चाहिये था। आपने ये केसरीया ड्रेस पेहना। इस वजह से उसने आपको रिस्पॉन्स नहीं दिया।” लोकांनी उत्तर दिले नाही. कारण भगवे कपडे घातलेल्या व्यक्तीशी बोलताना त्यांच्या माणसाने पाहिले तर? हे एकून मला भारी वैषम्य वाटले होते. ममता बॅनर्जींच्या राज्यात भगव्या रंगाचीही इतकी ‘अ‍ॅलर्जी’ त्यावेळी अनुभवली होती. या अशा ममता बॅनर्जींना प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाची आणि तिच्या अनुयायांना भगव्या रंगाची इतकी भीती का असावी? याचे उत्तर आहे, मुस्लीमधर्मीय मतदारांचे लांगूलचालन. प. बंगाल नेहमी क्रांतीचे केंद्र राहिले आहे. ममता बॅनर्जींच्या रामनामविहीन सत्तेचे येणार्‍या काळात राम नाम सत्य होणार हे नक्की!
एक घर शेणाचं, एक मेणाचं !



एका भविष्यवेत्त्याने काकांना सांगितलं की, या नव्या वर्षात ते सत्ताबदल करू शकतील. अहाहा! काका सत्ताबदल करतील. काका पुन्हा माझा हात हातात घेतील. मला मुख्यमंत्री घोषित करतील. मी पुन्हा मुख्यमंत्री होईन. माझा बाळ पुन्हा मंत्री होईल. आम्ही असा कामाचा धडाका लावू! शपथ सांगतो, आता पुन्हा मुख्यमंत्री झालो की, महिन्यातून एकदा नव्हे, तर दररोज ‘फेसबुक लाईव्ह’ येईन. किंबहुना संजय म्हणाला आहे की, २०२३ साली ते तिकडे गेलेले आमदार अपात्र होतील मग आम्ही सत्तेत येऊ. हे कोण म्हणाले की, ते माझ्यासारख्या पुतण्याऐवजी त्यांच्या लेकीचा विचार करतील. काय म्हणता, नवे वर्ष, नवे राज्य, नवी युतीपण करतील? २०१९ साली आम्ही जे केले ते व्याजासकट २०२२ ला मिळाले. आता कर्माच्या हिशोबाने मुंबई महानगरपालिका चक्रवाढ व्याजाने त्यांच्याकडे जाणार? २०२३ साल हे ‘गिप्ट’ घेऊन आले आहे?सगळेच असे कावळा उडाला, चिमणी उडाली सारखे उडाले तर? आमच्या हातात काय राहिलं? काय म्हणता, काका आणि मॅडम मला चिमणी-कावळ्याची गोष्ट सांगतील? इथे चिमणी आणि कावळ्याऐवजी ते ‘मशाल’ आणि ‘घड्याळ’ प्रतीक म्हणून घेतील. ‘घड्याळ’बाबाचं घर ‘पंजा’बाई सोबत मेणाचं असतं, तर ‘मशाली’चं घर शेणाचं. युतीच्या पावसात ‘मशाली’चं घर वाहून जातं आणि ‘मशाल’ मग आसर्‍यासाठी ‘घड्याळ’बाबा आणि ‘पंजा’बाई कडे जाते. ‘मशाल’ म्हणते, “ ‘घड्याळ’बाबा, ‘पंजा’बाई दार उघड.” तेव्हा स्वत:चं सगळं सुरक्षित ठेवलेला ‘घड्याळ’बाबा ‘मशाली’ला म्हणतो, “थांब माझ्या लेकीला पहिली मुख्यमंत्री बनवायचे”, तर ‘पंजा’बाई म्हणते, “थांब माझ्या लेकराला पंतप्रधान बनवायचं.” ‘मशाली’ला असंच भिजवत ठेवत ‘घड्याळ’बाबा आणि ‘पंजा’बाई काही घराचा दरवाजा उघडतच नाही. ‘मशाल’ सत्तेच्या घरट्याबाहेर राहते. फारच भयानक गोष्ट! काका ही गोष्ट सांगतील? पण आमच्याबाबत अशक्य. कारण, काका आणि आम्ही दोघेही ‘सेम टू सेम’ आहोत. त्यांच्याकडे एक खंजीर एक पाठ असेल, तर आमच्याकडे दोन खंजीर दोन पाठी असतील. गुरूपेक्षा चेला सवाई असतो. आम्ही काकांचे चेले आहोत. काय म्हणता काकांना सांगणार? नको, नको. नाहीतर ते आताच ‘मशाल’ विझवायला सुरुवात करतील. काय म्हणता? काकांनी मशाल विझण्याआधीच ‘अंधार’ करण्यासाठी हस्तक पाठवली आहे? ’अंधार...’









Powered By Sangraha 9.0