आधुनिक महिपती संतकवी श्री दासगणु महाराज यांची पौष शुक्ल एकादशीला म्हणजेच सोमवार, दि. २ जानेवारी रोजी तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया संतकवी श्री दासगणु महाराजांचे चरित्र आणि कर्तृत्व. तसेच प्रस्तुत लेखात आपण त्यांच्या ग्रंथांचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तसेच इतर सामाजिक परिस्थितीवरील भाष्याचा आढावा घेण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहोत.
॥श्री शंकर॥
॥श्री अस्मदगुरुभ्यो नमः॥
॥महाराष्ट्रीय भाषानाम् भूषणंच महाकवी॥
मराठी भूमी ही जशी शूर-वीरांची आहे तशीच ती साधु-संतांच्या विचारांची पावन अशी भूमी आहे. संतविचारांत शाश्वत चिरंतन असे मूल्य आहे. ही शाश्वत चिरंतन मूल्य संतांनी तत्कालीन जनभाषेत मांडली आहे. मग ती ज्ञानदेवीच्या माध्यमातून, गाथेच्या व दासबोधाच्या माध्यमातून मांडलेली असो. हेच साहित्य आपल्या मराठी जनांचा अनमोल असा ठेवा आहे. या अनमोल अशा ठेव्याची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्यापासून ते संतकवी दासगणु महाराज व पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या साहित्यापर्यंत अखंड अशी चालू आहे. या परंपरेचे पाईक असलेले आधुनिक महिपती संतकवी श्री दासगणु महाराज यांची सोमवार, दि. २ जानेवारी रोजी जयंती (तिथीनुसार) अर्थात पौष शु. एकादशी.
श्री दासगणु महाराजांनी अनेक संतचरित्रे रचली तसेच अनेक देवी-देवतांची स्तोत्रे, अष्टके, आरत्याही रचल्या. त्या अत्यंत भक्तिरसपूर्ण अशा आहेत. याचबरोबर त्यांनी तत्त्वज्ञानपर ग्रंथांवर विद्वत्ताप्रचुर व तसेच रसाळ अशा त्यांच्या ओवीबद्ध पठडीत भाष्ये केली आहेत. त्यात मग अमृतानुभवावरील भाष्य असो की नारद व शांडिल्य भक्तिसूत्रांवरील भाष्य असो, अत्यंत उत्कृष्ट तसेच सोप्या प्रतिपादन शैलीत केलेली मांडणी. ‘अमृतानुभव’वरील भाष्य म्हणजे ‘शिवकल्याण’च्या टीकेनंतरचे अत्यंत उत्कृष्ट असे भाष्य आहे, असे विद्वानांचे मत आहे आणि विचार ‘सागररहस्य’ व ‘चांगदेवपासष्टी’ यावरील भाष्यही चिंतनीय अशीच आहे. प्रस्तुत लेखात आपण त्यांच्या ग्रंथांचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तसेच इतर सामाजिक परिस्थितीवरील भाष्याचा आढावा घेण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहोत.
माणसाच्या पारलौकिक व ऐहिक जीवनाचे कल्याण तसेच सर्व समस्यांचे निराकरण हे संतसाहित्य व त्यांच्या चरित्रातूनच होते, अशी महाभारताची व संतश्रेष्ठ तुकोबारायांची साक्ष आहे. महाभारत म्हणते, ‘महाजनो गत: स: पंथा:’ तर श्री तुकाराम महाराज म्हणतात,
वाचे बोलु वेदनिती। करु संती केले ते॥
श्री दासगणु महाराज व एकूण संतांची तत्त्वज्ञान सांगण्याची पद्धत कशी आहे, याचे विवेचन श्री दासगणु महाराज यांच्या भाष्यपर ग्रंथांच्या प्रस्तावनेत पू. स्वामी वरदानंद भारती म्हणतात, अध्यात्मशास्त्र मुळातच सामान्यांच्या ज्ञानशक्तीच्या पलीकडचे अत्यंत श्रेष्ठप्रतीचे पण गूढ असे शास्त्र आहे. बालकाला जसे अन्न विशेष रीतीने शिजवून मऊ करुन काऊचिऊच्या गोष्टी सांगत लहान-लहान घास पण अत्यंत वात्सल्याने भरवावे लागते तसेच, संत ज्ञानेश्वरांनी याच पद्धतीचा अवलंब केला म्हणूनच ज्ञानोबारायांना प्रेमादाराने आपण ‘माऊली’ असे संबोधतो. याच संतपरंपरेचे पाईक म्हणजे श्री दासगणु महाराज आहेत.
आपण ईशावास्योपनिषदावरील भाष्य पाहूयात.
ईशावास्योपनिषद म्हणजे शुक्ल यजुर्वेदाचा शेवटचा भाग आहे. केवळ १८ श्लोकांचे उपनिषद, पण तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात अतिशय महत्त्वाचे. महाराज उपनिषदांचा अभ्यास का करावा, हे सांगताना म्हणतात, “खंडन-मंडनासाठी, मनोरंजनासाठी, पैसा व प्रतिष्ठा मिळवण्यासाठी यांचा अभ्यास करु नका तर हे ‘व्यष्टी’ व ‘समष्टी’च्या कल्याणासाठी उपयोगात आणा म्हणजे समाजात हे नीतिमूल्य रुजतील, हे स्पष्टपणे सांगतात. त्यानंतर महाराज ईशावास्योपनिषदाचाच अभ्यास का करायचा, हे सांगताना म्हणतात, अनेक उपनिषद आहेत. पण हेच का तर महाराज म्हणतात,
ईश केन कठ देख। भृगु कौषितक आरण्यका।
छंदोग्य ऐतरीय जाबाली। जैसे एक्याच गावासी मार्ग अनेक जावयासी। तैसे त्या सद्वस्तुसी जाया मार्ग अनेक।
त्या रस्त्यापैकी जवळचा। हा ईशावस्य मार्ग साचा॥
म्हणून श्रोती तयाचा विचार करणे। ये ठायी॥
मार्ग अनेक आहेत, पण ईशावस्योपनिषद हा जवळचा मार्ग आहे. भगवंतापर्यंत जाण्यासाठी म्हणून त्याचा अभ्यास करा, असे म्हणतात.
(इ.उ. अध्याय १ ओवी. ४९ ते ५१)
सर्व उपनिषदांचा आरंभ व शेवट शांतिपाठाने होतो. ईशावास्याचाही आरंभ शांतिपाठाने होतो. या पाठाचा अर्थ सहज लक्षात यावा म्हणून महाराज एक सोपा दृष्टांत देतात,
जैसे समुद्राचे जीवन। उपाधीने होतासे लवण।
परी दोहोमाजी भिन्न पण। ऐतुके ही असेना॥
तैसे बाह्य आणि जगत। एकचि जो मानी सत्य।
तोच म्हणावा ज्ञानवंत। त्या ज्ञात्यास शांती असे॥
याच उपनिषदातील नव्या श्लोकावरील भाष्य वाचताना महाराजांचे विद्या व अविद्येचे विवरण करताना त्यांचे शब्द टोकदार बनतात व त्या ओवीस एक धार चढल्यासारखी वाटते. मुळात महाराजांना दांभिकतेचा तिटकारा होता. प्रत्येक साधकाने हे प्रकरण मुळातून वाचलेच पाहिजे, असे आहे. उपासना ही श्रद्धेने व शुद्ध अंत:करणाने करा. त्यात अजिबात अंधश्रद्धा नको, असे महाराजांनी ठामपणे मांडले या भाष्यात. या उपनिषदाच्या शेवटच्या श्लोकाचे महत्त्व सांगताना महाराज म्हणतात,
कर्म उपासना आणि ज्ञान। यांचे भरले संमेलन।
या मंत्रामाजी जाण। या अवघ्या उपनिषदी॥
बरेच मोठे भाष्य आहे, लेखविस्तार भयास्तव देणे शक्य व लिहिणे अशक्य आहे. महाराजांचे हे भाष्य मुळातूनच वाचले पाहिजे म्हणजे लक्षात येईल.श्री दासगणु महाराज यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे समाज सन्ममुखता हे आहे, तसेच समाजातील कुप्रथा, अनिष्ट चालीरिती, दांभिकता यांच्या विरोधात त्यांची लेखणी अस्त्र बनते. महाराजांच्या साहित्यसंपदेतून सामाजिक समन्वयाचेतत्त्वज्ञान, विविधेतून एकतेचा संदेश झळकतो. तसेच राष्ट्राबद्दलची तळमळही वाचण्यास मिळते. आपल्या देशाच्या भावनेचा केंद्रबिंदू धर्माचा गाभा आहे. इतिहासात डोकावले असता आपणास हेच दिसून येईल. भारतातील प्रत्येक क्रांतीमागे आध्यात्मिकतेचे पाठबळ आहे. मग अगदी आर्य चाणक्यांपासून ते आद्य शंकराचार्य, महर्षी विद्यारण्यांचे कार्य ते छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून ते समर्थांपर्यंत या प्रत्येक चळवळीला एक आध्यात्मिक अधिष्ठान होते. या यादीत श्री दासगणु महाराज यांचे नाव लिहावे लागेल. मग ते स्तोत्र असो, अष्टक असो वा आख्यान व भाष्यग्रंथ असो की, कीर्तनाख्यानातून प्रकर्षाने प्रकट होते. श्री दासगणु महाराजांच्या साहित्यातील काही वचने पाहूयात या संदर्भात.
धर्मरुपी मूळ नासले। समाज खोड निर्बली बनले।
तेज अवघे मातीत गेले। फांद्या रुपी पंथाचे॥
भारताची करूण काहणी.
श्री दासगणु महाराज कट्टर देशभक्त होते.
ते एका ठिकाणी म्हणतात,
सद्भक्तीच्या जोरावर। करा राष्ट्रचा जयजयकार॥
दावा जगास प्रत्यंतर। खर्या साक्षात्काराचे॥
हल्लीचे ते राष्ट्रभक्त। राष्ट्रभक्तीची सोंगे सत्य ते शिमग्याचे वीर साक्षात। जो का बेगडी पुढारी।
स्वार्थ न सोडी तिळभरी॥
आर्थिक स्थितीवरील त्यांचे विचारदेखील मननीय आणि चिंतनीय आहे.
श्री महाराज म्हणतात,
परदेशातून माल येई। त्याची विक्री येथे होड़ा पैसा परदेशात जाई। मालाच्या आयातीने॥
इंग्रजांनी द्रव्य नेले। आपुल्या देशामाजी भले।
मोठमोठे निर्मिले। कारखाने त्या जोरावरी॥ भांडवलशाही प्रबळ केली। पोषक कायदे काढुनिया॥
दुराचारी वृत्तीवर टोकदार शब्दांनी प्रहार केले. दुराचाराला ऊत आला. श्रद्धा मावळली, आर्य संस्कृती लोपली, पाश्चिमात्य विचार प्रभावी ठरू लागला.
कुलवधू आर्य संस्कृती। ही पाश्चिमात्यांची पद्धती॥
वारांगना तिच्या पुढती।
त्या वारांगनेचा अनुनय नको, असे महाराज म्हणतात.
कालही आजही व उद्याही पू. दासगणु महाराज यांचे साहित्य समाजास दिशा देणार आहे. संतसाहित्य समाजास त्रिकालदर्शी मार्गदर्शन करते. शेवटी श्री ज्ञानदेवांच्या ओवीचा आधार घेत या लेखाची सांगता करतो.
श्रुती स्मृतीचे अर्थ। आपण होवुनी मूर्त।
अनुष्ठान जगा देत। वडील जे हे।
तयाची आचारिता पावले। सात्विक श्रद्धा चाले॥
श्री दासगणु महाराज यांच्या चरणी ही छोटीशी शब्दांजली अर्पण करतो.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
-योगेश काटे