‘काँग्रेस जोडो यात्रा’ कधी...?

    08-Sep-2022   
Total Views |

Rahul



मरगळलेल्या काँग्रेसला उर्जितावस्थेत आणण्यासाठी आता खुद्द गांधी घराण्याचे युवराज अर्थात राहुल गांधी मैदानात उतरले. काँग्रेसची मरगळ दूर सारण्यासाठी नुकत्याच त्यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रारंभही झाला. कन्याकुमारीपासून १२ राज्यांतून मार्गस्थ होत ३ हजार, ५७० किलोमीटरचे अंतर पार करून तब्बल १५० दिवसांनंतर या यात्रेचा काश्मीरमध्ये समारोप होईल. परंतु, ही ‘भारत जोडो यात्रा’ नव्हे, तर ‘भारत तोडो यात्रा’ असल्याचा आरोप आता काँग्रेसवर समाजमाध्यमांतून होऊ लागला आहे. या यात्रेविषयीच्या अनेक गोष्टी समोर आल्या असून ही यात्रा ‘कंटेनर यात्रा’ असल्याची टीकाही सुरू झाली आहे. यात्रेत प्रत्येक वेळी जवळपास ६० कंटेनर सोबत असणार असून त्यात ऐसपैस सुविधांचा समावेश आहे. हॉटेलऐवजी राहुल या सर्व सोईसुविधायुक्त कंटेनरमध्ये आपला मुक्काम ठोकणार आहेत. त्यामुळे राहुल यांना खरोखर भारताला जोडायचं आहे की, पक्षात उरलीसुरली अब्रू वाचविण्यासाठी स्वतःला चमकवायचं आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे, राहुल यांचा जमिनीवरचा अभ्यास किती आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. एवढचं काय, तर १९७७ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नातू राहुल गांधींचा जन्मदिवस तर चक्क विमानामध्येच साजरा केला होता. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कुटुंबीयदेखील उपस्थित होते. त्यामुळे सरकारी गोष्टींवर आपली मौजमजा करण्याची परंपरा काँग्रेससाठी बिलकुल नवीन नाही. खास बाब म्हणजे, या यात्रेला ‘आंदोलनजीवी’ म्हणून प्रसिद्ध असलेले मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांचाही त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे या यात्रेचे पुढे काय होणार, हे स्पष्टच आहे. तिकडे पाकिस्तानात इमरान खान यांनीही ‘कंटेनर पॉलिसी’ राबविली होती. त्यामुळे अनेकदा पाकिस्तानात हिंसाचाराच्या घटना घडल्या. स्पोर्ट्स शूज घालून युवराज देशयात्रेवर भले निघाले असले तरीही त्यांनी सर्वप्रथम ही यात्रा ‘लीटर’ नाही ‘किलोमीटर’मध्ये आहे, हे लक्षात घ्यावं. देशाला वेठीस धरण्याचा प्रयत्न या यात्रेतून केला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेतकरी आंदोलन आणि शाहिनबाग आंदोलनात दिल्लीला वेठीला धरले गेले, त्याचधर्तीवर देशाला वेठीला धरण्यासाठीच तर ही यात्रा नाही ना असाही प्रश्न उपस्थित होतो. भारताला जोडण्याआधी राहुल यांनी आधी काँग्रेसला एकसंध ठेवून जोडण्याचे काम करावे. तीच त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट ठरेल.

म्हणजे पश्चाताप होणार नाही!



पलटी मारण्यासाठी प्रसिद्ध नितीश कुमार गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. कारण काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात देशभरातील विरोधकांची एकजूट करणे. नितीश यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी २० मिनिटे खलबतं केली. विरोधकांची एकजूट करण्यासाठी काथ्याकूट करायचा, पण त्यासाठी नेतृत्व मात्र घोषित करायचे नाही आणि कुणी विचारलं तर वेळ मारून न्यायची. यावेळीही कुमार यांनी तशीच उत्तरं माध्यमांना दिली. काही दिवसांपूर्वी नितीश यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी राव यांना माध्यमांशी बोलण्याची इच्छा असूनही नितीश यांची मात्र घाई सुरु होती. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या का होईना, राव यांचा चांगलाच पाणउतारा झाला. एकत्र यायच्या आणाभाका घ्यायच्या खर्‍या, मात्र नेतृत्वावरूनच सगळी गोची आहे. ममता, माया, केसीआर, अखिलेश, नितीश आणि शरद पवार यांसारखे एकापेक्षा एक नेते असताना एकमेकांच्या भेटीगाठी घेण्याशिवाय पुढचा अध्याय सुरूच होत नाही. पुढचा अध्याय ‘नेतृत्व करणार कोण’ याच्यावर अडकतो आणि प्रकरण पुन्हा बारगळते. विशेष म्हणजे, या सगळ्यापासून मात्र केजरीवाल आणि राहुल गांधी आणि काही प्रमाणात मायावती जरा अंतर राखून असतात. शरद पवार आणि नितीश कुमार यांनी कितीही भेटी घेतल्या तरीही त्यांची खरी इच्छा लपून राहिलेली नाही. शरद पवारांनी तर कित्येकदा पंतप्रधान होण्याची इच्छा बोलून दाखवली. परंतु त्यांना पंतप्रधान काही होता आले नाही. नितीश कुमारांनी तर बिहारचे मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी इतक्या पलट्या मारल्या की, त्यांचे पंतप्रधानपद दूरच राहिले. आता उरलेसुरले आमदार सांभाळण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. एका सदैव भावी पंतप्रधानांना एक भावी पंतप्रधान भेटला, असे या भेटीचे वर्णन करता आले तरीही या दोन्ही नेत्यांना पंतप्रधानपद काय, साधा आमदार आणि खासदार होणंही मुश्किल बनलं आहे. मात्र, सत्य कधी पचवता येत नाही. पवारांनी माढ्यातून कशी माघार घेतली, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आणि ‘जंगलराज’ म्हणून हिणवणार्‍या लालू यादव आणि त्यांच्या पुत्रांच्या पायाशी लोळण कुणी घेतली हेदेखील बिहारी जनतेने पाहिले आहे. चंद्राबाबूंनीही असे उद्योग केले आणि आंध्र प्रदेशच्या सत्तेसहित स्वतःचा पक्षही खड्ड्यात घातला. त्यामुळेल नितीश आणि पवारांनी चंद्राबाबूंचे उदाहरण समोर ठेवावे म्हणजे पुढे पश्चातापाची वेळ येणार नाही.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.