महाराष्ट्राच्या मातीत दडलेली संस्कृती जगभरात पोहोचवणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

07 Sep 2022 14:21:09

gsb ganpati



महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वागताने भारावले परदेशी पाहुणे


मुंबई दि. ७ ऑगस्ट : 
महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आणि इथली संस्कृती, उत्सव जगभरात पोहोचावे. यामाध्यमातून आपले सण-उत्सव जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून ४० ते ५० देशातील वाणिज्य महादूतांना मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन करविण्यात आले. यासर्व वाणिज्य दूत व अधिकाऱ्यांचे गुरूनानक खालसा महाविद्यालय, माटुंगा येथे पारंपरिक फेटे बांधून स्वागत करण्यात आले. तसेच या यात्रेची सुरुवात जीएसबी गणपती वडाळा येथून झाली. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या वाणिज्यदूतांसोबत जीएसबी गणपती वडाळा येथे महाआरती संपन्न झाली. यावेळी सर्वच वाणिज्य दूतांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. तर डोक्याला भगवा फेटा आणि गळ्यात पुष्पमाला परिधान केलेले हे परदेशी पाहुणे महाराष्ट्रीय पारंपरिक स्वागताने भारावून गेलेले पाहायला मिळाले.


यावेळी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा उत्सव आहे. पण यापूर्वी हा उत्सव कसा साजरा केला जातो याची तितकीशी माहिती या लोकांना नव्हती. यावेळी आम्ही एक प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व देशातील वाणिज्य दूतांना याठिकाणी निमंत्रित केले. या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ४० हुन अधिक देशातील वाणिज्यदूत यामध्ये सहभागी झाले. यापुढे या देशांतून जे पर्यटक आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांच्यापर्यंत या उत्सवाची आणि उपक्रमाची माहिती या वाणिज्यदूत आणि अधिकाऱ्यांमार्फत जगभरात पोहोचेल. गणेशोत्सव हा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण असावा असा आमचा प्रयत्न आहे. एमटीडीसीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे उत्तम आयोजन केले. या सर्वाना मी धन्यवाद देतो.


या उपक्रमाचे यश पाहता भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन केले जाईल. लवकरच आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सर्किट सुरु करणार आहोत. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा वारसा आहे. दैदिप्यमान इतिहास सांगणारे किल्ले आहेत. गणेशोत्सवासारखे मोठे उत्सव आहेत. ऐतिहासिक लेणी आहेत. अष्टविनायक आहेत. हेच सर्व जगासमोर आणण्याचा प्रयत्न आहे, असेही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.
Powered By Sangraha 9.0