सेवा परमो धर्म:

05 Sep 2022 20:00:41
Seva

 
 
समाजाला स्पर्श करणार्‍या प्रत्येक विषयासाठी ठोस आणि भक्कम सेवाकार्य निर्माण करणार्‍या आणि त्यासाठी सातत्याने चिंतन आणि कार्य करणार्‍या सेवायोगी डॉ. सुजित निलेगावकर यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा.
 
 
नवजात अर्भकांची नाळ कशी तोडायची? तर त्या सगळ्यांनी उत्तर दिले होते, कुर्‍हाडीने किंवा कोयत्याने. नाळ तोडल्यानंतर त्या जागी काय लावायचे? तर उत्तर होते, माती किंवा शेण. सर्वेक्षणामध्ये विचारल्या गेलेल्या या प्रश्नांना सगळ्यांनी हीच उत्तरं दिली होती. दैनंदिन जीवनाबाबतचे चित्रही असेच. का इथे आजार आणि रोगराई पसरणार नाही? का इथे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असणार नाही? सर्वेक्षणाचे अर्ज भरताना आणि वाचताना त्यावेळी सुजित यांच्या डोळ्यांत अश्रू आले.
 
 
मन भरून आले. 2003 साल असावे ते. आपले ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण झाले की, आपण मोखाडा परिसरातील या बांधवांच्या आरोग्यासाठी काम करायचे, असे त्यांनी ठरवले. ज्या वयात ‘करिअर’च्या नावाने बंगले आणि ‘बँक बॅलन्स’ वाढण्याचा मनसुबा रचला जातो, त्या वयात सुजित यांनी स्वत:ला वचन दिले की, वंचित बांधवांच्या कल्याणासाठी माझे आयुष्य समर्पित करणार. त्यावेळी मोखाड्यामध्ये कुपोषणाची समस्या जोरात होती. काही पाड्यांवर भूकबळीही झाले होते.
 
 
अभाविपच्या माध्यमातून संजय पाचपोर, प्रवीण घुगे यांनी तिथे कुपोषण, भूकबळी समस्या सोडवण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यासाठी समिती गठित केली. त्या समितीमध्ये सुजितही होते. पुढे सुजित यांनी ‘एमबीबीएस’नंतर ‘एडीआरएमए’, ‘डीएनबी’, ’एलएलबी’, ‘आरएसओ’, ‘डीएमएलजी’ वगैरेपर्यंतचे अत्युच्च शिक्षण पूर्ण केले. हे सगळे शिक्षण पूर्ण करण्यामागचा हेतू हाच होता की, अत्याधुनिक वैद्यकीय ज्ञानाद्वारे समाजाची सेवा करणे.
 
 
डॉ. सुजित सध्या ‘दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे’ येथे ‘डिपार्टमेंट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन’चे विभाग प्रमुख आहेत. तसेच ते ‘सांगाती’ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. तसेच ते ‘परिवर्तन’ महिला संस्थेचे विश्वस्त, तर ‘राष्ट्रवीर संघ’ संस्थेचे कोषाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे शिवशक्ती संस्थेचे स्वयंसेवक आहेत. बौद्धिक क्षेत्रातही त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी 12 प्रबंध आणि शोधनिबंध सादर केले आहेत. मोखाडा वनवासी भागातील बांधवांच्या आरोग्यसेवेसोबतच त्यांना स्वयंरोजगार मिळावा, यासाठी डॉ. सुजित काम करतात.
 
 
उच्चशिक्षित तरुणांनाही नोकरी नाही, अशी काहीशी आजची परिस्थिती. त्यामुळे ते पुन्हा वीटभट्टी मजुरीकडे वळतात. त्यांना त्यांच्या शिक्षणाचा उपयोग होईल, असे रोजगार उपलब्ध करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याचसोबत शहरी भागात रुग्णांना आरोग्य सुविधांची माहिती देणे, कर्करोगग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करणे, हे काम ते करतात.
 
 
डॉ. सुजित यांच्या सेवाकार्याची व्याप्ती खूप मोठी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कुस्तीचे वेड आहे. मात्र, कुस्ती खेळताना, सराव करताना अनेकदा दुखापती होतात. त्यावर उपचार करणे खर्चिक असते. छोट्याशा दुखापतीमुळे त्या मल्लाची कारकीर्द वाया जाते. डॉ. सुजित गरीब जखमी झालेल्या कुस्तीपटूंसाठी विनामूल्य उपचार, शस्त्रक्रिया उपलब्ध करण्याची योजना राबवतात. दुसरीकडे नद्यांचे प्रदूषण आणि त्याचे होणारे ग्रामीण आणि शहरी भागातील दुष्परिणाम यावरही सुजित काम करतात. ‘नदी की पाठशाला’ असा उपक्रम ते राबवतात. अशा प्रकारे डॉ. सुजित यांच्या सेवाकार्याची यादी संपता संपत नाही.
 
 
‘सेवा हाच धर्म’ असे जीवन जगणार्‍या सुजित यांचे मूळ गाव लातूर. वडील सुरेश आणि आई मंगला निलेगावकर. सुशिक्षित आणि संस्कारी ब्राह्मण दाम्पत्य. सुजित यांचे वडील आणि काका दोघेही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने प्रयत्न करणे आणि आपले असे काही नाहीच, जे आहे ते समाजाचे आणि देशाचे, असे संस्कार निलेगावकर दाम्पत्यांनी मुलांना दिले. सुजित ज्या शाळेत जायचे, त्या शाळेसमोरच डॉ. अशोकराव कुकडे यांचे ‘विवेकांनद रुग्णालय’ होते. त्या रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्‍यांचे रुग्णांप्रतिचे दायित्व हे सगळे पाहतच सुजित मोठे झाले. ते जेव्हा आठवीला होते तेव्हा लातूरला भूकंप झाला. त्यांच्या शाळेतच गावकर्‍यांसाठी तात्पुरते रुग्णालय सुरू झाले. यामध्ये सेवेसाठी सुजितही रूजू झाले. इथेच आरोग्यसेवेचे बीज रूजले गेले. पुढे ‘एमबीबीएस’ शिकत असताना अभाविपचा संपर्क झाला.
 
 
परिषदेच्या माध्यमातून सेवासंघटनेचा श्रीगणेशा झाला आणि त्याचा अध्याय अजून सुरूच आहे. यापुढेही समाजासाठी आयुष्य वेचायचे हा सुजित यांचा निर्धार आहे. खर्चिक आरोग्य उपचार गरिबांसाठी कमी शुल्कात कसे उपलब्ध करायचे, यासाठी सध्या आणि यापुढेही डॉ. सुजित काम करणार आहेत. डॉ. सुजित म्हणतात, “माझे वडीस संघ स्वयंसेवक. आम्ही साखरझोपेत असतानाच ते संघगीत म्हणायचे, ’हम बने हिंद के योगी.’ अर्थात, मला सर्वार्थाने सेवायोगी होता आले का? तर मी प्रयत्न करतो. ‘हम बने हिंद के योगी’ या अचल, अविरत निष्ठेवर माझे मार्गक्रमण सुरू आहे.”
असो, डॉ. सुजित हे सेवायोगी आहेत, हे नक्की...
 
 
Powered By Sangraha 9.0