मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी दीपक करंदीकर

    30-Sep-2022
Total Views |
deepak karandikar
 
 
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक दीपक करंदीकर यांची मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या (MCCIA) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बुधवारी झालेल्या ८८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. २०२२-२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी दीपक अध्यक्षपद सांभाळतील. राज्यात उद्योजकता वाढीसाठी काम करणारी अग्रगण्य संस्था म्हणून मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स सर्वांनाच सुपरिचित आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई )आपण जास्तीत जास्त काम करू असा विश्वास दीपक यांनी व्यक्त केला आहे.
 
१४ वर्षांपासून करंदीकर हे मराठा चेम्बरशी संबंधित आहे. याचबरोबरीने चेम्बरच्या एमएसएमई उद्योगांच्या समितीचे अध्यक्ष देखील होते. नॅशनल ऍग्रीकल्चर अँड फूड ऍनालिसिस अँड रिसर्च इन्स्टिटयूट (NAFARI), ऑटो क्लस्टर डेव्हलोपमेंट अँड रिसर्च इन्स्टिटयूट (ACDRIL), MCCIA इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशन (MECF) या सर्व संस्थांच्या उभारणीत दीपक करंदीकर यांचा फार मोठा सहभाग राहिला आहे. त्यांनी यात मोठे योगदान दिले आहे. या संस्थांव्यतिरिक्त राज्य सरकारच्या अनेक समित्यांवर इज ऑफ डुईंग बिझनेस या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.