शर्यत हुजरेगिरीची!

30 Sep 2022 10:01:26

Congress Presidentship
 
 
 
काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पेच अद्याप कायम असल्याचेच चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असताना राजस्थानात पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला. 80 हून अधिक आमदार नाराज झाले आणि राजस्थान हातातून जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.
 
 
अशोक गेहलोत आणि सचिन पायलट असा संघर्ष निर्माण झाला आणि शेवटी ‘हायकमांड’लाच मध्यस्थी करावी लागली. पर्यवेक्षक पाठवून हालहवाला जाणून घेतला गेला खरा, पण त्यातून गेहलोत यांना ‘क्लिन चिट’ दिली गेली. दरम्यान, राजस्थानातील राजकीय संघर्षाला गेहलोत जबाबदार असल्याच्या चर्चा होत्या. पण, तरीही त्यांना पक्षाने निर्दोष ठरवलं. अगदी काही दिवसांपूर्वीच गेहलोत काँग्रेस अध्यपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. परंतु, आता त्यांनी स्वतः अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यानंतर अंबिका सोनी यांचे नाव चर्चेत आले आणि आता तर त्याहीपुढे जाऊन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग आणि केरळ काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.
 
 
या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची मैत्री भेट घेतली असून त्यासंदर्भातील ट्विटदेखील थरूर यांनी केले. ‘आम्ही दोघे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरत आहोत, पण आमची लढत मैत्रीपूर्ण असेल. आमच्यापैकी कोणीही जिंकले तरी प्रत्यक्षात तो काँग्रेसचा विजय असेल,’ अशा आशयाचे ट्विट थरूर यांनी केले आहे. मुळात थरूर आणि दिग्विजय यांचा पूर्वेतिहास पाहत ते या पदाला किती न्याय देऊ शकतात, हाही प्रश्नच आहे. थरूर यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर शशी थरूरही संशयाच्या भोवर्‍यात सापडले होते. त्यानंतर दिग्विजय सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित संपूर्ण हिंदू धर्मीयांवर अनेकदा गरळ ओकत टीका केली आहे.
 
 
त्यामुळे अशा हिंदूविरोधी मानसिकतेच्या व्यक्तीला काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवून काँग्रेस काय साध्य करू पाहत आहे, हे काँग्रेसच जाणे. मुळात हे दोघेही काँग्रेसपेक्षा गांधी घराण्याचे निष्ठावंत. त्यामुळे त्यांचा विजय झाला तरीही सूत्र गांधी घरण्याच्याच हातात. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनीही दिग्विजय यांना लोकसभा निवडणुकीत धूळ चारली होती. त्यामुळे आताही थरूर आणि दिग्विजय ही जोडी गांधी घराण्याच्या तालावर कसे नाचतात, हे आगामी काळात कळेलच!
 
कळवळा आणि अवकळा
 
 
मोफतवाटप योजनेचे जनक असलेल्या अरविंद केजरीवालांनी पंजाबमध्ये यश मिळवलं खरं. परंतु, आश्वासने दिली तसा कारभार मात्र तिथे होताना दिसून येत नाही. त्यांना गुजरातमध्ये जाऊन निवडणुकीचा प्रचार करता येतो, परंतु, जिथे सत्ता आहे तिथे सुविधा मात्र पुरवायच्या नसतात. केवळ हे मॉडेल, ते मॉडेल अशी गाजरं जनतेला दाखवायची. परंतु, त्या गाजराला ना चव ना किंमत. मीच तेवढा गरिबांचा मसिहा म्हणत आपले मोठमोठे दावे नाचवत बसायचे. परंतु, त्यातला फोलपणा लक्षात आला की मग मोदी आणि भाजपविरोधाची माळ जपायला घ्यायची. नुकतीच पंजाबच्या पठाणकोट येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली.
 
 
प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला आपत्कालीन स्थितीत तैनात असलेल्या कर्मचार्‍यांनी तपासणी न करता ‘रेफर’ केले. परिणामी, महिलेची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर दोन तासांनंतर महिलेने रुग्णालयाच्या व्हरांड्यातच बाळाला जन्म दिला. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला असून हॉस्पिटल प्रशासनासह आता पंजाबमधील आप सरकारवरही टीका होऊ लागली आहे. गरीब हितासाठी आम्ही प्रयत्न करतो, अशा बाता मारणार्‍या केजरीवालांना ही मोठी चपराक म्हणावी लागेल. रिक्षावाल्याच्या घरी भेट देऊन केजरीवाल प्रसिद्धी पदरात पाडून घेतात. परंतु, त्या रिक्षावाल्याच्या जीवनात फरक काय पडेल. कधी रस्त्यावर पाणीपुरी खायची जेणेकरून आपण सामान्य आहोत, अशी भावना जनेतत तयार होईल. परंतु, हा केजरीवालांचा भ्रम आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली ‘ईडी’च्या कोठडीत आहे.
 
 
त्यामुळे दिल्लीचे आरोग्यमंत्रीच तुरुंगाची हवा खात असतील, तर मग पंजाबमधील आरोग्य व्यवस्थेवर न बोललेलं बरं. त्यानंतर शिक्षणाचेही तकलादू मॉडेल उभारून चर्चा आणि प्रसिद्धी मिळवली खरी. परंतु, त्यामागील काळे धंदे उघडकीस आले आणि आपची बोलती बंद झाली. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया हेदेखील आता ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’च्या चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत. चौकशीच्या फेर्‍यात अडकल्यानंतर सिसोदिया यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाटिप्पणी सुरु केली. परंतु, आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे, हे ‘आप’ जाणूनबुजून विसरतो हे नक्की!
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0