पुण्यातील ज्येष्ठ कलाकार विजय कोटस्थाने यांचे निधन

03 Sep 2022 20:58:42


Vijay Kotasthane
 
पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य, चित्रपट व एकपात्री कलाकार विजय कोटस्थाने यांचे शनिवार, दि. ३ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर सुमारे १०० नभोनाट्ये आणि शालेय कार्यक्रम केले होते. तसेच मुंबई दूरदर्शनच्या ५० कार्यक्रमात त्यांच्या गायन-अभिनय कलेचे दर्शन, रसिकांना झाले होते. याशिवाय त्यांनी १९ मराठी चित्रपटात तसेच आसरा, हंटर दोन हिंदी चित्रपटात अभिनय केला.
 
गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ’फोटो फ्रेम’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. लनाची बेडी या सदा सतेज नाटकात रमेश देव, सीमा, राजा गोसावी, शरद तळवलकर, आशु, अबोली इत्यादी सिनेकलावंतांबरोबर साकारलेली त्यांची परागची भूमिका लोकप्रिय होती होती. विजय कोटस्थाने यांनी पुण्याच्या अभिनव विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम केले होते. तसेच लावणी भुलली अभंगाला (शाहीर प्रभाकर, चैती पुनवेच्या रात्री (सदा शाहीन), दैवगतीचा फेरा (इन्सपेक्टर महेश) संगीत वर्‍हाडी माणसे, संगीत म्यूनिसिपालिटी, देती राती, तो मीच, अंजली, सीमेवरून परत जा ही त्यांची इतर नाटके देखील गाजलेली आहेत.
 
विजयकुमार कोटस्थाने यांनी शालेय नभोवाणी, शालेय नाट्यस्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा यांमध्ये गेली ३० हून अधीक वर्षे सातत्याने लेखन दिग्दर्शन केले ते स्वत: उत्तम एकपात्री कलाकार होते आजतागायत त्यांनी १५०६ हून अधीक प्रयोग महाराष्ट्र व बाहेर केले. 
 
विजय कोटस्थाने यांनी शालेय रंगभूमीवर पुणे जिल्हा परिषद नाट्यस्पर्धेत बारा वर्षे बहुमोल कार्य केल्याबद्दल पुणे जि.प.शिक्षण विभागातर्फे सन्मानपत्रही त्यांना लाभले होते. ते १९८५-८६ चे शिक्षकोत्तम आचार्य अत्रे पारितोषिक विजेते व २००० साली कमल गोविंद पारितोषिक विजेते राहीले होते. त्यांना २०१६ मध्ये मधुकर टिल्लू एकपात्री पुरस्कार, विशेष नाट्यसेवा पुरस्कार, २०१८ मध्ये लक्ष्मीनारायण जीवनगौरव पुरस्कार असे पुरस्कार मिळाले. ‘सरगम कला अकादमी’ ही संस्था विजय कोटस्थाने यांची असून या संस्थेद्वारे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य, चित्र, जाहिराती, मालिका, महानाटय आदि कला क्षेत्रात संधी व मार्गदर्शन दिले जाते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0