कुंडलिनी शक्ती - ज्ञान-विज्ञान

29 Sep 2022 11:23:20

Yoga
पूर्वकालात धर्माच्या नावावर जेवढी युद्धे आणि त्यात जेवढा नरसंहार झाला, तसला अन्य कोणत्याही कारणाने झाला नसेल. वास्तविक परमेश्वराची प्राप्ती, त्यासाठी लागणारा मनाचा संयम आणि सामाजिक प्रेम याकरिताच सर्व धर्मांचे अवतरण झाले आहे, पण त्याच धर्माला मानवाने नरकाचे द्वार करून सोडले आहे. सुशिक्षित मानव आता धर्माकडे फारसा आकृष्ट होत नाही, याचे कारण त्या-त्या धर्मवचनातील फोलपणा व धर्माधिकार्‍यांचा द्वेषमूलक धर्मप्रचार होय. मन:स्वास्थ्याबरोबर शरीरस्वास्थ्यही प्राप्त व्हावे, असा प्रयत्न या शतकात होत आहे.
 
 
याचा शोध घेता घेता जगातील विद्वानांना असे आढळून आले आहे की, भारतीय योगशास्त्रात शरीर स्वास्थ्यासह मन:स्वास्थ्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य असून ते शास्त्र कथित धर्मसंप्रदायांच्या विषारी वातावरणापासून संपूर्णपणे अलिप्त आहे. केवळ सुखाची साधने वाढवून शरीर व मनाचे स्वास्थ्य व संतुलन न वाढता उलट शरीर व मन दुर्बळ आणि विकारी होत चालले आहे, असे आढळून आले आहे. कोणत्याही संप्रदायी धर्माची छाप नसलेल्या योगशास्त्राकडे अखिल विचारी मानव जगतात विलक्षण आकर्षण वाढत चालले आहे. जगातील सर्व स्थानी योगमार्गाची केंद्रे स्थापन होऊन त्याचा लाभ घेणार्‍या व्यक्ती वाढत आहेत.
 
 
योगसाधनेतील आसने व प्राणायाम पद्धतीमुळे शरीर व मन:स्वास्थ्य तर लाभतेच, पण साधकाचे शरीर अधिक निरोगी व स्वस्थ होऊन साधकाचे शरीर त्याच्या असलेल्या वयापेक्षा कितीतरी कमी भासते, याचाही अनुभव योग साधकांना येत आहे. या योगसाधनांची पलीकडील उच्च पायरी म्हणजे कुंडलिनी जागृती असून त्याद्वारे विलक्षण सामर्थ्य आणि सौंदर्य प्राप्त होत असते, असे आढळून आल्यामुळे सध्याच्या काळात कुंडलिनी जागृतीबद्दल विलक्षण कुतूहल उत्पन्न झाले आहे. याचा लाभ उठविण्यासाठी अनुभव नसतानासुद्धा कुंडलिनी जागृत करण्याचे आमिष दाखवणारे बरेच तथाकथित महाराज, भगवान, माताजी समोर येऊन आपापल्या शाळा स्थापन करीत आहेत. सुख समृद्धी व अध्यात्म मार्गातील आतुरतेमुळे बरीच माणसे या कुंडलिनी विषयाकडे आकर्षित होत आहेत. या विषयावर बरीच पुस्तके लिहिली जात असून त्यांचा प्रचारही सारखा वाढत आहे.
 
 
सुखाचा शोध
 
 
आजचे जीवन योग कल्पनांनी भारलेले दिसते. मग, भारलेली व्यक्ती कोणत्याही देशाची अथवा धर्माची, समाजाची असो. प्रत्येक जीवाची आणि विशेष करून मानवाची धडपड अशा सततच्या सुखाकरिता असल्यामुळे योगाबद्दल उत्पन्न झालेले आकर्षण हा सुखाच्या शोधातीलच एक भाग आहे.
 
 
अनेक शतकांपूर्वी होऊन गेलेल्या भगवान पतंजलींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या चित्तातच खरे सुख अथवा समाधान आहे, असे विचारांती दिसून येईल. सर्व आगंतुक संस्कारांचे साम्य अथवा समभाव आणि संस्कारांचे आधान म्हणजे आरोपण नष्ट झाल्यानंतरच खरे समाधान प्राप्त होत असते, असे भगवान पतंजली सांगतात. सुखाच्या शोधाकरिता आपण बाह्य सुखसमाधानाची भरमार करून त्याद्वारे प्राप्त होणार्‍या काल्पनिक सुखसंस्कारांना आपल्यावर अधिपत्य गाजवू देतो. परंतु, करमणुकीची साधने म्हणजे खरे चित्ताचे समाधान नव्हे, हे आपल्या लक्षातच येत नाही. सुखाचा प्रत्येक नवीन शोध एखाद्या व्यसनाप्रमाणे मनाची जबरदस्त पकड घेतो आणि पूर्वीपेक्षा ते मन अधिक व्यसनी होऊन बसते. सुखाच्या शोधाकरता चाललेली ही शर्यत बाहेर कल्पिलेल्या सुखाकरिता आसुसलेली असते. त्यामुळे सुख अधिक दूर राहते.
 
 
बुद्धिमान आणि शहाणी माणसे या निर्णयाप्रत आली आहेत की, सुख बाहेर नसून आतच आहे. आपल्या व्यवहारातून प्रत्येक क्षणी प्राप्त होणार्‍या अनेक संस्कारातून आपल्या मूळ अस्तित्वाला धरून असलेले जे संस्कार असतील, त्यांच्या गुणाढ्य अवस्थेला सुख असे म्हणतात. सुख प्राप्त करण्याकरिता आपल्या मूळ प्राकृतिक अवस्थेला धरून होणार्‍या स्वधर्म संस्काराद्वारेच सुख प्राप्त होऊ शकेल आणि तसला प्रयत्न म्हणजेच सुखाचा शोध होऊ शकेल. क्रमश:
 
 
- योगिराज हरकरे
 
 
Powered By Sangraha 9.0