ठाकरेंना आणखी एक दणका! शिवसेनेच्या पहिल्या आमदाराच्या कन्येचं शिंदेंना समर्थन

    28-Sep-2022
Total Views |
 
Hemangi Mahadik
 
 
मुंबई: शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांच्या कन्या हेमांगी महाडिक यांनी २७ सप्टेंबर २०२२ रोजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दर्शवतानाच यापुढे राजकीय नव्हे तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्याची इच्छा व्यक्त केली.

 
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्यानेच आम्हाला लोकांचे पाठबळ मिळत असल्याची भावना यासमयी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. हेमांगी महाडिक यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्यात सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
 


यावेळी हेमांगी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली, तसेच स्वर्गीय वामनराव महाडिक आणि लता मंगेशकर हे ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते त्या कार्यक्रमाची एक आठवण फ्रेम स्वरूपात भेट म्हणून दिली. याप्रसंगी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, आमदार भरतशेठ गोगावले तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.