जीवनसौंदर्याच्या शोधात...

27 Sep 2022 11:27:57
life
 
 
 
कधी-कधी आयुष्यातील ताणतणाव आणि चिंतांमध्ये इतरांपेक्षा आपण खरोखर किती भाग्यवान आहोत, या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. एखाद्याच्या आयुष्यात काही गोष्टी कितीही कठीण असल्या, तरी नेहमीच कोणीतरी ते कठीण काम करून दाखवत असते. सुंदर जगण्याची कला ही अपवाद न करता, मुळातच स्वतःला जाणून घेण्याचे जबरदस्त आवाहन आहे; अन्यथा सतत तुम्ही बाह्य गोष्टींच्या आणि घटनांच्या दयेवर राहत असता, ज्यामुळे तुमच्या आंतरिक जीवनाचा पाया विस्कळीत होतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तणाव, राग, संताप किंवा काळजीने ग्रासलेले असाल, तेव्हा तुमच्याकडे किती काय उपलब्ध आहे, इतरांपेक्षा तुम्ही कसे सुबत्तापूर्ण आयुष्य जगत आहोत, यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ काढा आणि जीवन खरोखर किती सुंदर भासते, हे लक्षात घ्या.
 
 
 
एखाद्या माणसाकडून सर्व काही ऐहिक बळकावून घेतले जाऊ शकते. परंतु, एक गोष्ट नक्की घेता येणार नाही आणि ती म्हणजे, कोणत्याही बिकट परिस्थितीत एखाद्याचा दृष्टिकोन निवडणे, स्वतःचा मार्ग चोखंदळणेे वा स्वतःच्या मर्जीने वागणे. स्वतःला जाणून घेणे म्हणजे आपल्या अस्सल मूलभूत स्वभावाशी जुळवून घेणे. खेदाची गोष्ट म्हणजे, बरेच लोक त्यांच्या भावनिक घटनेची जटिलता क्वचितच समजून घेतात. कित्येकांना खूप उशीर होईपर्यंत आपल्या भावनांची गुंतागुंत कळातच नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या निश्चित वास्तविकतेच्या पलीकडे जाता आणि तुम्ही स्वप्न पाहत असलेले जीवन समजून घेण्याचेे धाडस करता, निर्भयपणे जगण्याचा, आरामदायी अस्तित्वाच्या भिंतीपलीकडे जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा खर्या अर्थाने जीवनात निर्भेळ सौंदर्याचे विश्व निर्माण होते.
 
 
आयुष्यात नक्की काय होईल, हे क्वचितच सांगता येते. सर्वसामान्यपणे आपल्याला पुढच्या क्षणी काय घडेल, याचाही विचार करणे अवघड होते. कधी कुठल्या क्षणाला काय उल्कापात घडेल, हे माणसाला सांगता येत नाही. उदास रात्री अचानक बरसणार्या मुसळधारपावसाप्रमाणे, आयुष्यात जेव्हा असे काही अकल्पित बदल घडून येतात, तेव्हा अनिश्चिततेचा महापूर येऊ शकतो. जीवनातील जटील घटना तुम्हाला भयानक त्रास देऊ शकतात आणि तुम्हाला असुरक्षित ठेवू शकतात. वरवर पाहता दुखापत वा नुकसान होण्याच्या भीतीने तुम्ही ती जोखीम घेणे थांबवता.
 
 
अवघड परिस्थितीमध्ये माणसाचा तो एक सामान्य प्रतिसाद असतो, पण आपण ज्या खजिन्याची उत्कंठा बाळगून असतो, त्या खजिन्यापर्यंत कधीही न पोहोचता सोयीस्कररित्या माघार घेणे, ही तशी जीवनातली कमतरता आहे, शरणागती आहे. बहुतेक लोक आनंदासाठी, सुखासाठी धडपडत असतात. 30 दिवस किंवा त्याहून कमी दिवसांत आनंद मिळविण्याचे रहस्य घोषित करणार्या सल्ल्यांनी दुकानातले बुकशेल्फ्स भरलेले आहेत. तरीही संशोधनातून असे दिसून येते की, आपण पूर्वीपेक्षा आज या घडीला कमी आनंदी आहोत. कदाचित आजच्या तंत्रज्ञानामधून सामाजिक परस्परसंवाद जसलेले अविवेकी रुक्ष भाव आपल्या मनात निर्माण झाल्यामुळे असे वाटत असेल. या शतकातील शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो, “आपण अनुभवू शकणारी सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, आयुष्यात अचानक उद्भवणारी रहस्यमयता. ही रहस्यमयता पृथ्वीतलावरील सर्व खर्या कला आणि विज्ञानाचा उगम आहे.”
 
 
आयुष्य खूपच सुंदर आहे, पण कधी कधी तुम्हाला याची आठवण करून द्यावी लागते. त्या कारणास्तव, निराशेच्या भरात वितळण्याऐवजी तुमच्या कठीण समस्यांना आपल्या समोर उभे ठाकलेले एक मोहक साहस म्हणून पाहा! आव्हानात्मक परिस्थितीत असताना, आपल्या आकलनातील बदल तुम्हाला तुमची वैयक्तिक वाढ जोपासण्यासाठी आणि कठीण क्षणांची प्रशंसा करण्यास चालना देते, जे आश्चर्यकारक क्षणांपासून वा प्रसंगापासून भरलेले आहे.
 
 
या अडचणी जेव्हा अचानक उद्भवतात तेव्हा त्याबद्दल तुम्ही किती जागरूक असले पाहिजे, याची कल्पना तुम्हाला येऊ लागते. स्पष्टपणे ऊहापोह करायचा झाला, तर बर्याच लोकांचा आनंद नवीनतम ‘स्मार्टफोन’ किंवा ’स्पोर्ट्स कार’च्या मालकीशी जोडलेला नसतो. हा तात्त्विक सल्ला स्पष्ट दिसत असला, तरी बरेच लोक अजूनही भौतिक वस्तू एकत्र करून मनाच्यागाभ्यातील शून्यता वा रितेपण भरायचा प्रयत्न करत असतात.
 
 
यामुळे उलट अधिक ऐहिक इच्छा माणसाच्या मनात निर्माण होतात आणि आपल्याकडे जर मर्यादित आर्थिक संसाधने असल्यास, पुढील वेदना आणि दुःख बळावत जातात. जगात सर्व काही जसे असायला पाहिजे, जाणून घ्या. आयुष्यातील सगळ्याच गोष्टी जाणीवपूर्वक बदलण्याचा प्रयत्न करू नका आणि समोर ठाकलेली गंभीर परिस्थिती बदलायला हवीच, अशी स्वतःवर जबरदस्ती करू नका. त्या परिस्थितीतून पुढे जाण्याची तयारी ठेवा. तुम्हाला कसे वाटते, याच्या पलीकडे जाऊन पाहा आणि तुम्ही ज्यासाठी पात्र आहात, त्या गोष्टींच्या संपर्कात राहा.
 
 
रोज होणारा प्रत्येक नवीन सूर्योदय हा नवीन संधी शोधण्याची आणि स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी असते. तसेही संधी आणि नवीन संधी तुम्हाला दररोज घेरतात. तुम्ही यापूर्वी अनेक वेळा एका वाईट परिस्थितीतून यशस्वी मार्गक्रमण केले आहे आणि आता मागे वळून बघू शकता की, त्या बिकट परिस्थितीने तुम्हाला आज कसे मजबूत केले आहे. आयुष्याकडे कुतूहलपूर्वक पाहा, उत्सुक व्हा आणि तुम्ही कशामुळे प्रकाशित होता, ते शोधा. तुम्हाला ऐश्वर्य मिळाले नसले, तरीही ते मिळवण्यासाठी तुम्ही दररोज काय करू शकाल, याचा विचार करा. तुम्ही पाहिलेले तुमचे ते स्वप्न प्रत्यक्षात येईपर्यंत त्या दिशेने तुमची पावले टाका.
 
 
कबूल आहे की, आपल्या सर्वांना जीवनातील सौंदर्य शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. कधी असे वाटते की, सूर्य प्रकाशणार नाही किंवा नशीब पुन्हा चमकणार नाही, विस्कटलेली जीवनाची गाडी आपल्या रुळावर येणार नाही. पण विश्वास ठेवा, एक सुंदर जीवन जगणे म्हणजे अशक्त आणि अक्षम परिस्थितीला सकारात्मक, सशक्त आणि सक्षम जीवन अनुभवांमध्ये बदलणे!
 
 
डॉ.शुभांगी पारकर  
 
 
Powered By Sangraha 9.0