चंदिगढ विमानतळाला ‘शहीद भगतसिंग’ यांचे नाव

26 Sep 2022 12:34:00

चंदिगढ विमानतळ
 
 
नवी दिल्ली: चंदिगढ विमानतळ आता ‘शहीद भगतसिंग’ या नावाने ओळखले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमात पंजाबच्या जनतेला ही भेट दिली आहे. “चंदिगढ विमानतळाला ‘शहीद-ए-आझम’ यांचे नाव देण्यात यावे, अशी पंजाबी जनतेची अनेक दिवसांपासून मागणी होती. स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली म्हणून विमानतळाला आता नव्या नावाने ओळखले जाईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ’‘विमानतळाच्या नावातील बदलाचे पंजाब आणि हरियाणातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. पंजाबींची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे,” असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले.
 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात प्रथम आफ्रिकेतील नामिबियातून आणलेल्या चित्त्यांचा उल्लेख करत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, “एक ‘टास्क फोर्स’ मध्य प्रदेशातील ‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये आणलेल्या आफ्रिकन चित्त्यांवर लक्ष ठेवत आहे आणि त्यांच्या अहवालाच्या आधारे सामान्य लोकांना हे चित्ते कधी पाहता येतील, हे ठरवले जाईल. ‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये सोडण्यात आलेल्या आफ्रिकन चित्त्यांचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, “देशाच्या कानाकोपर्‍यातील लोकांनी चित्ता भारतात परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हे 130 कोटी भारतीयांचे निसर्गप्रेम आहे.”
 
 
 
पंतप्रधान पुढे म्हणाले की, “गुजरातमध्ये राष्ट्रीय खेळांचे आयोजन होणार आहे. हा एक अतिशय खास प्रसंग आहे. कारण, अनेक वर्षांनी राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले जात आहे. कोरोना महामारीमुळे यापूर्वीचे कार्यक्रम रद्द करावे लागले.
 
 
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की, ”या दिवशी मी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये असेन.”
 
 
दरम्यान, चालू महिन्यात दि. 27 ते 10 ऑक्टोबरदरम्यान गुजरातमध्ये 36व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय खेळांचे आयोजन गुजरातमधील गांधीनगर, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या सहा शहरांमध्ये केले जाणार आहे.”
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0