निसर्गाचा स्वच्छतादूत कावळा

26 Sep 2022 11:03:26

crow
 
 
 
नुकताच पितृपंधरवडा संपला, या दिवसात सर्वात जास्त मागणी असते ती कावळ्याला. हा कावळा इतर दिवशी खिडकीवर येऊन कावऽऽ कावऽऽ करू लागला तर त्याला हाकलले जाते. जाणून घेऊया याच निसर्गाच्या स्वच्छता दूताची गोष्ट...
 
 
लहानपणापासून आपल्याला काही गोष्टींची भुरळ पडते, ज्या कल्पना वास्तवाशी समांतर होतात. मला बालपणीच्या काही आनंदी आठवणी आठवतात. मी आणि आई खिडकीजवळ बसायचो आणि ती मला जेवण भरवायची. खिडकी बाहेर आंब्याचे मोठे झाड होते. त्यावर अनेक बुलबुल, चिमण्या, भारद्वाज, ‘फ्लायकॅचर्स’ असे पक्षी यायचे. पण त्यासर्वांमध्ये माझं लक्ष वेधून घेणारा म्हणजे कावळा. तुम्ही, मी, आणि आपल्या ओळखीमधील बर्‍याच मुलांनी चिऊ-काऊच्या छोट्या गोष्टी नक्की ऐकल्या असतील.
 
 
मुलांना या पक्ष्याची ओळख ’कावळे-दादा’ म्हणून होते, पण जसजसे वय वाढते, तसा कावळा आणि इतर पक्ष्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, तो दुरावा थेट पितृपक्षात भरून निघतो. या सुगीच्या दिवसात कावळ्याला ‘व्हीआयपी’चा दर्जा मिळतो.
शहरी भागांमध्ये कावळ्यांची संख्या वाढली आहे, असे आपल्या निदर्शनास आलेच असेल. ते सहज उपलब्ध होणार्‍या कचर्‍यावर दिसून येतात आणि बरेच पक्षिप्रेमी त्यांना खायला देखील घालतात. युरोप, चीन, जपान आणि भारतासह जगाच्या विविध भागांमध्ये कावळा आणि ’रेव्हन’ला प्रतीकात्मक अर्थ दिला गेलाय. साहसा कथा, दंतकथा आणि काव्यांमध्ये त्यांचा उल्लेख दिसतो. मूलत:, जगभरातील विविध लोक त्यांना अशुभ किंवा मृत्यूची निशाणी असे मानतात. परंतु, याबरोबर कावळ्यांना हुशार आणि बुद्धिमान पक्षीसुद्धा मानले जाते. ज्याप्रमाणे कावळ्याचं सामाजिक जीवनात शतकांपूर्वी महत्त्व होतं, तसं अजूनही उरलय का,असा प्रश्न मला अनेकदा पडतो. त्याचबरोबर सध्याच्या ’मोबाईल’ युगात त्यांचे काय स्थान आहे आणि आजची तरुण पिढी त्यांच्याविषयी असलेल्या कथांशी परिचित आहे का?
 
 
 
पितृपक्षाच्या काळात, जेव्हा सूर्य डोक्यावर आलेला असतो, तेव्हा आपल्याला कावळ्यांना खाऊ घालायला उत्सुक लोकं दिसतात. कावऽऽ कावऽऽ असं म्हणून लोकं त्यांना हाक मारतात. वरण-भात, भाज्या, श्रीखंड हे केळीच्या पानात रचून इतर चवदार पदार्थांसह कावळ्यांना अर्पण केले जातात. काही वेळाने, कावळे आजूबाजूला येऊ लागतात आणि यजमानांना तृप्त करत अन्नाचे सेवन करण्यास सुरुवात करतात. हिंदू विधीचा हा भाग, श्राद्ध, हा एक वार्षिक विधी असून तिथी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूच्या स्मृतिदिनी आयोजित केला जातो. हिंदूंच्या मते, कावळे हे जीवंत आणि मृत जगत यांच्यातील दुवा आहेत. असे म्हणतात की, आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात आपल्याला भेटून जातात. कावळ्यांना खाऊ घालणे, शुभ मानले जाते आणि सर्व प्रकारच्या प्रसंगी केले जाते. जेव्हा कावळा जेवणाला (पिंडाला) शिवतो आणि खायला लागतो तेव्हा श्राद्ध संपते.
 
 
हे सूचित करते की, आपल्या प्रिय व्यक्तीचा आत्मा आता तृप्त आणि शांत आहे. कावळे हे शनिदेवाचे दैवी वाहन मानले जातात. अमावस्येला कावळ्यांना अन्न देणे महत्त्वाचे मानले जाते. कावळ्यांना अन्न अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतील आणि आपले दुःख काही प्रमाणात कमी करतील, त्याचबरोबर आपल्या कठीण प्रसंगात मदतीचा हात पुढे करतील, असे मानले जाते. सेवनासाठी कावळ्याची शिकार केल्यास पितृदोष आणि शनिदोष होऊ शकतो, अशी लोकांमध्ये मान्यता आहे. सोन्याच्या कावळ्यावर बसलेले शनिदेव पुद्दुचेरीतील थिरुनाल्लर मंदिरात आपल्याला बघायला मिळतात. वशिष्ठऋषीं श्रीरामाला भूसुंदा नामक कावळ्याची कथा सांगतात, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. मेरू पर्वतावर कल्पवृक्षाच्या माथ्यावर भूसुंदा, एक शांत, उत्कटतेने मुक्त आणि उच्च मनाचा कावळा राहत होता. अत्यंत बिकट आणि पराकोटीच्या संकटांना समोर जातानासुद्धा शांत राहण्याचा सल्ला वशिष्ठरुषींनी श्रीरामाला भूसुनंदाचा गोष्टीतून दिला. हिंदू धर्माशी निगडित आणि दंतकथांमध्ये उल्लेख केलेल्या कावळ्यांच्या काही कथा आणि पुराणकथा आहेत. आता कावळा-कथेचा पर्यावरणीय भाग पाहू.
 
 
भारतीय उपखंडात कावळे आणि कावळ्याशी संबंधित 11 प्रजाती आढळतात. यामध्ये कावळे, रेवन, जॅकडॉ, कफ आणि रूक यांचा समावेश आहे. आपण शहरी भागात पाहतो, त्या कावळ्याला इंग्रजीत र्केीीश उीेु (र्उेीीर्ीीं ीश्रिशपवशपी) म्हणतात. असे म्हणायला हरकत नाही की, देशात आढळणार्‍या पक्ष्यांची ही सर्वत्र आढळणारी प्रजाती आहे. मृत्यू आणि क्षयाच्या कोणत्याची चिन्ह्याची चाहूल लागताच कावळे तिकडे हजर होतात. गिधाडांनंतर, शहरी भागातील ते एकमेव पक्षी आहेत, जे मृतदेह खातात. 1990 च्या दशकात गिधाडांची संख्या खूप चांगली होती, पण ती ढासळल्यावर मेलेल्या प्राण्यांना खाण्याची संपूर्ण जबाबदारी कावळ्यांनी उत्तमरित्या पेलली. आपल्या घराजवळ आढळणारी आणखी एक कावळ्याची चुलत प्रजाती म्हणजे डोमकावळा किंवा ज्याला इंग्रजीत र्गीपसश्रश लीेु म्हणतात. हा सर्वसामान्य कावळ्यापेक्षा थोडा मोठा, रंगाने गडद आणि त्याची चोच लांब असते. डोमकावळे शहरी भागात तसे दुर्मीळ असतात. परंतु, घनदाट जंगल असलेल्या भागात ते मोठ्या प्रमाणात आढळतात. माझ्या निरीक्षणात असे आले आहे की, एखाद्या सर्वसामान्य कावळ्याच्या गटाच्या तुलनेमध्ये डोमकावळ्यांचा गट हा शवावर जास्त वेगाने भक्षण करतो. जंगलात संशोधन सुरू असताना, आम्ही एका बिबट्याने मारलेल्या हरणाच्या शवावर ‘कॅमेरा ट्रॅप’ लावला. बिबट्यापेक्षा जास्त ते शव डोमकावळ्याच्या जमावाने खाल्ले. एका दिवसातच मृतदेहावर हरणाची हाडे दिसू लागलेली.
 
 
सर्वत्र गोंगाट करतो आणि कचरा टाकतो, अशी त्यांची ख्याती असूनही, कावळा कचरा व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतो. कावळे दरवर्षी बराच कचरा खातात, ज्यामुळे रोगांचा प्रसार आणि दुर्गंधी रोखली जाते. कावळ्यांमध्ये गिधाडांप्रमाणेच अत्यंत कार्यक्षम पचनसंस्था असते आणि सर्वभक्षी पक्षी म्हणून ते मांस आणि वनस्पतीदेखील खाऊ शकतात. अन्न मिळविण्यासाठी पक्षी साधने वापरून पाहिली गेल्याने अन्न शोधताना त्यांची बुद्धिमत्ता एक महत्त्वाची भूमिका बजावते. कावळ्यांना रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे ‘डस्टबिन’ बंद किंवा रिकामे ठेवणे; अन्यथा, ते नेहमी त्यात प्रवेश करण्याचा मार्ग शोधतील. आफ्रिकेत, कावळे वेस्ट नाईल विषाणूचे सूचक आहेत. कावळे या विषाणूला संवेदनाक्षम असतात. त्यामुळे प्रादुर्भावाच्या वेळी कावळे भयंकर वेगाने मरण पावतात, ज्यामुळे आरोग्याच्या काळजीची प्रतिक्रिया निर्माण होते. ते ‘एव्हीयन फ्लू’ किंवा ‘बर्ड फ्लू’चेदेखील सूचक आहेत.
 
 
 
 
crow
 
 
 
कावळे आणि रेवन हे बुद्धिमान पक्षी आहेत, जे त्यांना प्रजाती म्हणून सामाजिक बनवतात. रात्री एकत्र झोपण्यासाठी ते मोठ्या संख्येने जमतात, त्याला ’कॉम्म्युनल रुस्ट’ म्हणतात. असे आढळून आले आहे की, जेव्हा एखादा कावळा मरण पावतो तेव्हा सर्व कावळे त्यांच्या मृत भाऊबंदांसाठी अंत्यसंस्कार करतात. ते असे का करतात? काही अभ्यासकांनी असे सुचवले आहे की, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे हा जगण्याच्या रणनीतीचा एक भाग आहे. ते धोक्यांबद्दल शिकतात आणि जिथे त्यांना मेलेला कावळा आढळला असेल अशा कोणत्याही ठिकाणी पुन्हा जाण्यास ते संकोच करतात, जरी तेथे भरपूर अन्न असले तरीही. अनेक प्राणिशास्त्रज्ञ कावळ्यांना कौतुकाने ’पंख असलेले एप्स’ म्हणतात. त्यांच्या शरीराच्या आकाराच्या सापेक्ष, कावळ्याच्या मेंदूचा आकार मोठा असतो, या पक्ष्यांच्या एकूण वजनाच्या जवळपास तीन टक्के असतो. ते एकमेव पक्षी प्रजातींपैकी एक आहेत जे साधने वापरण्यास सक्षम आहेत.
 
 
तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आठवते? बरं, ही केवळ एक गोष्ट नाही, ते कवच असलेलं फळ फोडण्यासाठी चालत्या वाहनांचा वापर करत असल्याचेही आढळून आले आहे. कावळे त्यांची बुद्धी वेगवेगळ्या व्यक्तींना लक्षात ठेवायला सुद्धा वापरतात आणि या प्रतिभेचा उपयोग ते राग ठेवण्यासाठीदेखील वापरतात बरं का! त्यांना किंवा त्यांच्या घरट्याला धोका वाटल्यास ते त्या मनुष्यावर वारंवार हल्ला करण्यासाठी ओळखले जातात. कावळ्यांच्या समूहाला इंग्रजीत ’मर्डर’ म्हटले जाते, पण त्याचा आणि त्यांच्या राग ठेवण्याच्या प्रतिभेशी काही संबंध नाही.
 
 
अशा प्रकारे आपण पाहिलं की, हिंदू समाजात कावळ्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे आणि त्याहून अधिक ते पर्यावरणासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावतात. बर्‍याचवेळा असं होतं की, जे आपण सामान्यतः पाहतो, ते सहसा गृहीत धरतो, तसाच काही कावळ्यांच्या बाबतीत आपला दृष्टिकोन आहे. कावळ्यांच्या अस्तित्वाचे कौतुक वर्षभर व्हायला हवे आणि केवळ पितृपक्षातच नाही, असे मला प्रामाणिकपणे वाटते.
 
 
-ओंकार पाटील
 
 
 
Powered By Sangraha 9.0