भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी राज्यात ‘श्वान दत्तक योजना’ राबवा

26 Sep 2022 12:56:31


sarnaik
 
 
ठाणे:  “राज्यभरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून रस्तोरस्ती कुत्र्यांच्या टोळ्या पाहावयास मिळत आहेत. भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी ठोस धोरण ठरवून ’श्वान दत्तक योजना’ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरु करण्यात यावी,” अशी मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
सध्या राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येची चर्चा होत आहे. लाखो भटके कुत्रे असून त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत स्थानिक यंत्रणा किंवा राज्य सरकारने तोडगा काढावा, ठोस धोरण ठरवावे, अशी मागणी होत आहे. ठिकठिकाणी श्वानदंशाच्या घटना घडत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिक यात जखमी होतात, तर भटके कुत्रे मागे लागल्याने वाहनांचे अपघातही होतात.
 
 
अशा अनेक गोष्टींचा त्रास होत असल्याने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरीत असून अनेकदा सर्वसामान्य नागरिक आणि श्वानप्रेमी यांच्यात संघर्ष होत असल्याचेही दिसते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने स्पष्ट धोरण ठरवून ’श्वान दत्तक योजना’ सुरू करावी, अशी सूचना आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0