"भारताची स्टार्टअप हब महाराष्ट्रच, आता पुढे वाटचाल करायची"

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तरुणांना आवाहन

    25-Sep-2022
Total Views |
 
maratha chamber of commerce
 
 
पुणे : "भारतातील ८० हजार स्टार्टअप्सपैकी तब्बल १५ हजार स्टार्टअप्स हे एकट्या महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे देशाचे स्टार्टअप हब महाराष्ट्रच आहे" असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फडणवीस बोलत होते. महाराष्ट्राने गाठलेला हा मोठा पल्ला आहे आणि आता आपल्याला अजून पुढे जायचे आहे असा संदेशही त्यांनी या सभेसाठी जमलेल्या नव उद्योजकांना दिला. आजही उद्योजकता आणि त्यासाठी लागणारी इकोसिस्टिम महाराष्ट्रात आहे आणि यामुळेच महाराष्ट्र उद्योजकतेच्या देशात सर्वात पुढे आहे असाही दावा फडणवीसांनी केला.
 
 
भारतात १०० युनिकॉर्न स्टार्टअप असतील तर त्यातील २५ युनिकॉर्न्स स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहेत. २०१४ च्या आधी पर्यंत देशी - परदेशी गुंतवणूक दारांसाठी महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी काही आकर्षणाचे स्थान नव्हता. पण २०१४ नंतर महाराष्ट्रात प्रथमच उद्योजकांना पूरक अशी धोरणे आखली गेली. या सर्व धोरणांमुळेच २०१४ सालपर्यंत महाराष्ट्रात फक्त २ बिलियन डॉलर्स इतकीच परकीय गुंतवणूक येत होती पण २०१९ या कालावधीत आपण ही गुंतवणूक २२ बिलियन डॉलर्स पर्यंत घेऊन गेलो हे आपले यश होते. परकीय गुंतवणुकीत महारष्ट्राने २०१७ मध्येच प्रथम क्रमांक पटकावला होता. ही एवढी प्रगती आपण त्या अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत साध्य केली होती असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीचा आलेखच सर्वांसमोर मांडला.
 
 
आपल्याला अशा प्रकारे उद्योगकेंद्रित योजना आखाव्या लागतील. त्याच बरोबर तशा योजनांची यशस्वी अंमलबजावणी देखील करावी लागेल. कारण महाराष्ट्रात तशी संस्कृती आहे. महाराष्ट्रात त्यासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा आहेत. त्यामुळे आपण ते सर्व साध्य करूच शकतो. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राची औद्योगिक घडी जी विस्कटली आहे ती पुन्हा रुळावर आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी लागणारे सर्वच प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा नंबर वनचे राज्य बनवू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.