बोलण्यात शरीफ अन् वागण्यात...?

    25-Sep-2022   
Total Views |
shahbaz
 
 
संयुक्त राष्ट्रसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा आपला काश्मीर राग आळवला. शरीफ यांनी साळसुदपणाचा आव आणत अफाट मुक्ताफळांची उधळण केली. पाकने यावेळी भारतासहित सर्व शेजारी देशांसोबत शांततेचे संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यासोबत काश्मीरचा मुद्दाही छेडला. भारताला अप्रत्यक्षरित्या चार गोष्टी सांगणार्‍या पाकिस्तानला भारतानेही चांगलेच प्रत्युत्तर दिले. संयुक्त राष्ट्रातील ‘भारत मिशन’चे प्रथम सचिव मिजिटो विनिटो यांनी पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताविरूद्ध खोटे आरोप लावण्यासाठी या व्यासपीठाची निवड केली. पाकिस्तानने दुसर्‍यांना चार गोष्टी सांगण्याआधी स्वतःच्या देशातील दहशतवाद संपवावा. तसेच सीमेवर विनाकारण कुरापती करू नये, असा सल्ला देत स्वतःच्या देशातील दहशतवादी कृत्ये लपवण्यासाठी पाकिस्तान कांगावा करत असल्याचा आरोप विनिटो यांनी केला. भारतीय राजदूत विनिटो यांनी पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा अगदी कमी शब्दांत फाडला. यावेळी विनिटो यांनी पाकिस्तानला त्यांच्या मागील काळ्या कृत्यांचीदेखील आठवण करून दिली.
 
 
पाकिस्तानने भारतावर खोटे आरोप लावण्याआधी आपली कृत्ये तपासून पाहावी. जम्मू-काश्मीरवर दावा सांगण्याआधी आणि सतत तेच तेच रडगाणे गाण्याआधी इस्लामाबादने सीमेपलीकडे केला जाणारा दहशतवाद थांबवला पाहिजे. त्याचप्रमाणे, पाकिस्तानने त्यांच्या देशातील हिंदू, शीख, ख्रिश्चन कुटुंबीय आणि त्यांच्या मुलींचे जबरदस्तीने केले जाणारे अपहरण, त्यांचे विवाह आणि धर्मांतर या मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित करायला पाहिजे. अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असून त्यांना आळा घालण्यासाठी पाकने ठोस पावले उचलायला हवीत, अशा शब्दांत विनिटो यांनी जोरदार ताशेरे ओढले. मानवाधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार संरक्षित राहिले पाहिजे. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबला, तर अनेक गोष्टी सहज शक्य आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक सरकार आंतरराष्ट्रीय समुदाय आणि स्वतःप्रती इमानदार राहिल्यास आणि अल्पसंख्यांंकाना त्रास न दिला गेल्यास शांतता आपोआप प्रस्थापित होईल, असेही विनिटो म्हणाले.
 
 
पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शांततेचे बडबडगीत गायले. मुळात पाकिस्तानने शांततेवर भाष्य करणे हाच एक मोठा विनोद. पाकिस्तानने याआधीही शांततेचे अनेक प्रस्ताव मांडले. कल्पना सांगितल्या. परंतु, शांतता फक्त सांगत बसायची, मांडत बसायची आणि कृत्य मात्र वेगळंच करायचं ही पाकिस्तानची जुनी खोड आहे. जर पाकिस्तानला खरोखरच शांतता प्रस्थापित करावेसे वाटत असेल, तर त्यात वाईट काहीच नाही. परंतु, मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना आपल्याकडे आश्रय देऊन पाकिस्तान दुतोंडी आहे, हे पुन्हा एकदा समोर आले. या परिषदेत शहबाज शरीफ यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले मत प्रदर्शित केले. १९४७ नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाले. या युद्धानंतर दोन्ही बाजूंना फक्त गरिबी आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली, अशी उपरती शरीफ यांना झाली. परंतु, शरीफ फक्त नावाने शरीफ आहेत. बोलण्याने आणि वागण्याने तर बिलकुल शरीफ नाही. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकमेकांना सीमेसहित अनेक मुद्द्यांवर जोडलेले आहेत.
 
 
युद्ध हा दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय नाही. त्यामुळे फक्त शांततापूर्ण पद्धतीनेचर्चेतूनच समाधान आणि योग्य पर्याय निघू शकतो. मुळात पाकिस्तानला शांततेचा इतका पुळका कशासाठी आला, असा प्रश्न उभा ठाकतो. त्याचे कारण पाकिस्तान देशाबाहेर आपले शांततेचे तुणतुणे वाजवत राहतो. परंतु, घरात मात्र एकमेकांचे गळे कसे कापायचे याचे विचार करत असतो. पाक जाणून आहे की, हा नवा भारत आहे. डिवचलं तर वेळ पडल्यास घरात घुसूनदेखील मारायला मागेपुढे पाहत नाही. अभिनंदन हे त्याचे चांगले उदाहरण आहे. आर्थिक गंटागळ्या खाणार्‍या पाकिस्तानने कितीही शांततेचा राग आळवला, तरी पाकिस्तानची ओळख जगाला चांगलीच आहे आणि भारताला तर पक्की माहिती आहे. त्यामुळे उगाच भारताला सल्ले देण्यापेक्षा पाकने सध्याची महापुराची आणि आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी आणखी काही देशांचे दौरे करावेत जेणेकरून काही दिवस गुजराण करण्यासाठी झोळीत कर्जाचे मापटे पडेल.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.