जनता अडचणीत होती, तेव्हा कुठे होतात? गोपीचंद पडळकरांचा ठाकरेंना सवाल

25 Sep 2022 20:24:13
 
padalkar
 
 
मुंबई : तुम्ही सत्तेत असताना जेव्हा राज्यातील जनता अडचणीत होती, तेव्हा तुम्ही कुठे होतात ? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे. 'भाजपसोबत केलेल्या विश्वासघातामुळे आणि राजकीय घडामोडींमुळे अनावधानाने तुमच्याकडे राज्याची सत्ता आली होती. अडीच वर्षे तुमच्या वडिलांकडे मुख्यमंत्रीपद आणि तुमच्याकडे मंत्रिपद होता, तेव्हा तुम्ही काय केलंत ? कोकणात २ वेळा पुराने थैमान घातले होते, ३ वेळा राज्याला अतिवृष्टीने झोडपून काढले, लोकांना मदतीची गरज होती. मात्र तेव्हा तुम्हाला जनता दिसलीच नाही,' असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनावर पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. आ. गोपीचंद पडळकर म्हणाले की, 'आदित्य ठाकरेंची अवस्था म्हणजे बैल गेला अन झोपा केला अशी स्थिती झाली आहे. तुम्ही अडीच वर्षे सत्तेत होता, पण जनतेत नव्हतात.जनता अडचणीत असताना त्यांना मदत करणे हेच सरकारचे प्राथमिक कर्तव्य असते.
 
 
 कोरोनाकाळात राज्याची अवस्था दयनीय होती, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली, तेव्हा आपण काय केलं ? लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या सोडवणे गरजेचे होते मात्र तुम्ही ते केले नाहीत. आता तुमच्या हातून राज्याची सत्ता आणि स्वतःचा पक्ष निघून गेल्यानंतर तुम्हाला जनतेची अडचण दिसत आहे. त्यामुळे जनता अडचणीत असताना तुम्ही कुठे होतात हा सवाल उपस्थित होणे अपरिहार्य आहे.' असे पडळकरांनी म्हटले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0