गेहलोत की थरूर ?

    25-Sep-2022
Total Views |
gehlot  
 
 
जे तिवारी आणि थरूर उमेदवार असतील तर होईल तेच गहलोत आणि दिग्विजय उमेदवार असतील तर होईल आणि ते म्हणजे, मतांची विभागणी. तेव्हा सोनिया गांधी ते टाळण्यासाठी अखेरीस गहलोत यांच्या पारड्यात आपले वजन टाकतील, हेही स्पष्ट आहे.
 
 
 
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीस सुरुवात झाली आहे आणि आपण या शर्यतीत नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिल्यानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांसाठी आणि मुख्य म्हणजे, पूर्णवेळ अध्यक्ष असण्यासाठी स्वर उठू लागले होते. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी काळजीवाहू अध्यक्ष झाल्या होत्या. मात्र, सोनिया, प्रियांका किंवा राहुल यापैकी कोणाचाही करिश्मा त्यानंतरच्या निवडणुकीत दिसला नाही. साहजिकच पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असायला हवा, अशी मागणी जोर धरू लागली. काँग्रेसमधील 23 बुजुर्गांनी तर यासाठी आवाज उठविलाच. शिवाय अप्रत्यक्षपणे राहुल यांच्या कार्यशैलीवर बोट ठेवले. तरीही आताच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक काँग्रेसजनांनी पुन्हा राहुल यांनाच गळ घालून पाहिली, हे विशेष. उत्सवी आणि प्रासंगिक नेतृत्वाला काँग्रेसजन तरीही पूर्णवेळ अध्यक्ष करू पाहतात, यातच काँग्रेसची अगतिकता दिसून येते.
 
 
काँग्रेस पूर्वीही निवडणुकांत पराभूत होत नव्हती, असे नाही. मात्र, निदान काँग्रेसमधील गटबाजीला एकीकडे प्रोत्साहन देत दुसरीकडे काँग्रेसला बांधून ठेवून आपले नेतृत्व अबाधित ठेवण्याची कसरत करण्यात, तरी काँग्रेस नेतृत्वाला यश येत होते. आता तेही चित्र दिसत नाही आणि देशभर काँग्रेसला गळती लागली आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असतानाच गोव्यात काँग्रेसला खिंडार पडावे, हे त्यातील विदारक चित्र. तेव्हा काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची किती गरज आहे, हेच त्यातून अधोरेखित झाले हे खरे. तथापि काँग्रेसची संघटनात्मक वीणच एवढी विसविशीत झाली आहे की कोणीही अध्यक्ष झाले, तरी समोर आव्हानांचा डोंगर उभा असणार आहे. त्यातील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे काँग्रेसला गांधी कुटुंबीयांच्या प्रभावातून बाहेर काढणे. तथापि हे शक्य आहे का आणि मुदलात गांधी कुटुंबीय निवडणुकीपासून दूर राहणार असले, तरी पक्षाची सूत्रे सोडून देण्यास राजी आहेत का, हा कळीचा मुद्दा आहे. त्यातच या निवडणुका खरोखरच पारदर्शी पद्धतीने होतात का, यामुळेही निवडणुकीमागील डावपेचांची शंका येऊ शकते.
 
 
या स्पर्धेतील प्रमुख नाव आहे ते अशोक गहलोत यांचे. राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नसतील, तर आपण निवडणूक लढवू, असे विधान त्यांनी केले. अर्थात, राहुल गांधी यांनी नकार दिल्याने गहलोत हे उमेदवार असतील, हे आता जवळपास निश्चित आहे. गहलोत गेली 45 वर्षे सक्रिय राजकारणात आहेत. केंद्रात मंत्रिपद त्यांनी सांभाळले होते. परंतु, मुख्यतः त्यांची कारकिर्द ही राजस्थानातील आहे. ज्या मोजक्या राज्यांत काँग्रेसचे सरकार आहे, त्यात राजस्थानचा समावेश आहे. अर्थात, तेथेही गटबाजी नाही असे नाही. सचिन पायलट आणि गहलोत यांच्यात तीव्र मतभेद आहेत आणि दोघांचे गट परस्परांवर कुरघोड्या करीत असतात. अर्थात, काँग्रेसमधील अन्य नेत्यांच्या तुलनेत राजकीय आणि प्रशासकीय असा दोन्ही अनुभव आणि तोही दीर्घकाळ असणारे गहलोत हेच आहेत. शिवाय सध्या ते मुख्यमंत्रीही असल्याने जनाधार असणारे नेते आहेत असे मानण्यास जागा आहे.
 
 
तथापि तरीही गहलोत यांची ओढ काँग्रेस अध्यक्षपदापेक्षा राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाकडे अधिक आहे, हे लपलेले नाही. किंबहुना राहुल यांच्या निवडणूक लढविण्यास दिलेल्या नकारानंतर गहलोत यांनी उमेदवारी स्वीकारण्यास तयारी दर्शविली, तरीही मुख्यमंत्रिपददेखील स्वतःकडे ठेवण्यासाठी त्यांची धडपड होती. याचा एक अर्थ असा होतो की, राजस्थानच्या राजकारणावर कदाचित आपली पकड असली, तरी काँग्रेस अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय राजकारणावर आपला प्रभाव किती असेल, याविषयी गहलोत यांच्या मनातच साशंकता असावी. दुसरा अर्थ असाही होतो की, काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले म्हणजे पंतप्रधान होता येईलच, याची शाश्वती नाही. तेव्हा त्यासाठी असणारे मुख्यमंत्रिपद का सोडावे, अशी गहलोत यांची धारणा असावी. पण निवडणुकीपूर्वीच अशी हतोत्साहित स्थिती दिसली, तर अध्यक्ष झाल्यावर संघटनेत गहलोत प्राण कसे फुंकणार, हा प्रश्न उपस्थित होतो.
 
 
त्यातच त्यांच्या उमेदवारीमागे गांधी कुटुंब आहे, हे उघड दिसावे असे नेपथ्य गेल्या काही दिवसांत घडले आहे. दक्षिण भारतात राहुल गांधी पदयात्रा करीत असताना गहलोत त्यांना तेथे जाऊन भेटले. राहुल काँग्रेसचे पदाधिकारीदेखील नाहीत, तर गहलोत मुख्यमंत्री आहेत. तेव्हा अशा भेटींनी गहलोत निवडून येण्यापूर्वीच आपले स्थान प्रभावहीन करीत आहेत. राहुल यांनी काँग्रेसमधील एक व्यक्ती एक पद या धोरणाची आठवण करून दिल्यानंतर गहलोत कदाचित राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतीलही. पण तेच काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तर राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरेल.
 
 
तसे घडले नाही आणि सचिन पायलट मुख्यमंत्री झाले तर गहलोत यांच्या अधिकारक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि ते केवळ गांधी कुटुंबीयांच्या हातातील बाहुले आहेत का, असा सवाल उपस्थित होईल. तेव्हा गहलोत यांनी निवडणूक लढविली आणि ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तरीही त्यांच्या स्वतंत्रपणावर नेहमीच शंका येत राहील. आपली प्रतिमा स्वतंत्र अध्यक्ष अशी व्हावी, यासाठी गहलोत यांना केवळ तसे भासवून चालणार नाही, तर तसे ते दिसावेही लागेल. देशभर गहलोत यांना काँग्रेस संघटनेत स्वीकृती लागेल, तसे झाले नाही आणि काँग्रेसची अवनती अशीच पुढे चालू राहिली तर बळीचा बकरा गहलोत यांनाच व्हायला लागणार आहे, यात शंका नाही. तेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक होत असली तरी काँग्रेसला खरे निवडून आलेले नेतृत्व लाभते की, ‘मुखवटा’ लाभतो हे लवकरच कळेल.
 
 
शशी थरूरदेखील या स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे. थरुर हे असंतुष्ट ‘जी-23’ गटाचे सदस्य आहेत. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांनी अगोदरच काँग्रेसला रामराम ठोकला आहे. एरवी कदाचित आझाद या निवडणुकीत उमेदवार असू शकले असते. मात्र, आता या ‘जी-23’ गटापैकी थरूर आणि मनीष तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. गहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, तशीच थरूर यांनीही सोनिया यांची भेट घेतली आणि त्यानंतर काँग्रेस निवडणूक यंत्रणेचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांचीही भेट घेतली. साहजिकच अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबत थरूर गंभीर असावेत, असे चित्र तयार झाले आहे. थरूर इंग्रजी फाडफाड बोलतात, त्यांना आंतराराष्ट्रीय ओळख आहे, तेही खासदार म्हणून निवडून येतात या त्यांच्या जमेच्या बाजू.
तथापि स्वतः निवडून येणे आणि संघटनेला विजिगिषु करणे यात फरक असतो. नेत्यापाशी व्यापक जनाधार निर्माण करण्याचे कसब लागते तसेच आपल्या प्रतिमेमुळे आपल्या पक्षातील अन्य उमेदवारांचा विजय पक्का होईल, अशी धडाडी, क्षमता आणि लोकप्रियता लागते. थरूर यांच्यापाशी या गुणवत्तेची वानवा आहे, हे अमान्य करता येणार नाही. काँग्रेसमधील असंतुष्ट म्हणून त्यांनी अनेक उपाय काँग्रेसला नवसंजीवनी मिळावी, यासाठी सुचविले आणि आता ते उपाय योजण्यासाठी अध्यक्षपद मिळणे, हाच उपाय आणि हीच संधी असे थरूर यांना वाटत असेल, तर ते स्वागतार्ह आहे. निवडणुकीच्या रिंगणात थरूर उतरत असतील तर ते योग्यच म्हटले पाहिजे. तथापि ‘जी-23’ गटाने केवळ निवडणूक लढविणे, एवढ्यावरच समाधान मानणे ही आत्मवंचना ठरेल. त्याने लढण्याचे समाधान मिळाले, तरी पराभव टळणार नाही.
 
 
तेव्हा थरूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतारायचेच, तर निवडणूक प्रकिया पारदर्शी असेल येथपासून पक्षांतर्गत समर्थन आपल्याला लाभेल, या सगळ्याची आगाऊ तजवीज त्यांना करावी लागेल. ‘जी-23’मधील अन्य नेत्यांनादेखील आपल्यासाठी पुरेसे समर्थन गोळा करण्यासाठी एकत्र आणि सक्रिय करावे लागेल आणि मुख्य म्हणजे काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर आपण नक्की काय करू इच्छितो, याचा आराखडा मांडावा लागेल. थरूर किंवा तिवारी यांनी कितीही निवडणूक उमेदवारीच्या वल्गना केल्या तरीही काँग्रेसमध्ये अद्यापि गांधी कुटुंबाचे वर्चस्व आहे, ही वस्तुस्थिती आहे. याचे कारण संघटनेत नेमलेले बहुसंख्य पदाधिकारी गांधी कुटुंबाच्या इशार्‍यावरच नेमलेले आहेत कारण अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. आताही काही प्रदेश कार्यकारिणींनी राहुल यांना गळ घालणारे ठराव संमत केले, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. थरूर यांनी उत्साह दाखविला आहे, पण उत्साहाची, कसोशीचे प्रयत्न, पक्षातील मतदारांशी संपर्क आणि मुख्य म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी व्यूहनीती यांवर मात होता कामा नये, तरच निवडणूक एकतर्फी न होता निवडणुकीत थरूर यांचे आव्हान दिसेल.
 
 
थरूर यांच्याबरोबरच मनीष तिवारी आणि दिग्विजय सिंह यांचीही नावे चर्चेत आहेत. यातील तिवारी हे असंतुष्ट. तेव्हा थरूर निवडणुकीत उतरणार असतील आणि तिवारीही इच्छुक असले, तर मतांची विभागणी होऊन गांधी कुटुंबाच्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल, यात शंका नाही. आपला कोणताही अधिकृत उमेदवार नाही, असे सोनिया गांधी यांनी कितीही म्हटले तरी गहलोत हेच त्यांचे उमेदवार असणार आणि ते निवडून येण्यासाठी गांधी कुटुंब आपला प्रभाव वापरणार हे नाकारता येणार नाही. तेव्हा तिवारी आणि थरूर यांनी याबद्दल सामंजस्याने विचार करायला हवा. दिग्विजय सिंह यांनाही ही निवडणूक खुणावते आहे. गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नसतील, तर आपण तयार असावे, असा बहुधा दिग्विजय सिंह यांचा होरा असावा. पण आता त्यांनी आपण निवडणूक लढणार नाही, असेही संकेत दिले आहेत आणि वरिष्ठ नेते आपल्याला देतील तो आदेश आपण पाळू, असे म्हटले आहे. हे नेते कोण हे निराळे सांगावयास नको. जे तिवारी आणि थरूर उमेदवार असतील तर होईल तेच गहलोत आणि दिग्विजय उमेदवार असतील तर होईल आणि ते म्हणजे, मतांची विभागणी. तेव्हा सोनिया गांधी ते टाळण्यासाठी अखेरीस गहलोत यांच्या पारड्यात आपले वजन टाकतील, हेही स्पष्ट आहे.
 
 
काँग्रेसचा अध्यक्ष कोण होतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. अशोक गहलोत हेच अध्यक्ष होण्याचा संभव अधिक. तथापि अध्यक्ष झाल्यानंतर ते काँग्रेसला नवसंजीवनी देऊ शकतात का, हे पाहणे औत्सुक्याचे; तसेच भाजपविरोधी अन्य पक्षांशी त्यांचे संबंध कसे राहतात, हेही पाहणे कुतूहलाचे. गहलोत यांचे वडील जादूगार होते, त्यांच्याकडून अशोक गहलोत यांनी दीक्षा घेतली की नाही हे माहीत नसले तरी काँग्रेसला आता एखादी जादूच अवनतीपासून वाचवू शकते. गहलोत अध्यक्ष झाले तर त्यांना अशा जादूची नितांत आवश्यकता भासेल!
 
 - राहुल गोखले
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.