शारदीय नवरात्रोत्सवातून भाजप करणार भक्तीचा जागर

दिग्गजांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यक्रमांचे जंगी आयोजन

    25-Sep-2022
Total Views |

BJP Press - Navratra 
 
 
मुंबई : उद्यापासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवातून भाजप भक्तीचा जागर करणार आहे. मुंबई भाजपचे नेते आमदार मिहीर कोटेचा यांच्यासह इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात मुंबईत एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी मुंबई भाजपतर्फे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली आहे. रविवार, दि. २५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेला आ. मिहीर कोटेचा यांच्यासह गीतकार, संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते, महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
'महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात हिंदू सण उत्सवांवर कठोर निर्बंध आले होते. मात्र, आता महाराष्ट्र हिंदुत्ववादी सरकार आले आहे. आमचे नेते आणि राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू सण, उत्सव आणि कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात साजरे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. इतरांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने उत्सव साजरे करण्याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे मुंबई भाजपकडून नवरात्रोत्ससाठी विविध कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले आहे,' अशी माहिती आ. मिहीर कोटेचा यांनी यावेळी दिली आहे.
 
 
आ. मिहीर कोटेचा म्हणाले की, 'दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या नंतर आता मुंबई भाजपकडून नवरात्रोत्सवाचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. शिवडीच्या अभ्युदय नगरमधील शहीद भगतसिंह मैदानावर शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर ते मंगळवार, दि. ४ ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव आयोजित करण्यात आला असून मुंबईतील सर्वात मोठा उत्सव म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाईल, अशी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.'
 
 
'१ ऑक्टोबर वैशाली सामंत यांच्या गीतांचा कार्यक्रम असून यानंतर अनेक कलाकार या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. अभ्युदय नगर येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमात दररोज १० ते १५ हजार मुंबईकर सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे. अवधूत गुप्ते आणि त्यांच्या टीमच्या सादरीकरणामुळे हा उत्सव आणखी मोठा होईल अशी आशा आहे.' असे कोटेचा यावेळी म्हणाले.
 
 
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की मुंबईत दांडियाचा मोठा कार्यक्रम व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच अवधूत गुप्ते यांच्यासह आम्ही दांडियाची आयोजन केले आहे. भाजपच्या या आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
 
 
गायक अवधूत गुप्ते म्हणाले की, मुंबईत भाजपकडून मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आल्याचा मला मनापासून आनंद आहे. या कार्यक्रमात मला सलग गायला मिळणार आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून त्यासाठी मी भाजपचे खूप आभार मानतो. सुर नवा दास नवा च्या प्लॅटफॉर्म मी गरब्याचा 'भोंडला' हा गीतप्रकार गायला होता. त्यामुळे या कार्यक्रमात देखील मी 'भोंडला' गाणार आहे. या कार्यक्रमात मराठी गीतांसह हिंदी, गुजराती आणि इतर गाण्यांनाही प्राधान्य दिले जाईल.'
 
 
सेनेवर मात करण्यासाठी आणखी एक रणनीती
 
हिंदू सण उत्सवांच्या आयोजनावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये युद्ध रंगले आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून सातत्याने गणपतीसह दहीहंडी आणि इतर सणांचे शिवसेनेकडून आयोजन करण्यात येत होते. त्यातून हिंदू मतदारांना आपल्या बाजूने ठेवण्याचा सेनेचा मनसुबा देखील साधला जायचा. मात्र, यावर्षी मुंबई भाजपने सण उत्सवांच्या आयोजनात भरारी घेतली आहे. वरळीच्या जांबोरी मैदानावर होणारी दहीहंडी असेल किंवा लालबाग परळसह लगतच्या भागांमध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून केले जाणारे आयोजन याबाबतीत भाजपने ठाकरे गटाला यावर्षी सलग दोनवेळा धोबीपछाड दिली आहे. सणवारांच्या औचित्य साधून हिंदूंचे एकत्रीकरण, त्यांच्यात हिंदुत्वाविषयी जागवलेली आस्था आणि त्या माध्यमातून हिंदूंची भाजपशी वाढलेली जवळीक ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. मागील दोन उत्सवांमुळे भाजपने मुंबईत आपली पकड घट्ट असल्याचे सिद्ध केले असून आता नवरात्रोत्सवाच्या माध्यमातूनही ठाकरे गटाला धूळ चारण्यासाठी भाजपने आणखी एक रणनिती आखली आहे.
 
 
दिग्गजांच्या उपस्थितीत कार्यक्रम
 
भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते त्यांच्या सहकलाकारांसह सादरीकरण करणार आहेत. तसेच मराठीतील प्रसिद्ध गायिका बेला शेंडे, प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर हे सुरांचा वर्षाव करणार असून या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून अभिनेते पुष्कर श्रोती उपस्थित असणार आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.