आता रिक्षाचे किमान भाडे 23, टॅक्सीचे 28 रुपये

24 Sep 2022 16:14:29

auto
मुंबई : शुक्रवारी राज्य सरकार आणि टॅक्सी-रिक्षा युनियनच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत सोमवार, दि. 26 सप्टेंबर रोजी टॅक्सी आणि रिक्षा युनियनच्यावतीने पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
 
 
सरकारने दिलेल्या मंजुरीनुसार, रिक्षाच्या किमान भाड्यात दोन रुपये आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ दि. 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. पण, रिक्षा आणि टॅक्सी युनियनने संप मागे घेतल्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मात्र मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
 
 
निर्णय मुंबईकरांना केंद्रस्थानी ठेवूनच!
 
दहा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत राज्य सरकारच्यावतीने भाडेवाढ आणि इतर मागण्यांच्या बाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत सरकारसोबत झालेल्या चर्चेत रिक्षाचालकांनी दोन रुपये भाडेवाढीला स्वीकृती दिल्यामुळे रिक्षाचे किमान भाडे आता 23 रुपये झाले आहे. टॅक्सीचालकांनी तीन रुपये वाढ मंजूर केल्याने टॅक्सीसाठी आता किमान 28 रुपये मोजावे लागणार आहेत. भाडेवाढीला महत्त्व न देता मुंबईकरांना केंद्रस्थानी ठेवूनच संप मागे घेण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई टॅक्सीमन युनियनचे सरचिटणीस एल. कॉड्रस यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0