समर्थांचे शारदा स्तवन

24 Sep 2022 20:18:23

sharda
 
 
 
त्ताच सर्वांना आनंद प्रदान करणारा गणेशोत्सव उत्साहात पार पडला. गणेश ही ज्ञानाची, बुद्धीची देवता आहे. गणपती ज्ञान स्वरूप तर शारदा शक्ती स्वरूप आहे. दासबोधात शारदा स्तवन या समासात शारदेचे वर्णन समर्थांनी सुंदररित्याव्यक्त केले आहे.
 
 
आता नवरात्रोत्सव सुरू होत आहे. शारदा, सरस्वती जगदंबा, लक्ष्मी, कालिका, भवानी या अनेक नावांनी तिला भक्त संबोधतात.
 
 
आता वंदीन वेद माता। श्री शारदा ब्रह्मसुता।
शब्दमूळ वाग्देवता। माहं माया.
 
 
वेदांची माता श्री शारदा आहे. ब्रह्माची कन्या आहे. वाणीची देवता आहे. चार प्रकारच्या वाणी आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. शब्द जिथून उमटतो ती परावाणी नाभिस्थानी आहे. शेवटी वैखरी म्हणजे प्रत्यक्ष वाचेद्वारे शब्दांचे प्रकटीकरण होय. हे सर्व शारदेमुळे घडते.
 
 
महापुरुषाची भार्या। अति संलग्न अवस्था तुर्या।
जे ईश्वराची निजशक्ती। जे ज्ञानियांची विरक्ती।
 
 
ही महामाया आहे. ईश्वराची शक्ती आहे. ती सर्वसाक्षिणी आहे. सृष्टीमध्ये अनंत घडामोडी रोज होतात. सहज लीलेने ती हा खेळ खेळते, घडवते आणि मोडतेही. ती माया आहे. तिचा पार ब्रह्मदिकांनाही लागत नाही. अतिशय सुंदर लावण्यवती ती आहे. लावण्यस्वरूपाची शोभा । जे परब्रह्म सूर्यासी प्रभा। लावण्यखाणी, असे समर्थ म्हणतात. अव्यक्त परब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती शारदा आहे.
 
 
भवसिंधूचा पैलपार। पाववी शब्दबळे।
 
साहित्यिक, नाटककार यांना शब्दस्फुरण देणारी श्री शारदा आहे. काव्यातून, संगीतातून मधुर ध्वनी निघतात, त्याचे मूळ शारदेत आहे. संतांच्या अंतःकरणात स्फूर्तीचा झरा अखंड वाहत असतो, कारण शारदा त्यांच्यावर प्रसन्न असते. संत नि:स्पृह, ज्ञानी, विरागी असतात. म्हणून तर संतांचे साहित्य, काव्य अमर आहे, मधुर आहे. काळजाला भिडते. आजही ज्ञानेश्वरी, दासबोध, रामायण, तुकाराम महाराजांची गाथा लोकांना भावते. अनेक वर्षे गेली तरी काव्य चिरंतन आहेत. कारण, शारदाच त्यांच्याकडून हे काव्य लिहून घेते. संत तिचेच कर्तृत्व मानतात. शारदा परमार्थाचे मूळ आहे.
 
 
योगियांचे ध्यानी। साधकांचे चिंतनी। सिद्धांचे अंतःकरणी। समाधी रूपे।
 
योगी लोकांच्या ध्यानीमनी ती असते. समाधी व्यवस्था तिची अवस्था आहे. सर्व व्यापक ती आहे. सर्वांघटी ती आहे म्हणून घट बसले. कारण, घट हे प्रतीक आहे. जे मोक्षाश्रिया महामंगळा। जे सत्रावी जीवनकळा। मोक्षप्राप्तीला तीच आधार आहे.
 
 
शास्त्र पुराणे वेद श्रुती। अखंड जयेचे स्तवन करिती।
नानारूपी जयेसी स्तवीती। प्राणीमात्रा।
 
 
वेदशास्त्र तिचे स्तवन करतात. शब्दाने ती प्रगट होते. कालिदासांनी तिचीच उपासना केली, म्हणून ते श्रेष्ठ कवी ठरले. आज जे श्रेष्ठ गायक, गायिका आहेत, कवी आहेत. व्यास, वाल्मिकी यांना शारदेचा वरदहस्त आहे. जाणीव रूपाने तिचा संचार आहे. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती या सर्व शक्ती त्या जगदंबेच्या आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली वर्णन करते-
 
 
आता अभिनव वाग्विलासिनी। जेचा तुर्यार्थकला कामिनी।
श्री शारदा विश्व मोहिनी। नमितीमिया।
 
 
सर्व विश्वाला ती मोहून टाकते. प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक होणार असे कळल्यावर सर्व देव भयभीत होतात. रावण वध कसा होणार? देव बंदीतून कसे सुटणार? शारदेने त्यांचा प्रश्न सोडवला. मंथरेच्या वाणीतून ती प्रकटली. रामाला 14 वर्षे वनवास. देव कार्यासाठी ती प्रगटते. रामाला शक्ती देण्यासाठी ही नऊ दिवस घटी बसली. रामाला शक्ती दिली. राम वरदायिनी झाली.
शेवटी समर्थ म्हणतात,
 
 
म्हणौनी थोराहूनी थोर। जे ईश्वराचा ईश्वर।
तयेसी माझा नमस्कार। तदांशेचि आता।
 
 
 
 
-उज्वला भावे
 
 
(लेखिका संत साहित्याच्या अभ्यासिका आणि
निवृत्त मुख्याध्यापिका आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0