‘संगीत नाटक अकादमी’वर नृत्यविदुषी!

    24-Sep-2022
Total Views |

Sandhya poore
 
 
नृत्य विदुषी डॉ. संध्या पुरेचा यांची भारत सरकारच्या अतिशय प्रतिष्ठेच्या ‘संगीत नाटक अकादमी’ या सांस्कृतिक संस्थेवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा लेख...
 
 
संध्या पुरेचा यांनी ‘भरतनाट्यम्’ या शास्त्रीय नृत्य प्रकाराला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. शास्त्रीय नृत्य प्रकाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी तसेच प्रशिक्षणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले आहे. आचार्य गुरू पार्वती कुमार यांच्याकडे ‘भरतनाट्यम्’चे शास्त्रशुद्ध शिक्षण संध्या पुरेसा यांनी घेऊन शास्त्राला प्रायोगिकतेची जोड दिली आहे.
 
 
संध्या पुरेचा या केवळ ‘भरतनाट्यम्’ नृत्यांगना नाहीत, तर त्या नृत्य विदुषी, नृत्य संरचनाकार आहेत. तसेच, त्या शास्त्रीय नृत्याच्या संदर्भात मौलिक ग्रंथ निर्मिती करणार्‍या संशोधक, अभ्यासक देखील आहेत. नाट्यशास्त्राच्या पठडीतून ‘भरतनाट्यम्’चे सिद्धांत आणि प्रत्यक्ष नृत्य अंगिक अभियानाच्या दृष्टीने सखोल चिंतन करीत त्यांनी ‘डॉक्टरेट’ ही पदवी संपादन केली. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर यांच्याशी संलग्न असणार्‍या ‘भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर’ या आपल्या संस्थेद्वारे त्यांनी शास्त्रीय नृत्यातल्या प्रशिक्षणाचे अखंड सेवा व्रत घेतलेले आहे. भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी ‘सरफोजी राजे भोसले सेंटर’ या संस्थेची उभारणी डॉ. संध्या पुरेचा यांनी केली. त्याद्वारे त्यांनी कलाक्षेत्रासाठी प्रशिक्षण संशोधनाचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे.
 
 
नृत्य क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल त्यांना 2019 साली ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्राप्त झाला. डॉ. संध्या पुरेचा यांनी आजवर सुमारे पाच हजार विद्यार्थिनींना ‘भरतनाट्यम्’चे शिक्षण दिले आहे. इतकेच नव्हे,शास्त्रीय नृत्याच्या क्षेत्रात त्या सातत्याने नवे नवे प्रयोग करीत असतात. परंपरा आणि नवता यांचा सुंदर समन्वय म्हणजे संध्या पुरेचा यांचा कलाविष्कार.
 
 
1986 साली ‘अभिनय दर्पण’मधील श्लोकांवर त्यांनी कार्यक्रम सादर केला. ‘अभिनय दर्पण’ वरील हा कार्यक्रम त्यांनी आपल्या गुरू पार्वती कुमार यांना अर्पण केला. संस्कृत भाषा भरताचे नाट्यशास्त्र सरफोजी राजे भोसले यांचे वाङ्मय हे डॉ. संध्या पुरेचा यांच्या अभ्यासाचे आणि आस्थेचे विषय राहिले आहेत. संस्कृत काव्यरचनांचे शास्त्र आणि संप्रदाय यांचे अनोखे सादरीकरण डॉ. संध्या पुरेचा यांनी घडविले आहे. ‘ताज फेस्टिवल’, ‘अजंठा फेस्टिवल’, ‘एलिफंटा फेस्टिवल’ तसेच ‘संगीत नाटक अकादमी’चे महोत्सव अशा अनेक राष्ट्रीय महोत्सवांमध्ये डॉ. संध्या पुरेचा यांनी आपली कला सादर केली आहे.
 
 
 
राष्ट्रीय महोत्सवांसोबत आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये तसेच नेदरलँड्स, दुबई,ब्रिटन, रशिया, अमेरिका अशा देशांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. त्यांनी राष्ट्रीय पातळीसह आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील आपला शिष्य संप्रदाय वाढविला आहे. त्या केवळ शास्त्रीय नृत्याच्या नव्हे, तर लोकनृत्याच्या कार्यशाळांमध्येदेखील त्या आपला सहभाग नोंदवित असतात. भरताच्या नाट्यशास्त्रावर त्यांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केला आहे. ‘लोकरंग सांस्कृतिक मंच’ या ठाण्यातील संस्थेने त्यांच्या शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत ज्येष्ठ नाटककार, गीतकार अशोकजी परांजपे पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. ‘संगीत नाटक अकादमी’च्या अनेक परिषदांमध्ये मौलिक शोधनिबंधांचे वाचन, अनेक ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले आहे.
 
 
‘अभिनय दर्पण’च्या 324 श्लोकांचा दृकश्राव्य प्रकल्प त्यांनी साकार केला आहे. डॉ. संध्या पुरेचा या ‘संगीत नाटक अकादमी’चे अध्यक्ष झाल्याने महाराष्ट्राला त्यांचा विशेष अभिमान आहे.शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य, लोककला यांचा सन्मान वाढविण्याचे काम डॉ. संध्या पुरेचा ‘संगीत नाटक अकादमी’च्या अध्यक्ष म्हणून निश्चित करतील. ‘संगीत नाटक अकादमी’च्या अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
 
 
 
- प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.