डोंबिवलीतील हिंदू गर्व गर्जना मेळावा हा दसरा मेळाव्याचा ट्रेलर: दादा भुसे

24 Sep 2022 16:22:16

garv garjana
 
 
 
कल्याण: दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानासाठी प्रयत्न सुरू होते. पण, शिंदे गटाला न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली. त्यावर, “एका अर्थाने न्यायालयाचा हा निकाल योग्यच लागला आहे. कारण, नवी मुंबईनंतर डोंबिवलीतील हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात कार्यकर्त्यांची अलोट गर्दी झाली आहे. ही गर्दी पाहता शिवाजी पार्कदेखील अपुरे पडले असते. ही गर्दी दसरा मेळाव्याचा ट्रेलर आहे,” असे मत राज्याचे बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. शुक्रवारी शिंदे गटाच्यावतीने डोंबिवलीतील पाटीदार भवन सभागृहात हिंदू गर्व गर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी भुसे बोलत होते.
 
 
यावेळी भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीत महिलांसाठी मोठी भेट देणार असल्याचे सांगितले. परंतु, ती भेट नेमकी काय असणार, याविषयीचा उलगडा केला नाही. या मेळाव्याला खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. विश्वनाथ भोईर, आ. बालाजी किणीकर, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, राजेश मोरे, दीपेश म्हात्रे, राजेश कदम, रवी पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित होते.
 
 
 
मंत्री भुसे पुढे म्हणाले की, “डोंबिवलीतील मेळाव्याची गर्दी पाहता दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कपेक्षाही पाच पट मोठे मैदान घ्यावे लागेल. एवढे मोठे मैदान मुंबईत उपलब्ध न झाल्यास दसरा मेळावा ठाण्यात घ्यावा लागेल आणि तेही शक्य न झाल्यास नाशिकमध्ये मेळावा घेण्याची मला संधी द्यावी.” त्याचप्रमाणे, मुख्यमंत्री शिंदेंनी अडीच महिन्यात राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून शेतकरीपुत्र मुख्यमंत्री झाल्याने शेतकर्‍यांना न्याय दिला गेला असल्याचेही भुसे म्हणाले.
 
 
 
बाप काढणार्‍यांचे विचार संकुचित
 
 
“सध्या केवळ चारच शब्द सातत्याने ऐकविले जातात. गद्दार, पाठीत खंजीर खुपसला, खोटारडे, बाप काढला जातो. बाळासाहेब एका कुटुंबाचे प्रमुख नव्हते. ते संपूर्ण शिवसेनेचे बाप होते. बाप काढणार्‍यांचे विचार संकुचित आहे,” अशा शब्दांत भुसेंनी ठाकरेंना टोला लगावला. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीनंतर रात्री ठाण्यातही हिंदू गर्व गर्जना मेळावा पार पडला. यावेळी खा. श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0