सावध हरिणी सावध गं...

24 Sep 2022 19:56:37

online harasment
 
 
 
 
धी कधी काही घटना अशा घडतात की, डोकं सुन्न आणि मन खिन्न होऊन जातं! नुकतीच घडलेली चंदिगढ विद्यापीठातली घटना अशापैकीच म्हणावी लागेल. गेल्या आठवड्यात माध्यमांमध्ये यावर खूप चर्चा झडली. बरीच खळबळ माजली. तशा तर हल्लीच्या काळात एकापेक्षा एक दुर्दैवी घटना कानावर पडतच राहतात. कारण, हे ‘डिजिटल’ युग सुविधांबरोबरच समस्याही सोबत घेऊन येते. एकूणच काळ किती कठीण होत चाललाय, हे आपण सर्वच अनुभवतो आहोतच. पण, चंदिगढचे वसतिगृहातील ‘एमएमएस’ प्रकरण जास्तच धक्कादायक! त्या अश्लाघ्य घटनेस एखादी मुलगी कारणीभूत असणे हे तर सगळ्यांसाठी अधिकच चिंताजनक! त्यानिमित्ताने महिलांची विशेषकरुन ऑनलाईन माध्यमातून होणारी फसवणूक आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
एक मुलगी स्वतःचे स्नानगृहातील फोटो लाईव्ह व्हिडिओ कॉलवर आपल्या मित्राला दाखवते आणि त्याचवेळी तिथेच स्नान करीत असलेल्या दुसर्‍यामुलीचेही ’दर्शन’ त्याला त्याच्या सांगण्यावरून घडवते. त्या दृश्यांचा अश्लील व्हिडिओ तयार होतो. दोन मित्र मिळून राजरोस हे कृत्य करतात, आणि स्त्रीत्वाचा अपमान करणार्‍या या लज्जास्पद कृत्याला दुसरी स्त्रीच कारणीभूत होते, ही या घटनेतील सर्वात विपरित गोष्ट!
 
 
पण, आजपर्यंत हे पुष्कळदा ऐकलंय की, तरुण मुलं प्रेमाच्या जाळ्यात मुलींना अडकवून, त्यांना भावनेत गुंतवून असे क्षण आणतात की, ज्यातून अश्लील व्हिडिओ काढण्याची स्थिती येईल. मग त्याचा वापर करून धमकावणे आणि ‘ब्लॅकमेलिंग’ असे गुन्हे घडत राहातात. पण, चक्क एका मुलीनेच दुसर्‍या मुलीचे फोटो काढून मित्रांना पाठवणे हा आताचा प्रकार सर्वांत भयंकर आणि बहुधा पहिल्यांदाच घडलेला प्रकार म्हणावा लागेल.
 
 
सुरुवातीला या घटनेची माहिती विद्यापीठाने आणि पोलिसांनीसुद्धा लपवली, असे काही घडलेच नाही हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, जसजसा लोकांचा दबाव वाढला तशी या घटनेची चौकशी सुरू झाली. बेकरीच्या दुकानात काम करणारा एक तरुण आणि ट्रॅव्हल कंपनीतला एक कर्मचारी असे दोघेजण या घटनेच्या पाठीमागे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी हे का केले, त्यासाठी एका मुलीची मदत का घेतली, त्या मुलीने हे कृत्य कुठल्या दबावाला बळी पडून केले, हे आता चौकशीअंती बाहेर येईलच. खरेतर विकृत प्रवृत्तीतून आणि पैसा मिळवण्याचं साधन म्हणूनच अशा घटना घडवून आणल्या जातात, हे आजवरच्या अनुभवावरून लक्षात येते. पण, या सर्व घटनेचे तपशील ऐकल्यावर समजले की, या कथेची शोकांतिका अजून पुढेच आहे.
 
 
विद्यापीठातल्या अनेक मुली हा प्रकार लक्षात आल्यावर घाबरून बेशुद्ध पडल्या, ज्या मुलीचा मुख्यत्वे स्नानगृहातला फोटो काढला गेला, त्यावेळी तिथे आणखीही मुली होत्या. वसतिगृहात स्नानगृहे कॉमन असतात. त्यामुळे तिथे उपस्थित मुलींचेही फोटो त्या व्हिडिओत होते. ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा संबंधित सर्वच मुली भीतीने भोवळ येऊन पडल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवावी लागली. त्या बेशुद्ध मुलींशिवाय इतर उर्वरित मुलींचीही अवस्था वाईट होती. त्यांना सर्वांनाच शॉक बसला होता. आपण इथे सुरक्षित नाही, असे तिथे जमलेल्या मीडियाला आणि पोलिसांना या मुली ओरडून सांगत होत्या.
 
 
पालक चिंतातूर
 
हा सगळा प्रकार ऐकल्यावर आणि पाहिल्यावर डोकं सुन्न आणि मन खिन्न नाही होणार तर काय? विचार करणार्‍या माणसाचाही विचार खुंटून जाईल, असे हे सर्व प्रकरण आहे. एकाचवेळी इतक्या मुलींना धक्का बसावा, हे घडले तरी कसे आणि का? त्यावर आता उपाय काय? या चिंतेने मुलींच्या पालकांना पोखरले आहे तर शिक्षक, संस्थेची आस्थापना आणि प्रशासन हतबल झाले आहे.
 
 
अशा दुर्दैवी घटना घडल्या की, त्याचे पडसाद उमटतातच. त्यावर मंथन होते. तज्ज्ञ मंडळी, सुजाण वर्ग, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक अशा घटनेच्या संदर्भातील सर्व बाजूंची चर्चा करतात, यावर काही उपाय सुचवतात. यातून पुन्हा असल्या घटना घडू नयेत, ही खबरदारी घेण्याचा प्रयत्न होतो, तसेच या चंदिगढ घटनेच्या निमित्त अनेक मुद्दे समोर आले.
 
 
या घटनेतील काही ठळक मुद्दे
 
या घटनेत सर्वात मुख्य उपद्रवी मुद्दा म्हणजे, प्रत्येकाच्या हातात असलेले मोबाईल. हे साधन सोयीसाठी हातात आलं, पण तेच अत्यंत स्फोटक ठरते आहे. एखाद्या शस्त्रासारखा मोबाईलचा वापर होत असून तो महिलांसाठी सर्वात धोकादायक झाला आहे. ‘लाईव्ह व्हिडिओ कॉल’ हे तरुणींच्या शरीराशी, भावनांशी आणि जीवाशी खेळ करण्याचे माध्यम होऊन बसले. त्याचप्रमाणे समाजमाध्यमांवरचा स्त्रियांचा मुक्त वावर, विविध वेशभूषेतील फोटो अपलोड करण्याची हौस, डान्स रील्सचा अमाप उत्साह, व्हिडिओ तयार करून पोस्ट करण्याची जडलेली अनावर सवय, या सर्व गोष्टी सतत ऑनलाईन पडीक पडलेल्या विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून सर्रास लक्ष्य करण्यात येत आहेत. फेक अकाऊंट तयार करणे, त्यातून स्त्रियांशी संवाद साधून जवळीक करणे, अकाऊंट हॅक करून गैरव्यवहार करणे इत्यादी उद्योग म्हणजे ‘डिजिटल’ जगातले काळे धंदेच आहेत. यात तरुणी आणि विवाहित तसेच प्रौढ स्त्रियासुद्धा बळी पडतात. कुणाचं बँक खातं लुटलं जातं तर कुणाची अब्रू. ही घोर फसवणूक लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. पण, तरीही असे गुन्हे वारंवार घडतात.
 
 
कारणे आणि उपाय
 
हे सर्व हातून घडून जाते, त्याला कारण, ‘सायबर सुरक्षा’ हा विषय फार गुंतागुंतीचा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यात गुन्हेगार जास्त तरबेज आहेत. त्यामानाने ‘डिजिटल’ संरक्षण यंत्रणा मात्र कमी पडतात. त्यातील त्रुटी आणि वाटा-पळवाटा ‘सायबर’ गुन्हे करणार्‍यांना जास्त बारकाईने ठाऊक असल्याने त्यांना हे सगळे करणे सहज शक्य होते.
इतके वाईट प्रसंग येत असतील, तर मोबाईलचा वापर महिलांनी करायचा की नाही, असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचं उत्तर शोधले असता, मोबाईल वापरणार्‍या महिलांचे प्रमाण एकूण संख्येपैकी खरे तर फक्त 38 टक्के इतकीच आहे. त्यापैकी महाविद्यालयीन तरुणी, विशेषतः वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनी 80 टक्के आणि नोकरी-व्यवसाय करणार्‍या महिला 90 टक्के स्मार्टफोन वापरतात. हे प्रमाण अर्थातच शहरी भागात जास्त दिसते. ग्रामीण भागातली महिलासुद्धामोबाईल वापरते, पण त्यात स्मार्टफोनचे प्रमाण अत्यल्प आहे. शहरात मात्र बँकव्यवहार, वस्तूखरेदी, वीजबिल, विविध कर्जांचे हप्ते या सुविधांचा वापर फोनद्वारे महिला हल्ली लिलया करतात.
 
 
व्यवसाय वाढवणे, कला किंवा व्यापार यातील प्रभावी आणि सुलभ स्वस्त संपर्क यासाठी महिलांना हे साधन एकीकडे वरदान ठरत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडिया आणि आंतरजालातील अभासी जग मोह घालवून महिलांना भुलवत आहे. प्रेमाचे खोटे नाटक आणि भावनांशी खेळ करून हा अनिष्ट खेळ खेळला जातो.
 
 
संकेतस्थळ व अ‍ॅपच्या निसरड्या वाटा
 
विवाह विषयक विविध संकेतस्थळ आणि त्यावर जोडीदाराचा शोध ही गोष्ट समाजात आता बर्‍यापैकी स्वीकृत बाब झाली असल्याने त्याचा बिनधास्त वापर होतो आहे. यात अधिकृत आणि विश्वासार्ह अशा वेबसाईट आहेतही. पण, त्यातसुद्धा खोटी माहिती देऊन फसवेगिरीचे अनेक प्रकार उघड झाल्यानंतर काही प्रसिद्ध संकेतस्थळांनी ‘फसवणूक झाल्यास जबाबदारी आमची नाही, आम्ही फक्त स्थळ सूचवतो, त्याची शहानिशा ज्याची त्याने करावी,’ असे जाहीर करून टाकले. विशेष म्हणजे, धोका होण्याचे इतके प्रकार होत असूनही लोक मात्र लग्न जुळवण्यासाठी याच संकेतस्थळाचा आधार घेतात. कारण, सध्या विवाह जुळवण्याचे हेच पर्याय आहेत. लग्नाचे वय उलटून जाणे, आपल्या पसंतीचा जोडीदार न मिळणे, नोकरी, आर्थिक स्थिती याबाबत अवाजवी अपेक्षा, नातेसंबंध तुटत गेल्याने एकाकी पडलेली कुटुंबे, स्वतंत्र विचारांनी एकटे राहणारे स्वच्छंद तरूण-तरूणी. ही सर्व मंडळी अशा प्रकारच्या अ‍ॅपवर संपूर्ण अवलंबून आहेत. यातूनच गरजू लोकांची आर्थिक, भावनिक फसवणूक झाल्याची उदाहरणे आपण पाहतो-वाचतो. विवाह समस्या हा एक वेगळाच सामाजिक प्रश्न या गोष्टीशी निगडित आहे.
 
 
याच विवाह समस्येच्या सामाजिक प्रश्नातून आणखी एका समस्येचा जन्म झाला आहे, तो म्हणजे ‘डेटींग अ‍ॅप.’ या अ‍ॅपवर फक्त मैत्री, एकटेपण घालवण्यास सोबत मिळवणे, वैवाहिक जबाबदारी टाळून ’लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणे, अशा उद्देशाने तरुण-तरुणी मैत्री जोडतात. सगळ्यात धोकादायक आणि निसरडी वाट इथेच सुरू होते. ’सायबर बुलिंग’ म्हणजेच आंतरजालाच्या माध्यमातून मानसिक, भावनिक छळ करण्याची सर्वांत जास्त प्रकरणे येथेच घडतात.
 
 
मैत्रीची भावनिक गरज थोड्याच दिवसांत मागे पडते आणि अपेक्षा, हक्क, मालकीची भावना या मूळ मानवीवृत्ती डोके वर काढतात. संघर्ष सुरू होतो. विकोपाला जातो. त्यातून नैराश्य येते. अनिर्बंध नात्यांच्या या रेशीमगाठी गळ्यातले फास आवळले गेल्यावरच कळतात. एकतर हे तरुण-तरुणी आत्महत्येस प्रवृत्त होतात किंवा एकमेकांना मारून टाकण्यापर्यंत मजल जाते. अर्थात, अशा टोकाच्या घटना घडण्याचे प्रमाण एकूण समाजाच्या तुलनेत पाच ते दहा टक्के आहे; पण ते सुद्धा भयावह वाटते. कारण, ते दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आहे. आभासी जगातून निर्माण होणारे नातेही आभासीच असते. त्यास सामाजिक सुरक्षितता, समाजमान्यता नसणे अशा बाबींचा नकारात्मक परिणाम होतो, म्हणून आत्ताच हे प्रमाण कमी असताना, या जाळ्यात अडकण्यापासून महिलांना रोखणे यासाठी मोठी जागृती करण्याची गरज आहे.
 
 
आंतरजालाचं तांत्रिक ज्ञान तर महिलांनी नीट आत्मसात करायलाच हवे. आपल्याबाबत काही वाईट घडू नये, याची काळजी स्वतः स्त्रीनेच घ्यायला हवी. समाजमाध्यमांवर आपलं प्रोफाईल कुलूपबंद करणे, स्वतःचे खासगी फोटो सार्वजनिक न करणे, ईमेल आयडी, मोबाईल यांचे पासवर्ड सतत बदलत राहणे, मुळात ते स्वतःशिवाय कुणाला माहिती होऊ नयेत म्हणून शेअर न करणे, स्वतःच्या खासगी गोष्टी सार्वजनिक न करणे या गोष्टींची शिस्त पाळावी लागेल. ठरवले तर नक्की महिला हे करूच शकतात.
 
 
मुळात प्रेमाच्या नावाखाली सहवासात येणार्‍या व्यक्तीवर लगेच विश्वास न ठेवणे, याबाबतीत भावनिक न होता व्यवहार्य राहणे, असे गुण आजच्या आधुनिक स्त्रीने नव्या युगात अंगी बाणायला हवे. नात्यांमधून होणारा भावनिक कोंडमारा आणि वैचारिक गोंधळ सावरण्यासाठी समुपदेशन करून घेण्याचा उपाय आहे. ’विवाह समुपदेशन’ ही शाखा संशोधनाअंती खूपच प्रभावीपणे काम करते आहे. त्याचा लाभ घेऊन त्यातून शिकले पाहिजे की, मनाचा संयम आणि ठामपणा हेच सर्वांत प्रभावी अस्त्र आहे.प्रिय म्हणवणार्‍या व्यक्तीच्या अवाजवी मागण्या तरुणींनी मान्य करणे म्हणजे संकटाला आमंत्रण. हे लक्षात घेऊन क्षणिक मोहापायी घसरणारं पाऊल सावरलं, तर पुढची संकटाची वाट चालावी लागणार नाही. सर्व क्षेत्रांत आपलं सामर्थ्य सिद्ध करणारी स्त्री मुळात मनाने कमकुवत नाही, हे या बाबतीत पुन्हा नव्याने सिद्ध व्हायला हवं! ज्या कौतुकाने स्त्री ब्युटीपार्लरला जाऊन स्वसौंदर्यात भर घालते, तसेच, स्वतःचे मनोबल वाढवणे आणि स्वतःला सामर्थ्यशाली घडवणे हे करताना फसव्या ’नेटकर्‍यां’पासून जाणीवपूर्वक सावधान राहायला हवे.
 
 
आपले खासगी चित्रण अविचाराने मित्राला ‘लाईव्ह व्हिडिओ कॉल’वर दाखवणार्‍या आणि नकळत ‘सायबर’ गुन्हेगारांच्या जाळ्यात अलगद अडकणार्‍या मुलींना हेच सांगावं लागेल...
 
सावध हरिणी सावध गं...
करील कुणीतरी पारध गं..
पसरलंय जाळं भोवती गं..
राहू नकोस तू बेसावध गं..
 
- अमृता खाकुर्डीकर
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0