पुण्यातील PFIच्या रॅलीत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा!

24 Sep 2022 13:41:04
 


मुंबई दि. २४ सप्टेंबर : देशभरात 'एनआयए'ने छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, नाशिक आदी शहरांमध्ये छापेमारी करत अनेकांना अटक करण्यात आली आहे. पीएफआयवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पुण्यातील या मोर्चावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे, संबधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकरी करीत आहेत. देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. नाशिकमध्येही पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी कोंढव्यातील पीएफआय या संघटनेच्या कार्यालयावर छापा टाकत काही साहित्य जप्त करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0