श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले का? दिलं स्पष्टीकरण

    23-Sep-2022
Total Views |

news



ठाणे  
: खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीत बसल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते यांनी केला होता. हा दावा फेटाळून लावत श्रीकांत शिंदेंनी पत्रकार परिषद घेत याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. "हा फोटो मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनातील नाही. मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानातील बाजूला असलेल्या एका कॉन्फरन्स हॉलमधील आहे, अशी माहिती खासदार शिंदेंनी यावेळी दिली. राष्ट्रवादीतर्फे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

श्रीकांत शिंदे म्हणाले, "खुर्चीच्या मुद्द्यावरून जी टिका करण्यात आली ती हास्यास्पद आहे. आज काही जणांनी मी ज्या खुर्चीत बसलो ती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची असल्याचा दावा केला. त्यांच्या गैरहजेरीत काम पाहतो, असे उल्लेख करून समाजमाध्यमांवर पसरवण्यात आले. मुळात मी जेथे बसलो होतो ते आमचे खासगी निवासस्थान आहे आणि ती जी खुर्ची आहे ती ना मंत्रालयातील आहे, ना वर्षा या शासकीय निवासस्थानातील. या आमच्या खासगी निवासस्थानातून साहेब आणि मी दररोज शेकडो नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवत असतो."

"एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासूनच शेकडो लोक दररोज येथे येत असतात. मी दोन वेळा निवडून आलेलो खासदार आहे, त्यामुळे कुठे बसायचं आणि कुठे नाही याचे भान मला आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेब दिवसातून १८ ते २० तास काम करत असतात. जनतेच्या समस्या सोडवत असतात. मुख्यमंत्री जिथे जातात तिथे नागरिकांच्या समस्या सोडवत असतात. राज्याचा कारभार चालवण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यांच्या जागी काम करण्याची कोणालाच गरज नाही. ज्या खुर्चीवरून गदारोळ चालवला ती खुर्ची खासगी निवासस्थानातील होती.", अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


"ज्या लोगोवरून गदारोळ केला गेला तो लोगो मुख्यमंत्री कार्यालयातला होता. मात्र फोटोमधले दालन शासकीय नव्हते. मुख्यमंत्री साहेबांच्या व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी त्या लोगोचा वापर केला जातो. मुख्यमंत्री कार्यालयाने हा लोगो येथे आणला होता. पण त्याचा मोठा बागुलबुवा करण्यात आला. मात्र गेल्या काही महिन्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एवढं काम केलं आहे की विरोधकांना मुद्देच राहिलेले नाहीत. त्यामुळे निरर्थक मुद्द्यांना महत्व देऊन त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधकांनी केला. महाराष्ट्राची जनात सुज्ञ आहे. त्यांना हे सुरू असलेले राजकारण ज्ञात आहे.", असे म्हणत टीकाकारांना त्यांनी उत्तर दिले आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.