गोराईत मुंबई पालिकेचे खेळाचे मैदान की पाण्याची तळी?

23 Sep 2022 18:10:25

gorai garden
 
मुंबई : बोरिवलीच्या गोराईमधील मुलांसाठी खेळायला मुंबई महापालिकेचे एकमेव मैदान प्रभाग क्र. 9 येथे उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी राजे उर्फ ‘पेप्सी ग्राऊंड’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मैदानाची पहिल्याच पावसात दुर्दशा झाल्यामुळे आम्हाला येथे खेळायला मिळत नाही, अशी तक्रार येथील तरुणांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केली. मागील 25 वर्षांपासून आमच्या गोराईत हे मैदान आहे. केवळ एकदा किंवा दोनदा पाऊस पडला, की, हे मैदान पाण्याने भरून जाते. मैदानात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेकडून काहीतरी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा होती. परंतु, यासंबंधी कोणत्याही प्रकारची पावले मुंबई महापालिकेने उचललेली नाहीत, असे स्पष्टीकरण येथील स्थानिक तरुणांनी दिले.
 
मैदानातील शौचालयही अस्वच्छ
आमच्या गोराईत गेली 25 वर्षे हे मैदान आहे आणि हे एकच मैदान आहे. थोड्याच पावसातच हे मैदान पूर्णतः भरून जाते. त्याचबरोबर या मैदानात असणार्‍या शौचालयाचीही दुर्दशा झालेली आहे. शौचालयाला असणारी टाकी फुटलेली आहे. तसेच, यासंबंधी कोणतीही पावले मुंबई महापालिकेकडून उचलण्यात आलेली नाहीत. या मैदानासाठी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आलेला नाही. त्यामुळे, रात्रीच्या वेळी मुले दारू पिऊन मैदानात असतात, दारू पिण्यासाठीही मैदानाचा सर्रास वापर करतात. दारूच्या बाटल्याही मैदानात फुटलेल्या असतात.
- रोहन काळसेकर, स्थानिक
  
खेळण्यास चांगले मैदान मिळावे
थोड्याच पावसात हे मैदान पाण्याने पूर्ण भरून जाते. यासंबंधी काहीतरी उपाययोजना करण्यात यावी, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, अनेकदा यासंबंधी आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींशी बोललो आहोत. ’आम्ही बघू’ असे लोकप्रतिनिधींनी सांगितले. परंतु, अद्याप यावर कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. आम्हाला गोराईमध्ये हे एकमेव मैदान उपलब्ध आहे. त्यातही असणार्‍या शौचालयाची दुरवस्था झालेली आहे. आम्हाला फक्त चांगले मैदान मिळावे, एवढीच आमची मागणी आहे.
- स्थानिक खेळाडू
 
 
- शेफाली ढवण
 
Powered By Sangraha 9.0