उद्धव ठाकरेंनी शहांविषयी विचार करून बोलावे, नाहीतर...

    23-Sep-2022
Total Views |
 
चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई : 
देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले तर त्यात चुकीचे काय आहे ? शाह मुंबईत येण्यामुळे ठाकरेंना चुकीचे वाटण्याचे काहीही कारण नाही. अमितभाई शाह कधीही उद्धव ठाकरे यांचा साधा उल्लेखही करत नाहीत. तरी ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतका धसका का घेतला आहे, समजत नाही ? ठाकरेंनी शहांविषयी विचार करून बोलावे, अन्यथा ठाकरे गटातील उरलेले आमदारही त्यांना सोडून जातील,' असा थेट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.


तसेच ठाकरेंनी अशा प्रकारे टीका करणे सुरूच ठेवले तर त्यांच्या गटात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत केवळ चारच उरतील,' असा टोलाही त्यांनी लगावला आहे..' 


शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी बावनकुळे यांनी संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सचिव प्रवीण घुगे आणि औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय अवताडे उपस्थित होते.


ग्रामपंचायत निकालांत युतीचाच झेंडा !
ग्रामपंचायत निवडणूक निकालावरील दोन्ही गटांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर बोलताना ते म्हणाले की, 'नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ६०८ पैकी २९४ सरपंच भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. त्यांची नावे व पक्षातील पदांसहीत पूर्ण माहिती भाजपाकडे आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिंदे गटाचे ४१ सरपंच निवडून आले आहेत.'


 एकूण ६०८ पैकी ३३५ सरपंच हे भाजप – शिवसेना (शिंदे गट) युतीचे आहेत. या बाबतीत जे कोणी राजकीय पक्ष दावे करत आहेत, त्यांनी सविस्तर यादी द्यावी. त्याचबरोबर आम्हीही देऊ.' असे आव्हानच बावनकुळेंनी महाविकास आघाडीला दिले आहे.


विधानसभेत २०० जागा जिंकणार !

भाजपच्या मिशन महाराष्ट्रवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, 'महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्व ९७,५०७ बूथमध्ये पक्ष संघटना बळकट करत आहे. येत्या निवडणुकांमध्ये ५१ टक्के मते मिळविण्याचे उद्दीष्ट आमच्या डोळ्यांसमोर आम्ही ठेवले आहे. भाजप शिवसेना (शिंदे गट) विरोधात महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एक झाले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. 


'आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यात लोकसभा निवडणुकीत कमीतकमी ४५ आणि विधानसभा निवडणुकीत २०० जागांवर विजय मिळवू,' असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.


मराठवाड्याबाबतच्या निर्णयांसाठी शिंदे - फडणवीसांचे अभिनंदन
मराठवाड्याबाबत युती सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हटले की, 'मराठवाडा आणि विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळांना महाविकास आघाडी सरकारने मुदतवाढ दिली नाही हे त्या आघाडीचे मोठे षडयंत्र होते.


महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल महोदय बारा आमदार देत नाहीत तोपर्यंत वैधानिक विकास मंडळ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण शिंदे फडणवीस सरकारने मात्र सत्तेवर आल्यानंतर लगेचच मराठवाड्याच्या विकासासाठी काम सुरू केले आहे. मराठवाडा वॉटरग्रीड आणि समुद्रात जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळविणे या कामांवर शिंदे – फडणवीस सरकारने भर दिला आहे, याबद्दल सरकारचे अभिनंदन केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.