‘हसरा मेळावा’ ठरू नये इतकचं!

23 Sep 2022 10:03:15

thackeray
 
 
 
मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यातून नुकतेच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपले दिव्य ज्ञान महाराष्ट्रासमोर पाजळले. खरंतर त्यांच्या भाषणात सत्तेतून पायउतार झाल्यानंतरचे वैफल्य साफ दिसून येत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांनी चार महिन्यांपूर्वी घेतलेल्या ‘मास्टर’ सभेला ‘टोमणेसभा’ असे नाव दिले होते आणि परवाच्या मेळाव्यातही पुन्हा एकदा ठाकरेंच्या सभेला ‘टोमणेसभा’च का म्हणावे, याची प्रचिती आली.
 
 
पक्षप्रमुखाची सभा म्हटली, तर कार्यकर्त्यांना बळ आणि ऊर्जा देण्यासाठी एक दिशादर्शक भाषण आणि योग्य कार्यक्रम आखून देण्याची गरज असते. परंतु, ठाकरेंच्या सभेत टोमणे, टीका-टीप्पणी आणि कोणाला लिहायलाही लाज वाटावी, अशा भाषेचा, शब्दांच्या प्रयोगाचा नुसता भडिमार करण्यात आला. मुंबईबाहेर फारशी राजकीय ताकद नसलेल्या शिवसेनेच्या सभेतील मंचावरील नेते पाहिले तरी निम्मे अधिक नेते हे मुंबईतलेच. अंबादास दानवे वगळता एकही नेता मुंबई आणि कोकणाबाहेरचा नव्हता. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आता केवळ मुंबईपुरतीच आक्रसल्याचे दिसून आले.
 
 
‘कामाचं बोला, मुद्द्याचं बोला आणि बाष्कळ बडबड नंतर करा,’ असा सल्ला ठाकरेंनी विरोधकांना दिला खरा. परंतु, तो सल्ला त्यांनाच लागू होतो, हे मात्र ते सपशेल विसरले. एकूणच काय तर शिवसेनेत इतका मोठा उठाव होऊनही ठाकरेंनी त्यातूनही कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ‘ढाण्या वाघ’ म्हणून असलेली ओळख उद्धव ठाकरे यांनी पार धुळीस मिळवली. आता त्यांच्या भाषेत वाघावरून थेट कुत्रा, गोचिड, गिधाडांचाच उल्लेख आढळतो. त्यामुळे शिवसेना आहे की प्राणीघर, असा प्रश्न निर्माण होतो.
 
 
विशेष बाब म्हणजे, आदित्य ठाकरे हे पर्यावरणप्रेमी म्हणून ओळखले जातात. स्वतः उद्धव यांनाही फोटोग्राफीचा छंद असून त्यांचाही पर्यावरणाकडेच अधिक कल असतो. त्यामुळे सतत जनावरे, प्राण्यांच्या नावाने सभेत शिमगा करणं, हीच काय ती भाषणबाजी! खंजीर, कोथळा, औलाद, नामर्द, रक्त, निष्ठा, गोचिड, कुत्रा या शब्दांच्या पलीकडे उद्धव यांनी काहीही सांगितले नाही. खा. विनायक राऊत यांना तर बोलता बोलता दोनदा ठाकरेंनी हटकलं. त्यामुळे आता शिवाजी पार्कऐवजी जिथे कुठे पुढचा दसरा मेळावा होईल तो ‘हसरा मेळावा’ ठरू नये इतकच!
 
 
...खरे मिंधे नेमके कोण?
 
 
 
राज्याचे माजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मातोश्री’विरोधात उठाव केल्यानंतर ठाकरेंची पळता भुई थोडी झाली. शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर विविध जिल्ह्यांत सभांचा त्यांनी धडाकाच लावला गणेशोत्सवात त्यांनी शेकडो घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही भेटी दिल्या. शिंदे जिथे जातील तिथे लोकांचे प्रेम मिळू लागल्याने ठाकरे गट धास्तावला आहे.
 
 
ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यांसह अनेक महानगरपालिका, नगरपालिकेच्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यात शिंदे दिल्ली दौर्‍यावर असताना तिथेही देशातील 12 राज्यांच्या शिवसेना राज्य प्रमुखांनी शिंदे गटाला आपले समर्थन जाहीर केले. त्यामुळे लागलीच उद्धव यांनी मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी शिंदे गटाला ‘मिंधे’ असे संबोधले. परंतु, खरोखर मिंधे नेमके कोण, हे सर्वांनी पाहिले आहे. शिंदे यांनी योग्य वेळ साधत ठाकरेंच्या अरेरावीला आणि अन्यायाला कंटाळून आपला मार्ग पत्करला. त्यामुळे मिंधे तर ठाकरे निघाले. कारण, शिंदे मुख्यमंत्री झाले.परंतु, ठाकरेंना त्याचा थांगपत्ताही नव्हता. शिंदे गटाने मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, रामदास कदम, शिवाजीराव आढळराव पाटील या नेत्यांची मनेही आपल्या बाजूने वळवली आहे. अनेक जुणेजाणते नेत्यांनीही शिंदेंना समर्थन दिले आहे.
 
 
नुकत्याच जळगावात पार पडलेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. गुलाबराव पाटलांची भाषणे चांगली असल्याने ते ठाकरेंपेक्षा मोठे होऊ नये म्हणून दसरा मेळाव्यात त्यांना भाषणाची संधी नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ठाकरेंना आपल्यापेक्षा कुणीही मोठे झालेले चालत नव्हते हेच स्पष्ट होते. इकडे शिंदे जोरदार फॉर्मात असताना तिकडे उद्धव यांनी आपल्याच घोषणा आणि दौरे बासनात गुंडाळून ठेवले. गणेशोत्सवानंतर महाराष्ट्र दौर्‍यावर निघणार असल्याच्या वावड्या उठल्या खर्‍या, परंतु, ठाकरे अजूनही एक-दोन टोमणे सभा आणि पत्रकार परिषदा सोडल्या, तर मुंबईबाहेर पडलेले नाहीत. एकूणच शिंदेंना कितीही टोमणे मारले तरी त्यांनी शिवसेना नेमकी कुणाची, याची ओळख ठाकरेंना करून दिली आहे. त्यामुळे भेदरलेल्या ठाकरेंनी कितीही मेळावे घेतले तरीही शिंदे त्यांना भारी पडणार, हेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून स्पष्ट होते.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0