मुंबई महापालिकेचा ‘नाखवां’च्या पाठीत खंजीर!

पूर्वसूचनेशिवाय वर्सोवामधील घरावर हातोडा

    22-Sep-2022
Total Views |

sharda nakhva
 
मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबई महापालिका कोणत्याही इमारतीवर किंवा घरावर तोडक कारवाई करू शकत नाही. परंतु, असे असतानाही मुंबई महापालिकेकरवी अंधेरीतील वर्सोवा येथील ज्येष्ठ नागरिक शारदा नाखवा यांचे घर 19 जुलै रोजी तोडण्यात आले. घरात कोणी नसताना घराचे कुलूप तोडत पालिकेने ही कारवाई केल्याचे शारदा नाखवा यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले.
 
 
19 जुलै रोजी घरात कोणी नसताना मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी घरावर हातोडा मारला. त्यावेळी घरात कोणी नव्हते. घराला कुलूप असताना पालिका कोणतीही कारवाई करू शकते का? कोणतीही नोटीस न देता आमचे घर पडले गेले. आता आम्ही कुठे राहायचे, असा सवालदेखील नाखवा कुटुंबाने उपस्थित केला आहे.
 
पालिकेतून काहीच उत्तर नाही!

19 जुलै रोजी मी सकाळी मासे विक्रीसाठी निघाले. त्यानंतर माझी नात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी येऊन घर तोडण्यास सुरुवात केली. कोणतीही आगाऊ सूचना न देता माझ्या घराबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. घरात कोणी नसताना घराचे कुलूप तोडून ही कारवाई झाली आहे. कोणाच्याही घराचे कुलूप तोडून कारवाई करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेकडे आहेत का? माझ्या घराचे सर्व कागदपत्र असूनही ही कारवाई झाली आहे. मग मी मुंबई महापालिकेवर विश्वास कसा ठेवू? माझ्या मुलाची ‘लॉकडाऊन’च्या आधीपासून नोकरी गेली आहे. त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे. मी मासेविक्री करून माझ्या दोन नातवंडांचे शिक्षण करत आहे. पालिकेने आता माझ्या घरावर कारवाई केल्याने आम्ही रस्त्यावर राहायचे का आता? पालिकेकडे यासंदर्भात चौकशी केली, पालिकेला लेखी स्वरूपातही यासंदर्भात अर्ज केला आहे. परंतु, आम्हाला कोणतेही उत्तर अद्याप मिळालेले नाही. माझे वय आणि माझ्याकडे पैसाही इतका नाही, की मी आता नवीन खोली कुठे घेईन. तेव्हा प्रशासनाने मला न्याय द्यावा.
- शारदा नाखवा, पीडित
 
- शेफाली ढवण
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.