श्रीकांत ठाकरे यांच्या नावाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध?

चौकाच्या नामांतराची अधिकृत माहिती गुलदस्त्यात; नागरिकांमध्ये संभ्रम

    22-Sep-2022
Total Views |

shrikant thackeray
 
मुंबई : मुंबई महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी चौकांच्या सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात येतात. मागील 20 ते 25 वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, ज्या शिवसेना पक्षाची स्थापना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली, त्याच कुटुंबातील एका नावाला मुंबई महापालिकेकडून विरोध करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब अंधेरीमधून उघडकीस येत आहे. अंधेरीतील प्रभाग क्र. 75 येथील ‘मिलिटरी रोड’ येथील चौकाचे 2004 साली ‘ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत प्रबोधनकार ठाकरे’ असे नामांतर करण्यात आले आहे.
 
 
मात्र, अद्याप या रस्त्याला, चौकाला ‘मिलिटरी रोड’ असेच म्हटले जाते. या नामांतराचा प्रस्ताव हा 2004 साली पास झाला असून, 2016 मध्ये या चौकाचे नामांतर करण्यात आले व चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, पालिकेकडून अद्याप या नावाची घोषणा करण्यात येत नाही आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत प्रबोधनकार ठाकरे या नावाला विरोध आहे का? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच, या चौकाच्या झालेल्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यासाठीही मुंबई महापालिकेला वेळ नाही का? अशीही शंका यावेळी स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आली.
 
दुरवस्थेकडे मुंबई पालिकेचे दुर्लक्ष
या चौकाला ठाकरे कुटुंबाचे नाव आहे. मुंबई महापालिकेवर 25 ते 30 वर्षांपासून सत्ता असूनही या चौकाच्या झालेल्या दुरवस्थेकडे पालिकेचा लक्ष नाही. ठाकरे कुटुंबातीलच एक सदस्य मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर विराजमान होते. तरी या एका छोट्याश्या गोष्टीकडे इतकी वर्ष लक्ष त्यांनी लक्ष पुरवलेले नाही आणि आम्हाला याचीच खंत वाटते.
- शेखर पांगरकर, स्थानिक 
अधिकृत नामांतर गुलदस्त्यात?
 2004 साली पास झालेला प्रस्ताव आज 2022 मध्येही दाबून ठेवलेला आहे. तत्कालीन नगरसेवक आणि आत्ताचे नगरसेवक यांना हा प्रस्ताव सभागृहामध्ये पास झाल्याची कल्पना आहे आणि या चौकाला श्रीकांत प्रबोधनकार ठाकरे असे नाव देण्यात आले आहे. आम्हाला असे वाटते की, हे जे राजकारण आहे ते अतिशय खालच्या पातळीचे राजकारण आहे आणि या राजकारणाचा एक भाग म्हणूनच मुंबई महापालिकेने या चौकात नाव ‘मिलिटरी रोड’ असच ठेवलेले आहे. हा सर्व जो भोंगळ कारभार मुंबई महापालिकेमुळे आहे. स्वतःच नियम बनवतात. स्वतःच प्रस्ताव पास करतात आणि स्वतःच दुर्लक्ष करतात, अशा प्रकारे लोकांची केवळ दिशाभूल केली जात आहे.
 
- रोहन सावंत, मनसे, अंधेरी विधानसभा अध्यक्ष
 





























- शेफाली ढवण
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.