मुंबईत टॅक्सी रिक्षा संप

तीन लाखांहून अधिक चालक सहभागी होण्याची शक्यता

    22-Sep-2022
Total Views |
 
taxi strike
 
 
मुंबई : मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये टॅक्सी रिक्षा संप होणार आहे. मुंबईच्या दैनंदिन परिवहन सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी संप करण्याची घोषणा केली आहे. सोमवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी मुंबईत टॅक्सी रिक्षा संप होणार असल्याची घोषणा केल्याने मुंबईकरांच्या प्रवासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक संघटनेने याबाबत सरकारविरोधात भूमिका घेतली असून सरकारने दिलेला शब्द न पाळल्याचा आरोपही केला आहे.
 
 
साडेतीन लाख चालक सहभागी होणार
 
टॅक्सी रिक्षा युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या संपाला व्यापक पाठिंबा मिळण्याचा दावा संघटनेने केला आहे. संपूर्ण मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचे चालक या संपात सहभागी होणार असल्याचे सांगत एकूण साडेतीन लाखच रिक्षा आणि टॅक्सीचे चालक यात कामबंद करून आपला विरोध प्रदर्शित करतील , अशी माहिती युनियनकडून देण्यात आली आहे.
 
 
आमचा संपाशी संबंध नाही
 
२६ सप्टेंबर पासून सुरु पुकारण्यात येणाऱ्या संपाचा आमच्याशी काहीही संबंध नाही. मुळात सरकारने काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत भाडेवाढ आणि आमच्या मागण्यांवर योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. तरीही, येऊ घातलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना समस्यांना तोंड द्यावे लागू नये यासाठी आम्ही या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
- शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन
 
 
सरकारने शब्द पाळला नाही
 
दहा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले होते. इंधनाचे दर वाढल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेदर वाढवण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली होती. मात्र, आमच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नाईलाजाने मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ सरकारने शब्द न पाळल्यामुळे आम्हाला संपावर जावे लागत आहे.
- ए एल कॉड्रस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमन युनियन
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.