वर्दीतल्या देवांना हक्काचा देव्हारा मिळणार !

मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे बोरिवली पोलीस वसाहतीत आशेचा नवा किरण

    22-Sep-2022
Total Views |

police
 
मुंबई : ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. जे स्वतः कुटुंबाला वेळ देत नाही पण त्यांच्यामुळे आपण आपल्या कुटुंबासोबत रोज वेळ घालवतो. जे केवळ स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता महाराष्ट्रातील तब्बल करोडो कुटुंबाची काळजी घेतात, त्यांच्या सुरक्षेसाठी सदा तत्पर असतात ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस. याच पोलिसांच्या बोरिवलीतील वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार दि. 26 जुलै रोजी भेट दिली होती. त्यानंतर त्वरित बुधवारी बैठकीत पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्वं विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
 
 
परंतु ज्या महाराष्ट्र पोलिसांमुळे आपण रोज निवांत झोपतो अशा पोलिसांच्या गृहिणींचं याविषयी काय मत आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न "दै. मुंबई तरुण भारत"च्या चमूने मुंबई ग्राउंड झिरोच्या माध्यमातून केला. यावेळी आत्तापर्यंत आमच्याकडे कोणतेही नेते किंवा लोकप्रतिनिधी साधी विचारपूस करण्यास देखील आले नव्हते. ना हि कोणती मीडिया आमच्याकडे आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येथे येऊन सत्य परिस्थिती पाहून गेले. त्यामुळे आमच्या फडणवीस - शिंदे सरकारकडून आता अपेक्षा वाढल्या असल्याच्या भावना या गृहिणींनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना व्यक्त केली.
 
 
"मागील अनेक वर्षांपासून आम्ही असाच या धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन जगात आहोत. अनेकदा यासंदर्भात तक्रारी केल्या. विनंत्या केल्या. परंतु कोणीच आमच्याकडे लक्ष पुरविले नाही. आमची विचारपूस करण्यासही कोणी आले नाही. कधी कुठे प्लास्टर पडत, तर कधी इतर काही अवशेष. आमचे पती १२ तास ड्युटीवर असतात. कधी कधी तर २४ तासही ड्युटीवर असतात. परंतु आम्हा गृहिणींना मात्र घरात जीव मुठीत घेऊन राहावं लागत. आमची लहान मुलं आहेत. परंतु इमारतीची दुर्दशा झाल्याने भीती अधिक वाटते. कित्येकदा आम्ही स्वतः खर्च करून घरात दुरुस्ती करतो. मात्र एका वर्षात पुन्हा तीच परिस्थिती तीच दुर्दशा होते. मुख्यमंत्री शिंदेनी आमच्या येथे येऊन काही इमारतींची पाहणी केली. त्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे आम्हाला एक आशेचा किरण दिसत आहे", अशा शब्दात आपल्या भावना या गृहिणींनी व्यक्त केल्या. तसेच फडणवीस - शिंदे सरकार त्यांच्यासाठी नक्कीच ठोस पावले उचलतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
 
 
ज्या महाराष्ट्र पोलिसांमुळे आपण सुरक्षित आहोत, जे सद्रक्षणाय खलनिग्रणाय म्हणत चांगल्याचे रक्षण आणि वाईटाचा नाश करण्यास नेहमी सज्ज असतात. अशा पोलिसांच्या गृहिणींना फडणवीस - शिंदे सरकारबाबत एक वेगळाच विश्वास असल्याचे देखील त्यांच्या बोलण्यातून जाणवले. जे आपले रक्षण करतात त्यांची विचारपूस देखील आत्तापर्यंत कोणी केली नव्हती पण मुख्यमंत्री शिंदेनी स्वतः येऊन भेट दिल्यामुळे त्यांच्याबाबतचा विश्वास आणि अपेक्षा त्या प्रत्येक गृहिणीच्या बोलण्यातून जाणवत होते हे खरे.
आम्हाला येथे येऊन एक वर्षच झालं आहे. मात्र या इमारतीची इतकी दुरावस्था झाली आहे की पावसात शेवटच्या मजल्यावर छपरातून पाणी गळत असते. इमारतीचे काही अवशेषही मधून मधून पडत असतात. मागे आमच्या शेजारील एका घरात बाथरूम मध्ये छप्पर पडले. त्यावेळी घरात केवळ दोन लहान मुलेच होती. परंतु सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. आम्ही राहतो ती सरकारी वसाहत आहे. तेव्हा आम्ही तरी नेहमी किती वेळा दुरुस्ती करत राहणार. तेव्हा सरकारने आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने लवकरात लवकर काही पावले उचलावीत अशीच आमची सरकारकडून अपेक्षा आहे.
- मयुरी सुरवसे, स्थानिक
आमचे पती दिवस - रात्र ड्युटीवर असतात. घरात आम्हीच गृहिणी असतो. इमारतीत कधी छप्पर पडत तर कधी इतर काही. अशावेळी पीडब्ल्यूडची माणसं येतात तपस करून जातात. पण पुढे त्वरित कोणतीच कारवाई होत नाही. कधी इथे दुर्घटना घडली तर आमच्या पतींना देखील लगेच त्यांची ड्युटी सोडून येत येणार नाही. स्थानिक प्रशासन देखील येतात आणि फक्त अर्धवट काम करून जातात. ठोस पावलं कधी कोणी उचलली नाहीत. आम्ही आता सर्वांना सांगून कंटाळलो आहोत. तसेच कांदिवली पोलीस वसाहतीची डागडुजी करण्यास जेव्हा घेण्यात आली तेव्हा तेथील नागरिकांना बोरिवली पोलीस वसाहतीत पाठवण्यात आले. आम्हाला अशी शिफ्टिंग नको आहे. आमच्या मुलांची शाळा वगैरे सर्व येथेच आहे. त्यामुळे आम्ही काय कार्यच ? आमची सरकारकडून एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर यासंदर्भात पावले उचलावीत आणि आमचाही थोडा विचार करावा.
- नीलम शिंदे, स्थानिक
परवाच आमच्या येथे मुख्यमंत्री येऊन गेले. आमची सत्य परिस्थिती त्यांनी पहिली आहे. तेव्हा लवकरात लवकर त्यांनी आमची दुरीकडे पण जवळच सोया करावी. किंवा आमची इमारतीची अशी डागडुजी करून द्यावी की पुढील १० ते १५ वर्ष तरी त्या इमारतीला काही झालं नाही पाहिजे. कारण मागील १५ वर्षात या आम्ही स्वतः स्वखर्चाने आमच्या घरात काही ना काही डागडुजी करतो. परंतु केवळ वर्षात पुन्हा आम्हाला ती डागडुजी करावी लागते. सगळ्यांच्या घरात पावसाचे पाणी गळते. तेव्हा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी लक्ष पुरवावे आणि ठोस उपाययोजना कराव्यात अशीच आमची अपेक्षा आहे.
- तटकरे, स्थानिक
इमारतीच्या झालेल्या दुर्दशेमुळे आमच्या घरात छपराचा काही भाग माझ्या पतींच्या पायावर पडला आणि त्यांना दुखापत झाली आहे. पोलीस वसाहतींची एवढी दुरावस्था झाली आहे की त्याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे हीच आमची कळकळीची विनंती आहे. आम्ही स्वखर्चाने काही ना काही डागडुजी करत असतोच. पण आम्ही तरी किती करणार? आमची घरे आमच्या नावावर करून द्यावी अशीही आमची सरकारकडे मागणी आहे. तसेच यापूर्वी आमच्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येऊन आम्हाला भेट दिल्याने त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा आणखीन वाढल्या आहेत. तसेच ते नक्क्की आमचा विचार करून काहीतरी तोडगा काढतील असा आम्हाला विश्वास देखील आहे.
 - वैष्णवी कोंडविलकर, स्थानिक
मुख्यमंत्री येऊन दुसऱ्या पोलीस वसाहतीची जरी पाहणी करून गेले असले तरी आमच्या सर्व वसाहतींसंबंधी ते नक्कीच ठोस पावले उचलतील अशी आमची अपेक्षा आहे. तसेच काही ना काही कारवाई मुख्यमंत्री करतीलच असा आमचा विश्वास आहे.
- अंजली आत्माराम साटम, स्थानिक
पोलिसांच्या घरांसंबंधी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पोलिसांच्या घराचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी सिडको, गृह, नगरविकास, गृहनिर्माण या सर्व विभागणी समन्वय साधत सर्वंकष आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. तसेच सध्याच्या स्थितीत अनेक पोलीस हे घरापासून वंचित आहेत. त्यांना घरे मिळवून देण्यासाठी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठीच 'शॉर्ट टर्म', 'मिडीयम टर्म', आणि 'लॉन्ग' टर्म' अशा तीन टप्प्यांमध्ये काम करण्याचे नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे हा आराखडा तयार करताना विविध पर्यायांचाही विचार करावा, असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदेनी संबंधित विभागांना दिले आहेत. त्याचबरोबर पोलीस गृहनिर्माण योजनेला निधी कमी पडू देणार नाही. दरम्यान निधी उप्लब्धतेसाठीही विविध पर्यायांचा विचार केला जाईल असेही मुख्यमंत्री शिंदेनी स्पष्ट केले आहे.
 
 
- शेफाली ढवण 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.