"काका, मीच म्हणाले तुम्हाला वेडा!"; आठवतेय का ती चिमुरडी?

"महाराष्ट्र शाहीर" मध्ये साकारणार महत्वाची भूमिका!

    22-Sep-2022
Total Views |
sana shinde
 
 
मुंबई: स्त्रीच्या मनातील ऐकू येणाऱ्या पुरुषाची कहाणी प्रेक्षकांना २००४ मध्ये पाहायला मिळाली. 'अगंबाई अरेच्चा'तील अभिनेता संजय नार्वेकरच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांनी चित्रपट चांगलाच उचलून धरला. सिनेमातील आणखी अनेक पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहेत. "काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा...", असं म्हणणारी चिमुरडी तुम्हाला आठवतेय का?
 
 
"मी तर मनातल्या मनात तुम्हाला वेडा म्हणाले पण तुम्हाला कसं कळलं", असं म्हणून चिडवणारी तिच चिमुरडी तब्बल १९ वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. केदार शिंदे यांची लेक सना शिंदेनं २००४ मध्ये 'अगं माई अरेच्चा' या सिनेमात छोट्या मुलीचा छोटासा रोल केला होता. तीच सना आता पणजोबांच्या सिनेमात पणजीची भूमिका साकारणार आहे.
 
 
केदार शिंदे यांचं नाटक असो किंवा सिनेमा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. केदार शिंदे पुन्हा नव्या चित्रपटासह सर्वांच्या भेटीला येत आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सना, शाहीर साबळेंच्या पत्नीची म्हणजेच भानूमती यांची भूमिका साकारणार आहे. सनाचा भानुमतीचा पहिला लुक देखील समोर आला आहे.
 
 
 
 
 
 
 
केदार शिंदे म्हणाले, "काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा..” हे वाक्य बोलणाऱ्या छोट्याशा मुलीला तुम्ही २००४ पासून ओळखतच असाल.. पण २०२३ मध्ये येणाऱ्या महाराष्ट्र शाहीर मध्ये भानूमती म्हणून पदार्पण करणारी हीच छोटीशी मुलगी आहे हे तुम्ही ओळखलत का?? सना शिंदे.. माझी लेक.. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्या प्रवासात तिच्या सोबत असू द्या'.
 
 
बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या सनाचं मोठ्या पडद्यावरचं हे मोठं पदार्पण आहे. वडिलांच्या गुणांचा आणि शाहीरांचा वारसा जपत सना मोठ्या पडद्यावर पणजीची भूमिका साकारत आहे. तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सिनेसृष्टीसह प्रेक्षकही उत्साही आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.