चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

22 Sep 2022 15:18:07
 

Uddhav Thackeray
 
 
मुंबई : २०१९ मध्ये भाजपच्या जीवावर निवडणूक जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत विश्वासघात केलात. त्या विश्वासघातामुळे महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला वारंवार निवडणुकीत धडा शिकवला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतही तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. येत्या महापालिका निवडणुकीतही उरलीसुरली कसर भाजप भरू काढेल हे निश्चित आहे. त्यामुळे अमितभाईंवर टीका करण्यापूर्वी तुम्ही आधी स्वतःला सांभाळा,' असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
 
 
बुधवारी मुंबईत झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात ठाकरे गटातील शिवसैनिकांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेकांवर पातळी सोडून टीका केली. ठाकरेंच्या या भाषणावर भाजपकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर पहिल्यांदाच ते जाहीर सभेला संबोधित करत होते.
 
 
ठाकरेंवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे.'
 
 
भाजपमुळे २०१९ विधानसभा निवडणूक जिंकल्यावर तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत विश्वासघात केला. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत होणार आहे. अमितभाईंवर टीका करण्यापूर्वी तुम्ही स्वतःला सांभाळा. भाजपचा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा ?' असा थेट सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
 
 
 
फक्त चारच शिल्लक राहणार
 
'माझे कुटुंब माझी जबाबदारी ही त्यांची पद्धत आहे. त्यांचे चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही. या वृतीमुळेच शेवटी पक्षात त्यांच्याच कुटुंबातील चार जण शिल्लक राहणार,' अशी खोचक टिप्पणीही बावनकुळेंनी केली आहे.
 
 
सूडबुद्धीचे राजकारण टिकणार नाही
 
बावनकुळे म्हणाले की, माणूस खूप घाबरला की त्याच्या मनातली भिती दिसू नये यासाठी तो मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भिती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे बेताल वक्तव्ये करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. तोच कित्ता ते आजही गिरवताना दिसत आहेत. अजूनही त्यांच्यात काहीही सुधारणा झाली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. पण त्यांचे हे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही.
 
 
 <iframe width="853" height="480" src="https://www.youtube.com/embed/UEdZh99LEWc" title="मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा | LIVE" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>
Powered By Sangraha 9.0