महाराष्ट्र भाजपचे ; लोकसभेच्या धर्तीवर विधानसभाही ‘टार्गेट’

22 Sep 2022 14:14:39

bjp
 
 
 
मुंबई: 2024 लोकसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रात आखण्यात आलेल्या ‘मिशन 45’ पाठोपाठ आता आणखी एक अभियान भाजपकडून सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून आजवर न जिंकलेल्या आणि संघटना कमकुवत असलेल्या काही विशिष्ट मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
 
 
भाजपच्या या महाराष्ट्र प्रदेश विधानसभा प्रवास अभियानाची जबाबदारी भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. नुकतेच या अभियानाचे संयोजकपद भारतीय यांच्याकडे देण्यात आले असून त्याबाबतचे नियुक्ती पत्रदेखील बावनकुळे यांनी श्रीकांत भारतीय यांना दिले आहे. महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियुक्तीनंतर राज्य पातळीवर अनेक महत्त्वपूर्ण अभियान आणि नियुक्त्या करण्यात येत आहेत.
 
 
त्याचाच एक भाग म्हणून 2024 लोकसभेच्या अनुषंगाने राज्यातील 45 लोकसभा मतदारसंघ ‘टार्गेट’ करण्यात आले आहेत. त्यापैकी 16 मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले असून या मतदारसंघांमध्ये एका केंद्रीय मंत्र्याची पक्षातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. ‘मिशन 45’ अंतर्गत केंद्रीय मंत्री हे त्या-त्या मतदारसंघात तीन दिवसीय दौरे करत असून लोकसभा जिंकण्याच्या उद्देशाने हे अभियान चालवण्यात येत असल्याचे भाजपने म्हटले आहे.
 
200 जागा जिंकण्याचा निर्धार
 
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) येत्या काळात होणार्‍या सर्व निवडणुका युतीत लढणार आहे. त्याच धर्तीवर 2024मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही युती म्हणूनच लढण्याचा निर्णय दोन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे 2024 मध्ये भाजप आणि शिवसेना सत्तेत परत येण्यासाठी राज्यातील विधानसभेच्या 200 जागांवर लक्ष केंद्रित करत असून या अभियानाच्या बाबतीत लवकरच निश्चिती करण्यात येणार आहे. या अभियानाबाबत अधिक तपशील लवकरात लवकर देण्यात येणार असून थोड्या फरकाने पराभूत झालेल्या आणि संघटना कमकुवत असलेल्या जागा जिंकण्यासाठी आम्ही जोराने प्रयत्न करणार आहोत.
 
 
- केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता,
भाजप, महाराष्ट्र
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0