वैदिक परंपरा आणि साधना

    22-Sep-2022
Total Views |

vedic
 
 
 
भागवतातील रैवतकथा
 
 
प्रकाशवेगापेक्षा अधिक वेगाच्या अनुभवाची एक विलक्षण कथा श्रीमद्भागवतात आली आहे. एकदा एक रैवत नावाचा राजा सर्व पृथ्वीवर राज्य करीत होता. त्याला रेवती नावाची एक अत्यंत रूपवती व सद्गुणी बहीण होती. तिच्या लग्नाकरिता योग्य वर पाहण्याकरिता रैवत राजाने सर्व जग धुंडाळले. पण, त्याला योग्य वर सापडेना. तेव्हा निराश होऊन ब्रह्मदेवाचाच त्यावर उपदेश घ्यावा, असा विचार करून रैवत राजा भगिनी रेवतीला घेऊन ब्रह्मदेवाला भेटण्याकरिता ब्रह्मलोकाला गेला. त्यावर ब्रह्मदेवांनी रेवतीकरिता योग्य वर म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्णाचा वडीलभाऊ बलराम सांगितला. परंतु, त्या सूचनेमुळे राजा रैवत अधिकच भ्रमात पडला. कारण, तो संपूर्ण पृथ्वीचा सार्वभौम राजा असल्यामुळे पृथ्वीवरील सर्व राजकुलांची त्याला माहिती होती. त्याच्या माहितीत द्वारकानगर नव्हते, त्यांचा अधिपती श्रीकृष्ण नव्हता की त्याचा भाऊ बलरामही नव्हता. तेव्हा नसलेल्या राजकुमाराला आपली बहीण कशी द्यायची, याबद्दल रैवत राजाने ब्रह्मदेवाला विचारले.
 
 
यावर ब्रह्मदेवाने दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. त्या उत्तरावरून त्याकाळी असलेल्या ऋषिमुनींना आईनस्टाईनच्या सिद्धांतापेक्षाही अधिक व्यापक व उच्च सिद्धांत माहीत होता, असे दिसते. ब्रह्मदेव म्हणतात, “राजा तू या ब्रह्मलोकाला येऊन काही क्षण झाले असतील. त्यामुळे तुला असे वाटत असेल की, तिकडे मृत्यूलोकातील पृथ्वीवरसुद्धा तोच काळ असेल, पण वास्तवता तशी नाही. इकडे जरी काही क्षण लोटले असतील, तरी तिकडे पृथ्वीवर अनेक युगे लोटून गेली आहेत. तू पृथ्वीवर परत गेलास, तर तुला अनेक युगांतरे झालेली दिसतील. सध्या पृथ्वीवर अठ्ठाविसावे युगांतर चालू असून त्यातील द्वापारयुगात द्वारकाधीश श्रीकृष्णाचा भाऊ बलराम तुला दिसेल. तो तुझ्या रेवतीकरिता योग्य वर आहे. जा आणि रेवती त्याला दे.” बलरामाची पत्नी रेवती होती, असे भागवतात वर्णन आले आहे.
 
 
यावरून अवस्थेनुसार कालमापनात कितीतरी अंतर पडते, हे अनुभवाला येईल. सूक्ष्म अवस्थेतील काळाचे क्षण जडअवस्थेतील काळात अनेक युगे असतात, हे यावरून दिसून येईल. आजच्या विज्ञानाने काळाची असली दिव्यगती मान्य केली आहे. आईनस्टाईनला मात्र प्रकाशवेगापेक्षा अधिक गतीचे आकलन झाले नाही, पण त्यानंतर एडिंग्टन व नारळीकर प्रभृती वैज्ञानिकांनी काळाची असली परागती मान्य केली आहे.
 
 
श्रीकृष्ण व ब्रह्मदेवाची कथा
 
भगवान श्रीकृष्ण नित्याप्रमाणे गोवर्धन पर्वतावर आपल्या गोपसवंगड्यांसह जाऊन रानात गाई चरवत असताना ब्रह्मदेवाला भगवंताची थट्टा करण्याची इच्छा उत्पन्न झाली. भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली बासरी वाजविण्यात रममाण असताना पाहून ब्रह्मदेवांनी भगवंतासह आलेले सारे गोप व त्यांच्या गाई त्या पर्वतात अदृश्य केल्या आणि स्वारी एक वर्षभर दुसरीकडे निघून गेली. भगवंताला ब्रह्मदेवाच्या कारस्थानाची कल्पना आली. त्यांनी लगेच दुसरे तसेच गोप व गाई निर्माण करून त्यासह ते वृंदावनाला परतले.
 
 
एक वर्षानंतर ब्रह्मदेव त्यास्थानी येऊन पाहतात तो त्यांनी पर्वतात गडप केलेले गोप-गाई त्यांना दिसले व गाई पूर्वीप्रमाणे चरत असून सायंकाळी ते सर्व भगवंतासह वृंदावनास परत जाताना पाहिले. ब्रह्मदेव अवाक् होऊन भगवान श्रीकृष्णास शरण गेले आणि त्यांना विचारते झाले. त्यावर भगवान म्हणाले, “ब्रह्मदेवा, तुझे कारस्थान माझे केव्हाच लक्षात आले. पण, मी तत्क्षणीच नवीन गोपगाई उत्पन्न करून वृंदावनास नेल्या. तू आता एक वर्षानंतर परत आला आहेस. पण माझा काल तुझ्यापूर्वीचा एक वर्षा अगोदरचा आहे. जा पुन्हा असा गर्व धरू नकोस. भव्य कालमापन.”
 
 
कालमापनाबद्दल गीता सांगते,
सहस्रयुगपर्यन्तमहर्यद् ब्रह्मणो विदुः।
रात्रिं युगसहस्त्रान्तां ते ऽ हो रात्रविदो जनाः॥
17, अ.8 गीता॥
 
 
आशय असा की, एक हजार युगांचा एक दिवस व तेवढ्याच युगांची एक रात्र ब्रह्मदेवाची असते. इतकी लक्षावधी ब्रह्मदेवाची युगे होऊन गेली, पण त्या अवधीचा भगवान श्रीकृष्णांना थांगपत्ता नव्हता. ते जड जगताच्या मागे लक्षावधीयुगे होते. याचा अर्थ असा की, जडजगत चाललेले असते, पण मूळ अवस्था त्याच स्थानी असल्यामुळे ती जडावस्थेच्या लक्षावधी युगे मागे असते. मूळावस्थेत काळ जडावस्थेपेक्षा माघारतो असा या कथेचा स्पष्ट अर्थ आहे.
 
 
यावर आधुनिक विज्ञानाचे काय म्हणणे आहे, याचे प्रत्यंतर पाहू. आजचे विज्ञानाचा पुरावा -
 
आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतापर्यंत पदार्थाची मूळ अवस्था म्हणजे परमाणू (ईेां) अच्छेद्य समजली गेली होती. म्हणजे परमाणू फोडून त्यापलीकडे काही अवस्था असतील, याची विज्ञानाला कल्पनासुद्धा नव्हती. पण, आता परमाणू फुटला असून तो ओतांचा (एश्रशलीीेंप) सापेक्ष संच आहे असे सिद्ध झाले आहे. ओत हेच वस्तुजाताचे अंतिम स्वरूप आहे अशी कल्पना बरीच वर्षे टिकली. आता ओतापलीकडेही प्रोत (झीेीेंप), न्यूट्रॉन, सिट्रॉन अशा अनंत वेगाच्या सूक्ष्म अवस्था असल्याचा शोध लागला आहे. आता इतक्यातच ‘टॅकिऑन्स’ नावाच्या अतिसूक्ष्म अशा कणांचा शोध लागला असून हे कण प्रकाशवेगापेक्षा साडेतीन पट वेगाने प्रवास करतात असे सिद्ध झाले आहे. म्हणजे जेथे प्रकाश जाईल तेथे हे ‘टॅकिऑन्स’ कण प्रकाशापूर्वीच साडेतीन पट काळाअगोदर जाऊन पोहोचतील. या अवस्थेत काळ मागे सरतो. उदाहरणार्थ - सूर्यावरून सकाळी 6 वाजता निघून पृथ्वीवर आलेला प्रकाश 6 वाजून 16 मिनिटांनी परत सूर्यावर जाणार नाही, तर तो प्रकाश सूर्यावर सकाळचे 6 वाजण्यापूर्वी आठ मिनिटे असताना पोहोचेल. असे हे कालमापनाचे शास्त्र व आजचे विज्ञान सांगते.
 
 
सूक्ष्मातिसूक्ष्म अवस्थेत काळ मागे सरतो, असा हा सिद्धांत वेदव्यासांना व ऋषिमुनींना स्पष्टपणे माहीत होता, असे या कथांवरून स्पष्ट दिसते. आमच्या पुराणकथांच्या बाह्यांगाचाच जुन्या पठडीबाज पद्धतीने शाब्दिक विचार केल्यामुळे त्यातील विलक्षण वैज्ञानिक व गूढ अशी योगरहस्ये आम्हाला अजून माहीत झालेली नाहीत. पुराणे म्हणजे केवळ काल्पनिक इतिहास अशी कल्पना थोडी बाजूला सारल्यास वन योगविज्ञानाद्वारे याचा मागोवा घेतल्यास आम्हाला व सर्व विश्वालाच त्यातील गुह्यतर रहस्ये समजून मानव समाज त्याद्वारे सुखीसमृद्ध झाल्याविना राहणार नाही, असे खात्रीने वाटते. परंतु, त्याकरिता आम्हाला योगसाधना करून त्याद्वारे जटिल अनुभव घ्यावे लागतील. सूक्ष्म बुद्धी प्राप्त होऊन आम्ही त्यातील गुह्य रहस्ये समजू शकू. त्याकरिता आम्हा सर्वांना तशी दिव्य रुची प्राप्त व्हावी, हीच परमेश्वराजवळ इच्छा!
 
 
भद्रं नो अपिवातय मनः। हे परमनिधाना,
आम्हाला चांगल्या कार्यामध्ये स्वारस्य दे.
 
-योगिराज हरकरे
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.