शुभं भवतु! कल्याणम् अस्तु!

    22-Sep-2022
Total Views |
 
marriage
 
 
रय्या सहस्रवर्चसा इमौ स्तामनुपक्षितौ॥
(अथर्ववेद-6.78.2)
 
 
अन्वयार्थ
 
(इमौ) वधू आणि वर दोघेही (पयसा) उत्तमोत्तम पेयांद्वारे (अभिवर्धताम्) सर्वदृष्टीने वाढत राहोत. दोघांचीही चौफेर प्रगती होत राहो. (राष्ट्रेण) राष्ट्राच्या उन्नतीसोबतच उभय (अभि वर्धताम्) सर्व प्रकारे वाढत राहोत. (इमौ) हे दोघेही (सहस्रवर्चसा रय्या) असंख्य तेजांनी व ऐश्वर्यांनी (अन् उप क्षितौ) कधीही क्षीण न होता, (स्ताम्) मोठ्या प्रमाणात समृद्ध होत राहोत.
 
 
विवेचन
 
 
’सप्तपदी’ या महत्त्वपूर्ण विधीनंतर मोलाचा क्षण येतो, तो वधू-वरांना आशीर्वाद देण्याचा! नवदाम्पत्याचे जीवन सर्वदृष्टीने सुखी, समृद्ध व आनंदी होवो, याकरिता थोरा-मोठ्यांच्या शुभ आशीर्वादाची फार गरज असते. दोन्ही पक्षांकडील मंडळी देखील याच क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणूनच तर पारंपरिक भाषेत ’अक्षता पडण्याची किंवा लग्न लागण्याची वेळ जवळ आली,’ असे म्हटले जाते. याचकरिता सर्वांची एकच घाई व गडबड असते, ती अक्षता टाकून मोकळे होण्याची! वैदिक आशीर्वादाची पद्धत मात्र खर्‍या अर्थाने वधू-वरांच्या व इतरांच्या संपूर्ण हिताचा विचार करणारी वैज्ञानिक आहे. दुर्दैवाने सध्याच्या युगात याचा कोणी विचार करत नाही.
 
 
वैदिक पद्धतीत आशीर्वाद प्रदान करण्यापूर्वी आणखीन तीन-चार प्रसंग असे असतात की, ज्यांना संपन्न करणे गरजेचे ठरते. याचे वर्णन खालील प्रमाणे आहे. 
 
 
सूर्यावलोकन
 
 
सप्तपदीविधीच्या प्रसंगी कलशाच्या बाजूला बसलेला पुरोहिताचा साहाय्यक त्या कलशातील थोडेसे पाणी घेऊन त्यांचे वधू-वरांच्या मस्तकावर सिंचन (शिंतोडे) करतो. यामागचा उद्देश हाच की, अग्निहोत्राच्या वेळी वधू-वरांचे मस्तक अग्नीमुळे तप्त झाले असेल, तर ते शांत व थंड करावे. या क्रियेच्या पाठीमागची आणखीही एक भावना आहे, ती ही की, या दोन्ही नवदाम्पत्यांनी आयुष्यभर परस्परांवर न रागावता किंवा क्रोध न करता आनंदाने राहावे. नेहमीच थंड डोक्याने विचारपूर्वक जीवन जगावे.
 
 
यानंतर वधू-वरांना सूर्याचे दर्शन घडविले जाते आणि त्यावेळी पुरोहित तच्चक्षुर्देवहितं पुरस्ताच्छुक्रमुच्चत् । पश्येम शरद: शतं, जीवेम शरद: शतम्। हा मंत्र वधू-वरांकडून वदवून घेतो. सूर्यदर्शनाचा उद्देश हाच की, नवदाम्पत्यांचे वैवाहिक जीवन सूर्याप्रमाणे सद्गुणांनी व सद्विचारांनी प्रकाशमान असावे. त्यांच्या जीवनात कोणतेही अज्ञान, अविद्या व कोर्‍या भौतिकतेचा अंधार असता कामा नये. जसा सूर्य नेहमी गतिमान असतो, त्याप्रमाणे या नवदाम्पत्यानेही सदोदित गतिमान राहावे. तसेच या दोघांच्याही आदर्श गृहस्थजीवनाचा प्रकाश इतरांनाही मिळत राहावा.
 
 
हृदयांचे मिलन
 
 
यानंतर वधू-वरांकडून एक दुसर्‍यांच्या हृदयांचे स्पर्श केला जातो. वधू आपला उजवा हात वराच्या हृदयावर ठेवते, तर वरदेखील आपला उजवा हात वधूच्या हृदयावर ठेवतो. त्यावेळी हे दोघे खालील मंत्र उच्चारतात-
 
 
मम व्रते ते हृदयं दधामि
मम चित्तमनुचित्तं ते अस्तु ।
मम वाचं एकमना जुषस्व
प्रजापतिस्त्वा नियुनक्तु मह्यम्॥
(पारस्कर गृह्यसूत्र-1/8/8)
 
 
म्हणजेच हे वधू, मी तुझ्या हृदयाला म्हणजेच अंत:करण व आत्मा या दोन्हींना माझ्या हृदयात धारण करतो. तुझे चित्त (मन) नेहमीच माझ्या चित्ताच्या अनुकूल राहो. माझी वचने (वाणी) तू नेहमीच एकाग्रचित्ताने ऐकत राहा. संपूर्ण विश्वाचे, प्रजेचे पालन करणारा तो परमात्मा तुला माझ्याकरिता नियुक्त करो. हाच मंत्र व भावार्थ नंतर वधूनेदेखील म्हणावयाचा आहे. हे वरमहोदय, मीदेखील आपल्या हृदयाला माझ्या हृदयात धारण करते.
 
 
मानवी जीवनात हृदयाचे सर्वात मोठे स्थान आहे. प्रेम, दया, करुणा व स्नेह-आपुलकीची जागा म्हणजे हृदय. सहृदय भावनेमुळे आता हे दोघेही एका हृदयाचे होत आहेत. एकविचाराचे बनत आहेत. यापुढे दोघांनीही जगायचे, ते एकाच दृढविश्वासाने व एका मनाने. म्हणूनच हा हृदयस्पर्शविधी. आधुनिक न्यायालयीन नोंदणी विवाह पद्धतीप्रमाणे ओळखला जाणारा हा वैदिक रजिस्टर विवाहाचा हा अभिनव प्रसंग. इथे विवाहाचा संपूर्ण यज्ञमंडप म्हणजेच न्यायालय होय. सर्वात मोठा न्यायाधीश म्हणजे तो सर्वव्यापक परमेश्वर आणि त्याच्या प्रतिनिधीच्या रूपाने विद्यमान आहे तो पुरोहित. आशीर्वाद देण्यासाठी इथे जमलेले सर्व स्त्री-पुरुष म्हणजे खरे साक्षीदार आहेत. वधू-वरांची हृदयपटले हेच तर बॉण्डपेपर. यावर अंगठ्याचा ठसा मारण्याऐवजी दोन्ही वधू-वरांच्या हातांच्या पंजांचा छापा मारला जातोय. खरोखरच किती उत्कट भावना दडली आहे यामागे.
 
 
दागिने, मंगळसूत्र व कुंकू - विनियोग
 
 
आजपर्यंत वधू व वर हे दोघेही ब्रह्मचर्य आश्रमामध्ये तपश्चर्येने जीवन व्यतित करत होते. अगदी साधी राहणी. कोणत्याही प्रकारच्या अलंकार व दागिन्यांपासून खूपच दूर. केवळ विद्याभ्यास किंवा इतर जीवनाच्या सर्वस्वी नवनिर्मितीच्या कार्यात व्यस्त जीवन असल्याने इतर गोष्टींना वेळेस मिळत नसे. आता या नवविवाहितांना पती-पत्नी म्हणून एक दुसर्‍यांसाठी अलंकृत होण्याचा किंवा सजण्याचा अधिकार सर्वांच्या साक्षीने मिळत आहे. वर हा वधूला विविध प्रकारचे दागिने प्रदान करतो. कारण, स्त्रीचे सौंदर्य हे विविध धातूंच्या अलंकारामुळे अतिशय खुलून दिसते. म्हणूनच तिला सालंकृत करण्याचा हा प्रसंग. यात जोडवे, चैन, अंगठी किंवा इतरही अलंकार देण्याचा प्रघात आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे सर्वांच्या उपस्थितीत वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. मांगल्याचे हे अतिशय सर्वोत्तम प्रतीक प्रदान करताना वर म्हणतो-
 
 
इमं बध्नामि ते मणिं दीर्घायुत्वाय तेजसे !
(अथर्ववेद-19.28.1)
 
 
म्हणजेच हे देवी, तुझ्या दीर्घायुष्यासाठी आणि तेज व सौंदर्यवृद्धीसाठी मी हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात बांधतो. नंतर उपस्थित जनसमुदायासमोर वधूच्या मस्तकावर हात ठेवत वर म्हणतो-
 
 
सुमंगलीरियं वधू: इमां समेत पश्यत ।
सौभाग्यमस्यै दत्वायाथास्तं वि परेतन॥
(ऋग्वेद-10.85.33)
 
 
सुजनहो, ही वधू चांगला प्रकारे अलंकृत झालेली असून सर्व दृष्टीने मंगलकारिणी आहे. आपण सर्वांनी हिला कल्याणाच्या दृष्टिकोनातून मांगलिक भावनेने पाहावे आणि हिच्याकरिता सौभाग्यपूर्ण असा आशीर्वाद प्रदान करावा. तसेच कुंकू हेदेखील मांगल्याचे प्रतीक आहे. म्हणून वर हा कुंकू घेऊन वधूच्या केशभांगेत त्याचे रेखांकन करतो व भृकुटीस्थानी लावतो.
याचवेळी यजमान वा व्यवस्थापकांकडून या नववधू-वरांना आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित मंडळींना सुगंधित अशा विविध फुलांचे वितरण केले जावे.
 
 
आज-काल आशीर्वाद देण्यासाठी तांदूळ किंवा इतर धान्यांचा प्रयोग केला जातो. पण, तांदूळ हे अन्न आहे. ते वधू-वरांवर उधळल्यामुळे पायदळी तुडवले जाते. एक प्रकारे हा अन्नाचा अवमान ठरतो. म्हणून तांदळाऐवजी फुलांच्या अक्षता वापरण्यात याव्यात. ’अक्षत’ म्हणजे कधीही क्षत न होणारे किंवा कधीही नष्ट न होणारे तत्त्व. खरेतर उपस्थितांच्या अंत:करणातून व मुखातून बाहेर पडणारी आशीर्वादाची पवित्र वचने हीच अक्षता ठरतात. म्हणूनच अक्षतरूप वैदिक मंत्रांनी आशीर्वाद देण्याची पद्धत अतिप्राचीन मानली जाते आणि तीच सुयोग्य पद्धत खर्‍या अर्थाने परिपूर्ण ठरते, जी की कालौघाने नष्टप्राय झाली आहे.
 
 
आशीर्वादात वधू-वरांच्या वैवाहिक जीवनासाठी सर्वस्वी सुख-समृद्धीचे विवेचन केलेले असावे. हे विवेचन वैदिक मंत्रांशिवाय इतर कोणत्याही काव्याद्वारे व्यक्त होऊ शकत नाही. म्हणून इतर कोणतेही मंगलगायन करण्यापेक्षा वैदिक मंगल गायन केले, तर ते खर्‍या अर्थाने सार्थक ठरते व त्यातील उत्कट भावदेखील वधू-वरांच्या हृदयापर्यंत पोहोचतो. यासाठी प्रारंभी वर्णिलेला मंत्र सर्वांनी सामूहिकरित्या उच्चारावा आणि शेवटी ओम् शुभं भवतु। कल्याणमस्तु। स्वस्ति... स्वस्ति... स्वस्ति...!! असे उच्चार करीत सर्वांनी वधूवरांच्या सर्वांगावर पडतील, अशा प्रकारे फुलांच्या अक्षदांची आनंदाने उधळण करावी. यावेळी पुरोहितांनी विविध मंगलमय वेदमंत्रांचे गायन केले, तर अधिकच उत्तम. कारण, त्यामुळे वातावरण अतिशय उत्साहमय व प्रसन्न बनते.
 
 
अशा प्रकारचा हा वैदिक विवाह सर्वदृष्टीने परिपूर्ण आणि वधू-वरांच्या सर्वस्वी कल्याणासाठी उपयुक्त असा आहे. याचेच अनुसरण करणे, ही सर्वस्वी काळाची गरज आहे. या कार्यात परमेश्वर सर्वांना सदिच्छा प्रदान करो, अशी मंगलमय कामना.
(12 भागांचे वैदिक विवाह विवेचन समाप्त....)
 
 
 
 -प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.