नव्हे रे तया रामभेटी...

22 Sep 2022 10:44:30

ram
 
 
 
जिथे राम नाही त्या ठिकाणी काम, आसक्ती, स्वार्थ, अहंकार हे विकार राहायला येतात. अशा कामकारी विकारी माणसाला भगवंताविषयी आदर, प्रेम, भक्ती वाटणे सुतराम शक्य नाही. असे स्वामींनी या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत सांगितले आहे. कामविकार आलेल्या मनात राम राहत नाही. त्यामुळे ते मन प्रसन्न, आनंदी राहत नाही.
 
 
सर्वसाधारण माणसाच्या मनाची आसक्ती, हव्यास सुटत नाही आणि मन अनासक्त झाल्याशिवाय ते भगवंताचा विचार करू शकत नाही. आसक्तीमुळे मन सतत ’हवे-नको’चा विचार करीत राहते. हे ‘हवे-नको’ काही संपता संपत नाही. मन त्यासंबंधी कल्पना करीतच राहते. मनाला अनासक्त करण्यासाठी व भगवंताच्या ठिकाणी आवड निर्माण करण्यासाठी प्रथम मनाचे कल्पना करणे कमी करावे लागते.
 
 
पुढे हळूहळू कल्पनेवर ताबा मिळवता येतो. तसे पाहिले तर व्यवहारात कल्पना उपयोगी पडते, पण तरीही व्यावहारिक आचारातसुद्धा कल्पनेला मोकळे सोडता येत नाही. त्याने माणूस वाहवत जाऊन कार्यनाश होऊ शकतो. परमार्थ साधनेत तर भगवंतप्राप्तीचा आनंद मिळवायचा, तर सूक्ष्म कल्पनाही मनातून काढून टाकावी लागते, असे स्वामींचे सांगणे आहे. त्यासाठी मागील श्लोकात म्हणाले की, ‘मना कल्पना लेश तोही नसावा।’ आता परमार्थसाधनेतील जे ध्येय आहे ते म्हणजे रामभेट. या ध्येयप्राप्तीच्या मार्गात कशाप्रकारे अडथळे येतात, याचे वर्णन समर्थ करीत आहेत.
 
 
मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी।
मनीं कामना राम नाही जयाला।
अती आदरें प्रीति नाही तयाला ॥59॥
 
 
सारखे कल्पना करीत राहाणे हा मनाचा गुणधर्म आहे. मनाच्या ठिकाणी अफाट कल्पनाशक्ती असते, अशा या मनाने कोटी ‘कल्प’ कल्पना केल्या, तरी त्याचा परमार्थ क्षेत्रात काही उपयोग नाही. त्याने काही रामभेट होणार नाही. आता ‘कल्प’ ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. शास्त्रात ब्रह्मदेवाच्या एक दिवसाला ‘कल्प’ असे म्हणण्याची पद्धत आहे. ब्रह्मदेवाच्या ‘कल्प’ हा कालखंड किती सौरवर्षांचा असतो, हे दासबोधातील ‘ब्रह्मनिरुपण’ या समासात समर्थांनी स्पष्ट केले आहे. समर्थांनी दशक 6, समास 4 या समासात शास्त्राधारे विश्वाच्या कालगणनेची माहिती दिली आहे. त्यात ब्रह्मदेवाचा एक दिवस ‘कल्प’ किती सौरवर्षांचा असतो, हे स्वामींनी पुढील ओवीत सांगितले आहे-
 
 
कलयुग च्यारि लक्ष बत्तीस सहस्र।
चतुर्युगे त्रेचाळीस लक्ष वीस सहस्र।
ऐसी चतुर्युगे सहस्र।
तो ब्रह्मयाचा येक दिवस॥ (6.4.2)
 
 
दासबोधातील शास्त्राधारे दिलेल्या या माहितीनुसार कृतायुग, त्रेतायुग, द्बापारयुग आणि कलियुग यांच्या एकंदर कालगणनेची बेरीज 43 लक्ष, 20 सहस्र एवढी आहे. त्या संख्येच्या सहस्रपट म्हटजे 4 अब्ज, 32 कोटी सौरवर्षे एवढा ब्रह्मदेवाचा एक दिवस मानला गेला आहे. तो ‘कल्प’ होय. या ‘कल्प’ कालखंडाच्या सहस्रपट कल्पना करीत गेले, तरी त्याचा परमार्थ साधनेसाठी काही उपयोग होत नाही. अशाने काही रामभेट म्हणजे भगवंताची प्राप्ती होणार नाही. कारण, परमार्थ साधनेसाठी, रामभेटीसाठी विकारांवर ताबा, चारित्र्यसंपन्न जीवन, भगवंतावरील दृढनिष्ठा, भक्ती, प्रेम यांची आवश्यकता असतेे. सामान्य माणूस वेगवेगळ्या मार्गांनी कल्पना करीत असल्याने त्यातून शंका आणि संशय उत्पन्न होऊन परमार्थ साधनेत विघ्न येते.
 
 
भगवंतावरील श्रद्धा, विश्वास डळमळीत होऊ लागतात. संशयाने भगवंतावरील प्रेम व भक्ती कमी होऊ लागते, निष्ठा उरत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून कामक्रोधादी विकारांचे फावते. ते मनाला अस्वस्थ करू लागतात. बरं! याच कल्पनेचा उपयोग करून हे विकार चांगले नाहीत, असे ठरवले तरी ते तात्पुरते असते. त्यासाठी आचरण शुद्ध असावे लागते. परमार्थसाधन, भगवंताच्या भेटीची ओढ, मनाची विकाररहित प्रसन्नता या गोष्टी नुसत्या बोलायच्या नाहीत, तर त्या अभ्यासाच्या, अनुभूतीच्या, संयमाच्या आहेत.
 
 
त्या प्रत्यक्ष आचरणात आणल्या, तरच त्यांचा फायदा होऊ शकतो. परमार्थ साधनेच्या अभ्यासात आचरण न सुधारता नुसत्या कल्पना करून बढाया मारून काही उपयोग होत नाही. उलट त्याचे नुकसानच होते. म्हणून स्वामी या श्लोकात, कल्पकोटी कल्पना करणार्‍याला कधीही रामभेट, भगवंतांना साक्षात्कार होणार नाही, असे निश्चयात्मक विधान करतात. त्यांच्या ‘नव्हे रे नव्हे’ या शब्दांतून तो निश्चयात्मक भाव स्पष्ट होतो. जिथे राम नाही त्या ठिकाणी काम, आसक्ती, स्वार्थ, अहंकार हे विकार राहायला येतात. अशा कामकारी विकारी माणसाला भगवंताविषयी आदर, प्रेम, भक्ती वाटणे सुतराम शक्य नाही. असे स्वामींनी या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत सांगितले आहे. कामविकार आलेल्या मनात राम राहत नाही. त्यामुळे ते मन प्रसन्न, आनंदी राहत नाही.
 
 
ज्याच्यावर प्रेम करायचे, ज्याची भक्ती करायची, ज्याच्याविषयी आदर बाळगायचा, तो राम अर्थात भगवंत किती थोर आहे, हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
 
 
मना राम कल्पतरू कामधेनु।
निधी सार चिंतामणी काय वानूं।
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता
तया साम्यता कायसी कोण आतां॥
 
 
आपल्या इच्छांच्या तृप्तीसाठी माणूस आयुष्यभर धडपडत असतो. पण, पाहिजे ते सुख काही त्याच्या वाट्याला येत नाही. विश्वातील सर्व काही भगवंताच्या सत्तेत येत असल्याने त्याला प्राप्त करून घेण्यात खरे सुख आहे. एका रामोपासनेत सर्व काही सुखाचा ठेवा असल्याने सुखाला शोधत फिरण्यात अर्थ नाही. यासाठी काही व्यावहारिक दृष्टांत देऊन स्वामी रामोपासनेचेमहत्त्व सांगत आहेत. राम हा इच्छिलेली वस्तू लगेच देणारा कल्पतरू आहे. तो कामधेनूप्रमाणे सर्वकाही देणारा आहे. मनात चिंतलेली वस्तू देणारा ते चिंतामणी आहे. फार काय सांगावे? कुबेरच्या द्रव्यसाठ्यापेक्षाही त्याचे वैभव अफाट आहे.
 
 
त्याचीच सत्ता सर्व ठिकाणी चालते. त्याची कृपा झाली, तर सर्व सत्ता हाताशी येते. अशा या सर्व सामर्थ्यवान भगवंताचे, रामाचे वर्णन मी काय करू, त्याला उपाय द्यावी, अशी कोणतीही वस्तू मला दिसत नाही. तो असामान्य आहे, असे स्वामींनी सांगितले आहे. सामान्य माणसाला असे वाटते की, विषयोपभोग, अहंकार, स्वार्थ, आसक्ती यात आपले सुख शोधावे, पण सुखाच्या शोधात दुःख पदरात पडून तो आपली शांती घालवून बसतो. या सर्व आपत्तीतून सुटका हवी असेल, तर रामाला शरण गेले पाहिजे. त्या शरणागतीच्या भावनेसाठी रामनामाशिवाय दुसरे सोपे साधन नाही. ज्यांना ते जमत नाही, ते कल्पवृक्षाखाली बसून दुःख करीत असतात. तो पुढील श्लोकाचा विषय आहे, पुढील लेखात सविस्तर पाहू. (क्रमशः)
 
 
 
 -सुरेश जाखडी
 
 
Powered By Sangraha 9.0